चेन्नई : “राम राजवाड्यात हजारो महिलांसोबत राहत होता आणि दारूही प्याला होता. तुम्ही ते तुमच्या मुलांसाठी उदाहरण म्हणून वापराल का? जगण्याची हिंमत नसल्याने त्याने सरयूमध्ये उडी मारून आत्महत्या केली. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या उदाहरणाने वाढवाल का? हा कसला मूर्खपणा? रामाने स्वतःच्या पत्नीवर संशय घेतला आणि तिला जंगलात पाठवले, तुम्ही लोक हे उदाहरण म्हणून दाखवाल का?" प्रभू श्रीरामाबद्दल असे वादग्रस्त वक्तव्य तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या निकटवर्तीय आणि द्रविड कळघम तमिझार पेरीवाईच्या सरचिटणीस उमा इलैक्किया यांनी केले आहे.
तामिळ भाषेत दिलेल्या भाषणात त्यांनी प्रभू रामाच्या चारित्र्याबद्दल असभ्य आणि अयोध्येतील राम मंदिराबाबत आक्षेपार्ह गोष्टी बोलल्या. १३ जानेवारी २०२४ रोजी झालेल्या बैठकीत तमिळ संघटनेच्या द्रविड कळघम तमिझार पेरीवाईच्या सरचिटणीस उमा इलैक्किया यांनी या अपमानास्पद गोष्टी सांगितल्या. त्यांच्या भाषणाच्या व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
आपल्या भाषणात त्या एवढ्यावरच थांबल्या नाहीत. पुढे बोलताना ती म्हणाली, “राम हा खुनी होता. त्याने स्वत:ला लपवून बळीचा वध केला आणि शंबुक ध्यान करत असताना त्याने कारण न विचारता त्याचे डोके कापले. अशा प्रकारची व्यक्ती तुमच्या मुलांसाठी आदर्श आहे का?” उमा इलैक्किया यांनीही आपल्या भाषणातून राम मंदिरावर सुद्धा टीका केली आहे.
ती म्हणाली, "राम मंदिर हे रामाच्या बालस्वरूपासाठी बांधले आहे. हे मंदिर त्यांच्या जन्मस्थानी बांधले आहे, असा सपशेल खोटारडेपणा करून हे मंदिर बांधले आहे. त्यासाठी त्यांना न्यायालयाकडून आदेशही मिळाला आहे. या मंदिराचा पत्ता काय असेल? बाबरी मशिदीवर बांधलेले राम मंदिर किंवा रामजन्मभूमी. तुम्ही एक मंदिर बांधले आहे जिथे एकेकाळी मशीद होती."
प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या उमा इलैक्किया या स्टॅलिन कुटुंबातर्फे चालवल्या जाणाऱ्या कलैगनर सेठीगल येथे अँकर आहेत. तमिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि त्यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांच्यासोबतही त्यांचे अनेक फोटो समोर आले आहेत.