ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर

30 Jan 2024 20:21:35
Maharashtra Bhushan Award to Ashok Saraf

मुंबई :
दमदार अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात घोषणा केली. कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
 
मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत त्यांचे अभिनंदन केले. सराफ यांनी मराठी बरोबरच हिंदी चित्रपटसृष्टीतही आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांचा जन्म मुंबईतील चिखलवाडी येथे झाला, बालपणही तेथेच गेले. वयाच्या अठराव्या वर्षापासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. शिरवाडकरांच्या ययाती आणि देवयानी या व्यावसायिक नाटकातून त्यांनी रंगमंचावर पदार्पण केले. दादा कोंडके यांच्या पांडू हवालदार मधील इरसाल पोलीस, राम राम गंगाराम मधील म्हमद्या खाटिक यांसारख्या बहुरंगी भूमिका त्यांनी साकारल्या. लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगांवकर यांच्यासोबत त्यांनी मराठी विनोदी चित्रपटांची मालिकाच केली.

आपले कामाचे क्षेत्र मर्यादित न ठेवता त्यांनी विनोदी, खलनायक तसेच गंभीर पात्रेही पडद्यावर साकार केली आणि त्यातून आपली वेगळी शैली निर्माण केली. ८० च्या दशकात अशोक आणि लक्ष्या या जोडीने रुपेरी पडद्यावर धमाल उडवून दिली. अशी ही बनवाबनवी, धुमधडाका, दे दाणादाण यांसारख्या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी मराठी प्रेक्षक वर्गास पोटभरुन हसवले.

पुरस्काराचे स्वरूप असे...

महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा राज्यातील सर्वौच्च नागरी सन्मान आहे. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि रुपये २५ लाख असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. आरोग्यसेवा, उद्योग, कला, क्रीडा, पत्रकारिता, लोकप्रशासन, विज्ञान आणि समाजसेवा या क्षेत्रांत केलेल्या विशेष योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. या क्षेत्रात महाराष्ट्राचे नाव देशात आणि जगभर नेणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार देण्यास सन १९९५ पासून सुरुवात झाली.

आतापर्यंतचे महाराष्ट्र भूषण पुरस्कारार्थी
 
१९९६ - पु. ल. देशपांडे - साहित्य
१९९७ - लता मंगेशकर - कला, संगीत
१९९९ - विजय भटकर - विज्ञान
२००० - सुनील गावसकर - क्रीडा
२००१ - सचिन तेंडुलकर - क्रीडा
२००२ - भीमसेन जोशी - कला, संगीत
२००३ - अभय बंग आणि राणी बंग - समाजसेवा व आरोग्यसेवा
२००४ - बाबा आमटे - समाज सेवा
२००५ - रघुनाथ माशेलकर - विज्ञान
२००६ - रतन टाटा - उद्योग
२००७ - रा.कृ. पाटील - समाजसेवा
२००८ - नानासाहेब धर्माधिकारी - समाजसेवा
२००८ - मंगेश पाडगावकर - साहित्य
२००९ - सुलोचना लाटकर - कला, सिनेमा
२०१० - जयंत नारळीकर - विज्ञान
२०११ - अनिल काकोडकर - विज्ञान
२०१५ - बाबासाहेब पुरंदरे - साहित्य
२०२१ - आशा भोसले - कला, संगीत
२०२३ - अप्पासाहेब धर्माधिकारी - समाजसेवा
Powered By Sangraha 9.0