सातारा : साताऱ्यातील कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का बसला असून याची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल एवढी असल्याचे सांगण्यात येत आहे. रविवार, २८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी हा भुकंप झाला आहे. दरम्यान, भुकंपामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.
साताऱ्याच्या कोयना, पाटण भागात ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का जाणवला आहे. याचा केंद्रबिंदु हेळवाकपासून ६ किलोमीटर अंतरावर असून सुदैवाने यात कोणतेही नुकसान झाले नसल्याची माहिती पुढे आली आहे. नागरिकांनी कोणतीही भीती न बाळगण्याचे आवाहन धरण व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. तसेच या भुकंपामुळे कोयना धरणालाही कोणताच धक्का बसला नसल्याचे सांगण्यात येत आहे.