राज्यातील आदिवासी उद्योजकांना अटीशर्तींद्वारे खनन जमीन वितरण करण्याचा आदेश त्यांनी त्यांच्या अधिकाराने काढला. हा अधिकार काढल्यानंतर लगेचच त्यांनीच ही जमीन मिळवण्यासाठी अर्जही केला. त्यांच्यासोबत राज्यातील अनेकांनी अर्ज केले. मात्र, त्यांनी ती जमीन केवळ त्यांनाच मिळेल, असा निर्णय घेतला आणि ती जमीन त्यांनाच मिळाली. असे हे महाशय आहेत झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन. जन्माने आदिवासी असल्याचा कांगावा करत, हेमंत यांनी झारखंडमधील आदिवासींना अक्षरशः नागवलं. मुख्यमंत्रिपदासोबतच त्यांनी गृह तुरूंग कार्मिक प्रशासनिक सुधार राजभाषा कॅबिनेट सचिवालय आणि अनेक खाती स्वत:च्या अखत्यारित ठेवली. ही खाती एकमेकांशी संबंधित. एका खात्याद्वारे आदेश काढून त्यांनी दुसर्या खात्याच्या माध्यमातून त्या आदेशाचा लाभ घेण्यात जराही दिरंगाई केली नाही. झारखंड लुटखंडच आहे, असे त्यांचे वर्तन! झारखंडच्या साहिबगंज येथे ‘शिवशक्ती इंटरप्रायजेस’ला ११.७० एकर खनन भूमी दहा वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली. किती किमतीवर तर केवळ ९० लाखांमध्ये. दुसरीकडे ‘महाकाल स्टोन’लाही अशीच जमीन नाममात्र किमतीत दिली गेली. ११ एकरची आणखी एक खनन ‘सोहरीया’ नावाच्या कंपनीलाही दिली. ‘शिवशक्ती इंटरप्रायजेस’ हे अभिषेक प्रसाद याचे, तर ‘महाकाल स्टोन’ पंकज मिश्रा याचे. दोघेही हेमंत सोरेन यांचे सहकारी म्हणण्यापेक्षा पेरलेली माणसे, तर ‘सोहरीया’ कंपनी कुणाची, तर हेमंत यांची पत्नी कल्पना यांची. झारखंडसारख्या खनिज संपत्तीने समृद्ध असलेल्या राज्याचे हेमंत सोरेन यांनी जमेल त्या मार्गाने शोषण केले. वर कुणी याविरोधात ‘ब्र’ उच्चारला की हे महाशय म्हणायला तयार की, “मी आदिवासी म्हणून मला त्रास देत आहेत.” यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे मिळाल्यावर ‘ईडी’ने यांची चौकशी करण्याचे ठरवले, तर दहा वेळा समन्स बजावूनही ते गेले नाही. नंतर तर ४० तास गायबल होते म्हणे. आता अशी कुणकुण आहे की, ते त्यांच्या पत्नी कल्पना यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवतील. अगदी लालूंनी राबडीला जसे मुख्यमंत्री बनवले (बसविले) तसेच. कल्पना यांना सुरक्षित आमदारकीची जागा मिळावी, यासाठी काही महिन्यांपूर्वी झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार सरफराज यांनी आमदारकीचा राजीनामाही दिला आहे. एकूणच काय तर राबडी तर धन्य आहेतच, पण आता कल्पनाही कमी धन्य नाहीत!
झारखंडचे अंधकारमय भवितव्य
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना म्हणे राजकारणाचा गंध नाही. मग राजकारणाचा गंध नसताना केवळ पती भ्रष्टाचाराच्या गर्तेत गुंतला, तर त्याच्या पश्चात तीच धुरा सांभाळण्यासाठी कल्पना मुख्यमंत्री बनतील का? घराणेशाहीचा कळस तरी किती असावा? हेमंत हे शिबू सोरेनचे पुत्र, म्हणून शिबू नंतर तेच झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते. तेच नव्हे, तर त्यांची भावजय सीता सोरेन यांच्याही गळ्यात आमदारकीची माळ. दुसरीकडे महाराष्ट्रात राहणारा सुरेश नागर हा इसम सोरेन कुटुंबाचा नातेवाईक मित्र. पण, झारखंडच्या अनेक खनन उद्योगात याचीही भागीदारी. आताही हेमंत यांच्यावर भ्रष्टाचारामुळे कारवाई होऊ शकते, तर त्यांचे म्हणणे, ‘मी तुरुंगात गेलो तरी माझी लढाई लोक लढतील.’ का? लोक का बरं लढतील? खनन आणि हवाला भ्रष्टाचारातून मिळवलेली गडगंज संपत्ती काय हेमंत यांनी लोककल्याणासाठी मिळवली? झारखंड मुक्ती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सतरंज्या उचलायच्या आणि हेमंत यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी नातेवाईकांनी संपत्तीचे अंबार लुटून सात नव्हे, ७० पिढ्यांची भरपाई करायची. दुसरे असे की, हेमंत यांच्यावर नुसत्या भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल नाही, तर २०१३ साली मुंबईच्या आयेशा हिने हेमंत यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. हेमंत यांनी बलात्कार केला. क्रूर लैंगिक हिंसा केली, असा तिचा आरोप होता. याबद्दल वाच्यता करू नये, यासाठी तिला धमक्या देण्यात आल्या. २०२० साली तिला जीवे मारण्याचा प्रयत्नही झाला. तिने याबाबतही तक्रार नोंदवली. पण, आश्चर्यकारकरित्या या दोन्ही तक्रारी तिने मागे घेतल्या. तिने स्वतःहून मागे घेतल्या की, तिला तसे करण्यास भाग पाडले गेले, हे लहान मूलही सांगेल. या सगळ्या प्रकरणात कल्पना यांचे काय म्हणणे होते किंवा आहे? पती समाजाचे शोषण करून भ्रष्टाचार करून लेकीबाळींवर अत्याचार करून गुन्हेगारीची नवीनवी आख्यायिका घडवतोय. पण, आपल्याला काय त्याचे? आपल्याला संपत्ती, दागदागिने आणि घरोदारी बहुभाभीचा सन्मान मिळतोय बसं.... अशी भावना असणार्या कल्पना आहेत का? असे असेल तर पतीच्या पापात हिस्सेदारी असणार्या पत्नीने घर सांभाळो की राज्य, भवितव्य ते काय असणार म्हणा? झारखंडच्या आदिवासी बांधवांनो, याविरोधात एल्गार करणार की नाही?
९५९४९६९६३८