कोलंबियातील प्रवाळ धोक्यात

29 Jan 2024 21:32:14
CORAL REEF 
 
दक्षिण अमेरिकेतील कोलंबियाच्या कॅरिबियन किनार्‍यालगतच्या प्रवाळांवर समुद्राच्या वाढत्या तापमानाचा परिणाम झाल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. किनार्‍यालगतच्या प्रवाळांचे ‘कोरल ब्लीचिंग’ वाढत असल्याची माहिती ‘कोरालेस दे पाझ’ या संस्थेने तयार केलेल्या अहवालात समोर आली आहे. या संस्थेने गेल्या वर्षी जुलै महिन्यात रिंकॉन डेल मार, पिको डे नॉफ्रागो आणि कँटो डेल मेरी शहरांजवळील कोस्टल प्रवाळ खडकांचे सर्वेक्षण केले होते. या अभ्यासातून समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे २५ टक्के ‘हार्ड कोरल’ वसाहतींमध्ये काही प्रमाणात ‘ब्लीचिंग’ दिसून आले. समुद्री प्रवाळ म्हणजे लाखो प्रजातींच्या अस्तित्वाची गुरुकिल्ली. हे प्रवाळ असंख्य किनारी समुदायांच्या अन्न सुरक्षिततेमध्ये योगदान देतात. परंतु, जागतिक तापमानवाढीच्या समुद्रावरील परिणामुळे प्रवाळांची परिसंस्था देखील धोक्यात आली आहे.
 
हवामान बदलामुळे समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढते आणि त्याचाच दुष्परिणाम म्हणजे ‘कोरल ब्लीचिंग.’ त्याचबरोबर प्रदूषण आणि महासागरातील आम्लीकरणाचा प्रवाळांवर गंभीर परिणाम होतो. प्रवाळांवर तापमानामुळे तणाव वाढू लागला की, ते त्यांच्या आत राहणार्‍या लहान शैवालांना बाहेर काढतात, ज्यामुळे हे ‘ब्लीचिंग’ होते. हे शैवाल प्रवाळांना आवश्यक असलेली पोषणतत्वे पुरवतात. जेव्हा हे शैवाल (एकपेशीय वनस्पती) बाहेर काढले जातात, तेव्हा प्रवाळांकडे खाण्यासाठी काहीही नसते. उच्च तापमानाची स्थिती दीर्घकाळ टिकून राहिल्यास, प्रवाळ उपासमारीने मरण्याची शक्यता या अभ्यासात व्यक्त करण्यात आली आहे. कुठल्याही परिसंस्थेमध्ये एका जीवावर आघात झाल्यास, त्याचा परिणाम सर्वदूर हानी पोहोचवतो. या ‘हार्ड कोरल’ प्रवाळांना धोका निर्माण झाल्यावर, ‘डोमिनो इफेक्ट’ अमलात येतो. परिणामी, जैवविविधतेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. पर्यटन आणि मत्स्यव्यवसायातून नफा कमी झाल्यामुळे, त्याचा अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो. रिंकॉन डेल मारच्या मोहिमेमध्ये असे आढळून आले की, मोरोस्क्विलोच्या आखातातील उच्च तापमानामुळे ‘ब्लीचिंग’च्या घटना घडल्या आहेत. निरीक्षणादरम्यान, समुद्राचे तापमान सुमारे ३१ डिग्री सेल्सिअस (८७.८ डिग्री फॅरेनहाईट) होते. या मोहिमेने या भागात प्रथमच सॅम्पलिंग केले होते, हे लक्षात घेता, कोरलेस डी पाझ यांच्याकडे त्यांच्या निष्कर्षांची तुलना करण्यासाठी कोणताही पूर्वीचा डाटा नव्हता. भूतकाळाच्या तुलनेत परिस्थिती कशी आहे, याची पुष्टी करणे संस्थेला शक्य नव्हते.
 
सांता मार्टामध्ये अभ्यासकांना अधिक गुंतागुंतीची परिस्थिती आढळली. पुंता वेनाडो येथे केलेल्या अभ्यासात असे आढळून आले की, २८ टक्के कोरल ‘ब्लीच’ झाले आहेत. या गटाने चार वर्षांपासून कार्टाजेना खाडीतील वराडेरो परिसराचे निरीक्षण केले असता, समुद्राच्या वाढत्या तापमानाचा खडकांवर गंभीर परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. नीट पाहिले, तर वराडेरोचे प्रवाळ खडक ‘कॅनाल डेल डिक’ या खाडीच्या मुखाशी स्थित आहेत. या क्षेत्रात पोषक तत्त्वे, गाळ आणि प्रदूषणामुळे पाण्यात प्रकाश पोहोचत नाही. तरीही तेथे प्रवाळ तग धरून आहेत. २०२३ मध्ये दि. २४ आणि २५ ऑगस्टदरम्यान पार पडलेल्या, कोरलेस डी पाझच्या शेवटच्या मोहिमेत, अभ्यासकांना वाराडेरो येथे ४१ टक्के प्रवाळ आढळले. ही आकडेवारी सांता मार्टा आणि प्रोविडेन्सिया यांसारख्या इतर क्षेत्रांच्या तुलनेत लक्षणीय आहे. हा एक आश्चर्यकारक शोध असला, तरी प्रवाळ खडकांवर समुद्रातील उष्ण पाण्याचा परिणाम होत आहे, यात काही शंका नाही.
 
कोलंबियाच्या कॅरिबियन किनारपट्टीवर, प्रवाळांचे आच्छादन वाढवण्याच्या उद्देशाने विविध पुनर्संचय प्रकल्प राबविले जात आहेत. परंतु, जेव्हा समुद्राचे तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त असते, तेव्हा असे प्रयत्न फोल ठरतात. जोपर्यंत कोरल परिपक्व होत नाहीत आणि पुनर्संचयित साईटवर परत हलवण्यास तयार होत नाहीत, प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेमुळे प्रवाळांवर ताण पडतो, समुद्राच्या तापमानात वाढ झाल्याने तणाव वाढतो. ‘कोरालेस दे पाझ’ने आपल्या पहिल्या मोहिमेतील माहिती तेथील सरकारकडे सुपूर्द केली आणि जवळपासच्या भागात देखरेखीचे प्रयत्न वाढवण्यास सांगितले. या अभ्यासामुळे सरकार तसेच सर्व भागधारक माहितीपूर्ण निर्णय घेऊ शकतील आणि ‘ब्लीचिंग’ घटनांचा सामना करण्यासाठी कृती करू शकतील.
Powered By Sangraha 9.0