बाळासाहेबांचे सुपुत्र त्यांच्या पिताश्रींचे एकच वाक्य अनेक वेळा उच्चारीत असतात. पण, बाबरी घुमटावर चढलेल्या कारसेवकांचीही छायाचित्रे उपलब्ध आहेत. त्यातील शिवसैनिक कोण होता? हे उद्धव ठाकरे कधीही सांगत नाहीत; कारण, त्यात एकही शिवसैनिक नव्हता. न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा हा हास्यास्पद प्रकार आहे. कारागृहात गेले संघ विचारधारेचे कार्यकर्ते, गोळ्या खाल्ल्या संघ विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी, कष्ट सोसले संघ विचारधारेतील कार्यकर्त्यांनी; परंतु ते कधीही आपल्याकडे श्रेय घेत नाहीत. ही त्यांची महानता आहे!
रामजन्मभूमीवरील राम मंदिराचे लोकार्पण दि. २२ जानेवारीला होणार आहे. देशातील मान्यवरांना ‘श्रीराम रामजन्मभूमी तीर्थक्षेत्रा’तर्फे निमंत्रणदेखील पाठविण्यात आले आहे. निमंत्रण पत्रावर चंपतराय महासचिव, श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र यांची सहीसुद्धा आहे. मलाही निमंत्रण आले आहे. चंपतराय हे संघ प्रचारक असून त्यांच्याकडे विश्व हिंदू परिषदेचे दायित्व आहे.
एवढे सगळे लिहिण्याचे कारण असे की, मंदिर लोकार्पणाचा कार्यक्रम भाजपचा नाही. भाजपच्या केंद्रीय मंत्र्याने निमंत्रण दिलेले नाही किंवा भाजपच्या केंद्रीय सचिवाने कुणाला निमंत्रण दिलेले नाही. ते दिले गेले असते, तर भाजपचा हा राजकीय कार्यक्रम आहे, असे म्हणता आले असते. परंतु, ‘घमेंडिया गँग’मधील पक्षांना एवढा साधा विषय कळत नाही. कारण, ते भलत्याच राजकीय घमेंडीत आणि घराणेशाहीत जगणारे राजनेते आहेत.
महाराष्ट्रातील त्यातील मुख्य पात्र म्हणजे, श्रीमान उद्धव ठाकरे. राममंदिर लोकार्पणाचा कार्यक्रम भाजपचा कार्यक्रम आहे, हा त्यांनी लावलेला अजब शोध आणि त्यांचा पोपट रोज सकाळी चिरचिर करताना तोंडात येईल, ते बडबडत असतोच. रामजन्मभूमी लोकार्पणाचा कार्यक्रम हा ‘श्रीराम रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासा’चा आहे. कोट्यवधी रामभक्तांचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम होणार आहे. रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनातील नरेंद्र मोदी एक रामभक्त होते. तेव्हा ते मंत्रीदेखील नव्हते.
रामजन्मभूमीवर आक्रमक बाबराने भव्य राम मंदिर पाडून, त्या राम मंदिराच्या स्तंभांवरच तीन घुमट बांधले. त्याचे नामकरण झाले-बाबरी मशीद. जन्मभूमी मुक्ती संग्रम ५०० वर्षे चालला आणि त्याचा शेवट सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने झाला. शेवटच्या टप्प्याची लढाई ही १९८६ पासून सुरू झाली. १९८६ पासून न्यायालयाने बाबरी ढाँच्याचे कुलूप उघडण्याचा निर्णय दिला. त्या बाबरी ढाँच्यामध्ये १९४९ पासून रामललाच्या मूर्ती कैदेत होत्या. त्या दर्शनार्थ मोकळ्या झाल्या आणि तिथून रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनाने शेवटच्या टप्प्याला सुरुवात केली.
या शेवटच्या टप्प्याचे तीन शूर सेनापती होते. एक, रा. स्व. संघाचे तृतीय सरसंघचालक बाळासाहेब देवरस आणि दोन, मोरोपंत पिंगळे आणि तिसरे अशोकजी सिंघल. यशस्वी लढा पाहण्यासाठी ते तिघेही आज हयात नाहीत. परंतु, त्यांनी सर्व प्रकारच्या विपरीत परिस्थितीत हा लढा धैर्याने आणि निर्धाराने पुढे नेला आणि नंतरच्या सर्व संघ आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी तो यशस्वी केला. चंपतराय यांची रामजन्मभूमी खटल्यातील भूमिका ही अतिशय निर्णायक ठरली.
जेव्हा रामजन्मभूमीवरील रामललाच्या मंदिराचे ताळे उघडण्यात आले, तो दिवस माझ्या आजही चांगलाच स्मरणात आहे. १९८६ साली उत्तन जवळील केशवसृष्टीत मुंबई महानगराचे शिबीर होते. मी त्या शिबिराचा कार्यवाह होतो. शिबीर काळात बातमी आली आणि सर्व शिबिरात आनंदाचे वातावरण पसरले. शिबिराच्या भोजनाचे संकेत बाजूला ठेवून, सर्वांचे तोंड गोड करण्यात आले. रामजन्मभूमी मुक्ती संग्रमाचा पुढचा आराखडा कसा असेल, हे आम्हाला माहीत नव्हते. नंतर एकात्मता रथयात्रा, अयोध्येतील कारसेवा, शीलान्यास या मार्गाने हा सर्व प्रवास झाला. हा सर्व लढा संघ विचारसृष्टीतील सर्व संस्थांनी एकदिलाने दिला. या लढ्यात शिवसेनेचा एकही शिवसैनिक नव्हता.
‘तो’ नव्हता याचा त्याला दोष देण्यात काही कारण नाही. ’मातोश्री’वरून त्याला आदेशच आला नाही, तर तो काय करणार? हात बांधून घरी बसण्याशिवाय त्याला काही करता येण्यासारखे नव्हते. १९९०ची कारसेवा रक्तरंजित झाली. या कारसेवेत कोठारी बंधू हुतात्मे झाले. शरयू नदीच्या पुलावरून नदीत पडून, अनेक जणं दगावले. मुलायमसिंग यांनी गर्जना केली होती की, ‘अयोध्या में परिंदा भी पर नहीं मार सकता।’
मुलायमसिंगच्या दर्पोक्तीला कारसेवकांनी काहीही भीक घातली नाही. अयोध्येकडे जाणार्या रेल्वे डब्यांतून ते मध्येच उतरले आणि काही जणं शंभर एक किलोमीटरची पायपीट करत, शेतातून अयोध्येला पोहोचले. खेड्यापाड्यातील रामभक्तांनी त्यांचे श्रद्धापूर्वक स्वागत केले. या कारसेवकांच्या जथ्यात एकही शिवसैनिक नव्हता, एकही शिवसेनेचा आमदार नव्हता की, एकही नगरसेवक नव्हता. आता प्रमाणे तेव्हादेखील त्यांनी हा कार्यक्रम भाजपचा ठरवून टाकला होता. राजकारणापलीकडे कसलाच विचार करायचा नाही, अशी बुद्धी फिरली की सगळ्याच विषयात राजकारण दिसू लागतं.
शेवटी तो दिवस आला. दि. ६ डिसेंबर १९९२ला दुसर्या कारसेवकांनी बाबरी ढाँचा जमीनदोस्त केला. जमीनदोस्त करणारे सर्व कार्यकर्ते हिंदुत्व विचार परिवारातील होते. कारसेवकांचे मार्गदर्शन करण्यासाठी उमा भारती, साध्वी ॠतंबरा, हो. वे. शेषाद्री, लालकृष्ण अडवाणी असे नेते उपस्थित होते. त्यांची तशी छायाचित्रेही उपलब्ध आहेत. यात शिवसेनेचा एकही नेता नव्हता. हे सगळे शूर नेते तेव्हा त्यांच्या पद्धती प्रमाणे डरकाळ्या फोडीत होते. त्या आंदोलनात गुंतलेल्या सगळ्यांना ती मांजरेची म्याँव म्याँव वाटत होती.
दि. ६ डिसेंबरला बाबरी ढाँचा जमीनदोस्त झाला. जन्मस्थानावरील राम मंदिराचा एक अडथळा कायमचा संपला. आंदोलनाचे सेनापती लालकृष्ण अडवाणी यांनी तेव्हा एक निवेदन केले की, ‘बाबरी मशीद पडण्याचा दिवस हा माझ्या आयुष्यातील दुर्दैवी दिवस आहे.’ त्यांना असे म्हणायचे होते की, ‘हा ढाँचा पाडणे हा आमचा कार्यक्रम नव्हता. पाडणार्या कारसेवकांना आम्ही रोखू शकलो नाही.’ लालकृष्ण अडवाणी हे मर्यादाशील राजकारण करणारे राजनेते होते. परंतु, त्यांच्या या वक्तव्याचा विपरीत अर्थ घेऊन, बाळासाहेब ठाकरे म्हणाले की, ‘शिवसैनिकांनी बाबरी ढाँचा पाडला!’
त्यांचे सुपुत्र पिताश्रींचे वाक्य अनेक वेळा उच्चारीत असतात. बाबरी घुमटावर चढलेल्या कारसेवकांचीही छायाचित्रे उपलब्ध आहेत. त्यातील शिवसैनिक कोण होता? हे उद्धव ठाकरे कधी सांगत नाहीत; कारण, त्यात एकही शिवसैनिक नव्हता. न केलेल्या कामचे श्रेय लाटण्याचा, हा हास्यास्पद प्रकार आहे. कारागृहात गेले संघ विचारधारेचे कार्यकर्ते, गोळ्या खाल्ल्या संघ विचारधारेच्या कार्यकर्त्यांनी, कष्ट सोसले संघ विचारधारेतील कार्यकर्त्यांनी; परंतु ते कधीही आपल्याकडे श्रेय घेत नाहीत. ही त्यांची महानता आहे!
म्हणून नम्रपणे उद्धवजींना सांगावेसे वाटते की, राजकारणासाठी उदंड विषय आहेत, त्यावर आरोळ्या ठोकून राजकारण करा. न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचे बंद करा आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे रामाचे दर्शन घेण्यासाठी अयोध्येला जाऊन या. त्यातून मते मिळतील की नाही, मला माहीत नाही; पण पुण्य प्राप्ती जरुर होईल!
९८६९२०६१०१