मुंबई (विशेष प्रतिनिधी): दरवर्षी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक समुद्री पक्षी आशियात स्थलांतर करत असतात. आर्क्टिक सर्कलवरुन अगदी हिमालयाच्या पट्ट्यातुन आंतरराष्ट्रीय पातळीवर स्थलांतर करणाऱ्या या पक्ष्यांचे मुंबईसह अनेक महाराष्ट्राच्या अनेक किनाऱ्यावर दर्शन होते.
समुद्र किनाऱ्यांपेक्षी ही खाडी किनारी अधिक आढळणाऱ्या या पक्ष्यांमध्ये कॉमन रेडशँक, कॉमन सँडपाईपर, मार्श सँडपाईपर, कर्लिव सँडपाईपर, ग्रे प्लोवर, पॅसिफिक गोल्डन प्लोवर अशा परदेशी पक्ष्यांच्या प्रजातींचा समावेश आहे. कॉमन रेडशँक आणि कॉमन सँडपाईपर हे पक्षी हिमालयामध्ये प्रजनन करतात तर, ब्राऊन हेडेड गल हे पक्षी पॅंगोला येथे प्रजनन करतात. किनाऱ्यावर असणारे विविध प्रकारचे पॉलिसाईट वर्म्स, खेकड्यांच्या प्रजाती, अळ्या असे या स्थलांतरित पक्ष्य़ांचे आवडते खाद्य असून ते खाडी परिसरात अधिक दर्शन देतात. विशेष म्हणजे, मोठ्या अंतराच्या पट्टयातील स्थलांतर करणारे हे पक्षी असून ते मुख्यत्वे तपकिरी, काही प्रमाणात काळे, राखाडी तर काही प्रमाणात सफेद रंगांमध्ये ही आढळुन येतात. यांच्या खाण्याच्या पद्धतींमुळे या पक्षी प्रजातींचे परिसंस्थेमध्ये वेगळे महत्त्व असून त्यांच्या स्थलांतराच्या काळातही ते परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. यामुळे यातील काही पक्षी खोल पाण्याजवळ, काही किनारी भागातील पाण्याजवळ तर काही किनाऱ्यावरीलल अगदी कोरड्या भागात (Foraging) किडे किंवा अळ्या खाताना आढळुन येतात.
साधारणपणे, ऑगस्ट महिन्यापासुनच हे पक्षी भारतात दिसायला सुरूवात होत असून जवळपास यातील काही प्रजातींचे अगदी वर्षभर ही दर्शन होते. मुंबईतील महाराष्ट्र नेचर पार्कच्या मागचा परिसर, ठाणे खाडी, वसई-विरारचा काही भाग या क्षेत्रांमध्ये या पक्ष्यांचे दर्शन करता येते. त्याचबरोबर, या पक्ष्यांच्या निरिक्षणासाठी भरती ओहोटीच्या वेळा तपासुन गेल्यास ओहोटीच्या वेळी या पक्ष्यांचे उत्तम दर्शन घडू शकते, अशी माहिती पक्षी अभ्यासक प्रथमेश देसाई यांनी मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. समुद्री आणि विशेषतः किनारी स्थलांतरित पक्ष्यांच्या स्थलांतराच्या अभ्यासासाठी बीएनएचएस (बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी) या संस्थेने बर्ड रिंगींग ही केले होते.
"आंतरराष्ट्रीय स्थलांतर करणाऱ्या या पक्ष्यांच्या स्थलांतरा मार्गात अनेक अडथळे निर्माण झाले आहेत. विविध बांधकामे आणि त्यामुळे बदललेल्या खुणा यांमुळे पक्ष्यांच्या स्थलांतरावर काही प्रमाणातच परिणाम झाले आहेत. त्याचबरोबर, खाडी परिसरात येणाऱ्या या पक्ष्यांच्या अधिवासालाच पोहोचत असलेल्या धोक्यांमुळे त्यांना ही धोका निर्माण होत आहेत."
- प्रथमेश देसाई
पक्षी अभ्यासक, डोंबिवली