बलुच लिबरेशन आर्मी’ने काल-परवाच माच आणि बोलन शहरांमध्ये पाकिस्तानी सैन्याला जेरीस आणले. त्यात दहा पाकिस्तानी सैनिक मारले गेले, तर काही सैनिक ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने बंधक बनवले आहेत. ‘बलुच लिबरेशन आर्मी’ने दावा केला की, त्यांनी माच आणि बोलन शहरांवर कब्जा केला आहे. ’बलुच लिबरेशन आर्मी’पुढे पाकिस्तानी सैन्य नामोहरम झालेले दिसते. दुसरीकडे, महरंग बलोच या धाडसी तरुणीमुळेही पाकिस्तानच्या नाकी नऊ आले आहेत.
ऑक्टोबर २०२३ साली बालाच मोला बख्श यांना पाकिस्तानी सैन्याने घरातून अटक केली आणि त्यांचा खून केला. पाकिस्तानी पोलीस किंवा सैन्यांनी या आधीही हजारो बलुच नागरिकांना अटक केली आणि पुढे ते नागरिक कायमचे गायब झाले. त्यांचा पत्ता कुणालाही लागला नाही, तर काहींचे मृतदेह सापडले. त्यातच बलुचिस्तानमधील पठाणांनी कधीही स्वतःला पाकिस्तानी मानले नाही. त्यांच्या मते, बलुचिस्तान हा स्वतंत्र प्रदेश, देश होता. १९४७ साली पाकिस्तान वेगळा झाला आणि त्याने बलुचिस्तानवर कब्जा केला. बलुची लोकांच्या मते, पाकिस्तानी संस्कृती तसेच बलुची संस्कृती, भाषा आणि संस्कार भिन्न आहेत. त्यामुळे पाकिस्तानपासून बलुचिस्तान वेगळे व्हावे, असे या नागरिकांचे मनोमन म्हणणे. १९४७ सालापासून येथील जनता हा विचार घेऊन, कायमच पाकिस्तान विरोधात धुमसत राहिली. पाकिस्तान बलुचिस्तान आणि सिंधलाही सापत्न वागणूक देतो, असेही बलुची लोकांचे म्हणणे. त्यातच पाकिस्तानने चीनसोबत आर्थिक करार केला. त्या कराराद्वारे पाकिस्तानने काही भूभाग चीनला विकसित करण्यासाठी दिला. त्यात मुख्यतः बलुचिस्तानचा भूभाग आहे. त्यानंतर चीनने बलुचिस्तानमध्ये बस्तान बसवले. कायदा-सुव्यवस्थेच्या नावाखाली चीनने स्थानिक लोकांचे दमन केले. येथील नैसर्गिक संपत्ती, संस्कृती आणि लोकांचेही शोषण करणे सुरू केले. त्यामुळे बलुची लोकांनी चिनी हस्तक्षेपाला विरोध केला. चिनी अधिकार्यांवर हल्लेही झाले. अनेक चिनी मृत्युमुखीही पडले. या सगळ्या विरोधात चीनने बलुचिस्तानमधून गुंतवणूक काढू नये, चीनला सुरक्षित वाटावे, म्हणून पाकिस्तानने बलुचिस्तानमध्ये क्रूरतेचा कळस गाठला. पाकिस्तानी सैनिक घरोघरी जाऊन लोकांना पकडून, त्यांचे खून करू लागले. घरातले कर्ते पुरूष असे हकनाक बळी गेले. बलुच कुटुंबे उद्ध्वस्त झाली.
या अत्याचाराचा बळी महरंग बलोचचे वडील गफ्फारही ठरले. २००९ साली महरंगसोबत ते दवाखान्यात जात असताना, पाकिस्तानी सैन्याने त्यांना बळजबरीने पकडून नेले. त्यावेळी महरंग अवघी १६ वर्षांची होती. तिने पित्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला; पण ते सापडले नाहीत. मात्र, २०११ साली देहावर अत्याचाराच्या अनन्वित खूणा असलेले त्यांचे शव सापडले. बलुचिस्तानमध्ये चार घर सोडून प्रत्येकाच्या घरात हीच परिस्थिती. महरंगने याविरोधात आवाज उठवला. ज्यांचे आप्त अशा प्रकारे बेपत्ता केले गेले होते, मारले गेले, असे हजारो बलुच कुटुंब महरंगसोबत आले. पाकिस्तानी सैन्याचे अत्याचार थांबवावेत, पकडून नेलेल्या बलुची नागरिकांची सुटका व्हावी, अशी महरंगची मागणी. तिच्या मागणीला बलुचिस्तानमधील समस्त जनतेेने पाठिंबा दिला. इतकेच नव्हे तर पाकिस्तानमधील मानवाधिकार कार्यकर्ते आणि काही नामांकित पत्रकारांनीही महरंगच्या मागणीचे समर्थन केले. महरंगचे पुढे म्हणणे आहे की, पाकिस्तानी प्रशासनाने मागणी मान्य केली नाही, तर ती ’संयुक्त राष्ट्र संघा’च्या कार्यालयासमोर धरणे देणार आहे. दुसरीकडे पाकिस्तानी प्रशासनाने महरंगसोबतच्या महिलांना अटक केली. त्यांच्यावर अत्याचार केले. त्यामुळे बलुचिस्तान पेटून उठला आणि त्यांनी पाकिस्तानी सैन्यावर हल्ले केले. यावर पाकिस्तानातील समाजअभ्यासकांचे म्हणणे आहे की, ’पूर्व पकिस्तानामध्येही पाकिस्तानी सैन्याने दडपशाही हिंसा केली होती. त्यातूनच बांगलादेश निर्माण झाला. आता पाकिस्तानी सैन्य बलुचिस्तानसोबत हेच करत आहे. वेगळ्या बलुचिस्तानची बीजे पाकिस्तानी सैन्यानेच रूजवली आहेत.’ पाकिस्तानच्या निर्मितीमध्येच विनाशाची बीजे होती. ती विनाशाची बीजे आज पाकिस्तानच्या विध्वंसाची वृक्ष झाली आहेत. पाकिस्तानच्या मुस्लीम मानसिकतेला समजेल असे म्हणायचे, तर पाकिस्तानचे ‘कयामतचे दिन’ आले आहेत. पाकिस्तानची पापं जीवंत झाली आहेत. बलुच म्हणजे नवा बांगलादेशच!
९५९४९६९६३८