डॉ. मंगेश बनसोड : प्रयोगक्षम रंगकर्मी

03 Jan 2024 20:34:56
Dr Mangesh bansod

गेल्या २०-२५ वर्षांपासून नाट्य क्षेत्रात विविध प्रयोग करणारे प्रयोगक्षम रंगकर्मी आणि नाट्यशास्त्राचे प्राध्यापक डॉ. मंगेश बनसोड यांच्याविषयी...

डॉ. मंगेश बनसोड यांचे मूळ गाव यवतमाळ जिल्ह्यातील नेर परसोपंत. त्यांचे प्राथमिक शिक्षण नेरच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यानंतर शासकीय विद्यानिकेतन, अमरावती येथून त्यांनी माध्यमिक शिक्षण घेतले. मग पुढे त्यांनी शिवाजी विज्ञान महाविद्यालय, अमरावती येथून विज्ञान शाखेतून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर मात्र आपल्या भावाप्रमाणे आपणही नाट्य क्षेत्रात करिअर करावे, असे डॉ. मंगेश बनसोड यांना वाटले. त्यामुळे त्यांनी मराठवाडा विद्यापीठातून ‘नाट्यशास्त्र’ विषयात पदवी आणि पदविकेचे शिक्षण घेतले.

खरंतर डॉ. मंगेश बनसोड हे मध्यमवर्गीय कुटुंबातले. त्यांचे आईवडील दोघेही शिक्षक होते. डॉ. मंगेश हे लहानपणापासून नाटकात काम करत होते. त्यांचे नाटकातील पहिले गुरू म्हणजे त्यांचे सख्खे मोठे बंधू अविश वत्सल. त्यामुळे शाळेतही नाटकाची जबाबदारी त्यांच्याकडेच दिली जायची. मराठवाडा विद्यापीठात डॉ. दिलीप घारे, प्रा. यशंवत देशमुख, लक्ष्मण देशपांडे यांसारख्या अनेक रंगकर्मींचे मार्गदर्शन डॉ. बनसोड यांना लाभले. त्यानंतर १९९१ मध्ये कला क्षेत्रात भविष्य आजमावण्यासाठी डॉ. बनसोड मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्यांनी मराठी विषयात ’एमए’ आणि ’बीएड’चे शिक्षण घेतले. त्यावेळी समविचारी मित्रासोबत त्यांनी साहाय्य दिग्दर्शक म्हणून मालिकांमध्ये काम करायलाही सुरुवात केली.

दरम्यान, मधल्या काळात राष्ट्रीय नाट्य विद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी त्यांनी चार वेळा प्रयत्न केले. पण, अपुर्‍या मार्गदर्शनामुळे आणि सोईसुविधांमुळे त्यांना शेवटच्या फेरीत जाऊनही प्रवेश मिळवता आला नाही. पण, त्यांची शिकण्याची आवड जीवंत होती. पुण्यात १९९० मध्ये ’एनएसडी’च्या कार्यशाळेत ते विद्यार्थी म्हणून सहभागी झाले. त्यानंतर २००४ मध्ये ’नाटक’ या विषयात संशोधन करावे म्हणून त्यांनी अरूण कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ’तमाशा थिएटर’ या विषयात ’पीएचडी’ प्राप्त केली.

त्यावेळी डॉ. बनसोड यांना पत्नी श्यामल गरूड आणि संपूर्ण कुटुंबाचीच मोलाची साथ लाभली. डॉ. बनसोड वेगवेगळ्या कविसंमेलनांतही सहभाग नोंदवत असून, त्यांचा ’मी येणार्‍या पिढीची दिशा घेऊन फिरतोय’ हा कवितासंग्रह प्रकाशित झाला. परंतु, कला क्षेत्रात काम मिळवण्यासाठी डॉ. मंगेश बनसोड यांना खूप संघर्ष करावा लागला. या संघर्षाच्या काळात विक्रोळीच्या विकास करिअर महाविद्यालयात बनसोड आणि भालचंद्र कुबल यांनी नाट्यशास्त्र विभाग सुरू केला. त्यानंतर सिद्धार्थ महाविद्यालय, मुंबई आणि नागपूरच्या वसंतराव नाईक महाविद्यालय येथे मराठी विभागात प्राध्यापक म्हणूनही त्यांनी काम केले.

त्यानंतर त्यांच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा सुरू झाला. ते मुंबई विद्यापीठाच्या ’अ‍ॅकडमी ऑफ थिएटर आर्ट्स’मध्ये साहाय्यक प्राध्यापक म्हणून २००६ साली रुजू झाले. ’तमाशा’, ’लोटन’, ’विच्छा माझी पुरी करा’, ’निशाणी डावा अंगठा’, ’मी लाडाची मैना तुमची’ यांसारख्या नाटक आणि लोकनाट्यांतून दिग्दर्शक म्हणून त्यांनी वेगवेगळे प्रयोग रंगभूमीवर केले. त्यानंतर २०१५ मध्ये डॉ. मंगेश बनसोड ’अ‍ॅकडमी ऑफ थिएटर आर्ट्स’च्या प्रभारी संचालक पदावर रुजू झाले. त्यावेळी त्यांनी मुंबई विद्यापीठातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील नाट्य महोत्सव आणि नाट्य परिषदांचे आयोजनही केले. विद्यार्थ्यांना विविध दिग्दर्शकांच्या हाताखाली शिक्षण घेता यावे, यासाठी विजय केंकरे, सई परांजपे, नादिरा बब्बर, पुरुषोत्तम बेर्डे, रणजित कपूर, असील रईस यांसारख्या मराठी-हिंदी रंगभूमीवर काम करणार्‍या, मातब्बर मंडळींना त्यांनी अ‍ॅकडमीत आणून विविध विषय आणि शैलीतील नाटकांची निर्मिती विद्यार्थ्यांसाठी केली.

दरम्यान, प्रारंभीच्या संघर्षकाळात ’अमृतमंथन,’ ‘आकाश पेलताना’, ’अरे संसार संसार’ या मालिका आणि ’लेक लाडकी या घरची’, ’प्रारंभ’, ‘नवरा मुंबईचा’ या चित्रपटांमध्ये साहाय्यक दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले. ’तमाशा ः रूप आणि परंपरा’ या पुस्तकाचे ते लेखक आहेत. गेल्या २० वर्षांपासून कविता, लेख, समीक्षण संबंधी त्यांचे लेखन विविध वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाले आहे. नुकतेच २०२२ मध्ये ग्रीसमध्ये ’मेकिंग ऑफ थिएटर’ या आंतरराष्ट्रीय महोत्सवात जगभरातील १२० नाट्य प्रशिक्षकांपैकी १४ प्रशिक्षकांची निवड झाली होती. त्यातील भारतातील एकमेव नाट्य प्रशिक्षक म्हणून डॉ. मंगेश बनसोड यांची निवड झाली होती. तसेच आतापर्यंत सहा विद्यार्थी बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली ’पीएचडी’ करत आहेत.

तसेच ओमप्रकाश वाल्मिकी यांचे ’जूठन’ हे आत्मचरित्रही त्यांनी ’उष्ट’ या नावाने अनुवादित केले आहे. तसेच त्यांना अभिनय, दिग्दर्शन, लेखन यांसाठी अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. ’कवी अरुण काळे सम्यक पुरस्कार’, ’उष्ट’ या अनुवादासाठी ’बलुतं पुरस्कार’, सामाजिक आणि उच्च शिक्षण (कला) क्षेत्रासाठी ’महात्मा गांधी पुरस्कार’ त्यांना प्रदान करण्यात आला आहे. तरी भविष्यात उत्तम नाट्यकला कृतींची निर्मिती करण्याचा आणि चित्रपट क्षेत्रात नव्या संहितेसह नवीन प्रयोग करण्याचा डॉ. मंगेश बनसोड यांचा मानस आहे, तरी त्यांना पुढील वाटचालीसाठी ’दै. मुंबई तरूण भारत’कडून शुभेच्छा!


-सुप्रिम मस्कर 


Powered By Sangraha 9.0