'इस्रायल-‘हमास’ युद्धात हुती बंडखोरांनी ’हमास’ला समर्थन देत, लाल समुद्रात व्यापारी जहाजांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे जागतिक व्यापारात अडथळा निर्माण झाला आहे. अमेरिकेच्या नेतृत्वात पाश्चिमात्य देशांनी या हल्ल्याचा प्रतिकार आक्रमक पद्धतीने केला. या उलट भारताने हुती बंडखोरांचा प्रतिकार करण्यासाठी संयमी भूमिका घेतली आहे. भारताने संवादाचे धोरण स्वीकारत, हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. हुती बंडखोरांचे लक्ष्य थेट कधी भारत नव्हतेच; मात्र ब्रिटन, अमेरिकेसह हुतींविरोधात आघाडी उतरविणार्या जहाजांना हुती लक्ष्य करत आहेत. दुर्दैव म्हणजे, या सर्व जहाजांवर काम करणारे क्रू मेंबर्स हे प्रामुख्याने भारतीयच असतात. परिणामी, या सर्वांची जबाबदारी येऊन पडते, ती भारतीय नौदलावर.
अमेरिकेसह संपूर्ण पाश्चिमात्य देशांची डोकेदुखी बनलेल्या लाल समुद्रातील हुती बंडखोरांचा सामना यापूर्वीही एकदा भारतीय नौदलाशी झाला आहे. लाल समुद्र मार्गाद्वारे जाणार्या जहाजांवर हुती बंडखोरांचे हल्ले सुरूच आहेत. विशाल समुद्रात हुतींच्या ड्रोन हल्ल्यांना रोखणे कठीण होऊन बसते. मात्र, या सर्वांच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदल कटिबद्ध असल्याचे, यापूर्वी केलेल्या कारवायांतून स्पष्ट झाले आहे. शनिवार, दि. २७ जानेवारी रोजी भारतीय नौदलाने अशीच एक कर्तबगारी दाखवली.
‘एमव्ही लॉण्डा’ नामक जहाजावर हुती बंडखोरांनी ड्रोन हल्ला केला. अरबी समुद्रातील एडनच्या खाडीत एका मालवाहू जहाजावर हा हल्ला झाला. परिणामी, मालाचे नुकसान तर झालेच; मात्र संपूर्ण जहाज आगीच्या भक्ष्यस्थानी आले होते. हल्ल्याची माहिती मिळताच,भारतीय नौदलाचे लढाऊ जहाज ‘आयएनएस विशाखपट्टणम’ घटनास्थळासाठी रवाना झाले. त्यानंतर भारतीय नौदलाने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. ग्राऊंड झिरोवर उतरून नौदलाच्या अग्निरक्षकांनी या २३ जणांचे प्राण वाचविले. दि. २६ जानेवारीला येमेनहून येणार्या मालवाहू जहाज असलेल्या ‘एमव्ही मर्लिन’ लॉण्डावर आग लागली होती. या मालवाहू जहाजावर प्रवास करणार्या २३ जणांपैकी २२ जण भारतीय होते. अमेरिकन सेंट्रल कमांड (उएछढउजच) यांनी जाहीर केलेल्या माहितीनुसार, हे जहाज एका ब्रिटिश कंपनीचे होते.
हुतींनी ‘बॅलेस्टिक’ क्षेपणास्त्राद्वारे हा हल्ला केला होता. गाझा पट्टीवर इस्रायल करत असलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हुती बंडखोरांनी हा मार्ग अवलंबला आहे. मार्लिन लॉण्डा हे एक ब्रिटिश जहाज आहे. अमेरिका आणि ब्रिटनद्वारे आमच्यावर केल्या जाणार्या हल्ल्यांचे हे प्रत्युत्तर आहे, असे हुतींनी सांगितले. अमेरिका आणि ब्रिटनने मिळून हुती बंडखोरांवर दोनदा हल्ला केला. यात १५० क्षेपणास्त्रे आणि बॉम्बचाही वापर करण्यात आला. पहिला हल्ला हा दि. ११ जानेवारी रोजी झाला होता. एकूण ३० ठिकाणे नेस्तनाबूत केली होती. मात्र, त्याचा काही फायदा झाला नाही. हुती बंडखोरांनी पुन्हा ब्रिटिश जहाजांना लक्ष्य केले. याला प्रत्युत्तर म्हणून दुसरा हल्ला दि. २३ जानेवारी रोजी झाला होता. अमेरिकन हवाई दलाच्या प्राप्त जाहीर माहितीनुसार, हुतींची एकूण आठ ठिकाणी नेस्तनाबूत करण्यात आली. ज्यापैकी काही जमिनीखाली असलेल्या तळांचाही सामावेश आहे. ब्रिटेन, ऑस्ट्रेलिया, बहरीन, कॅनडा आणि नेदरलॅण्ड इत्यादी सैन्यही हुतींविरोधात उतरले आहे.
लढाऊ विमाने-जहाजे आणि पाणबुड्यांच्या साहाय्याने हा हल्ला चढविण्यात आला. दरम्यान, हे हल्ले भारतीय व्यापारावरही परिणाम करत आहेत. कित्येकदा भारतात येणार्या जहाजांवर किंवा भारतीय असणार्या जहाजांवर हुती बंडखोरांचे हल्ले झाले आहेत. भारतातर्फे यावर चर्चेतून मार्ग काढण्याचा पर्यायही विचारात घेतला जात आहे. हुती बंडखोरांना अभय देणार्या देशांमध्ये इराणचा समावेश होतो. नुकताच परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनीही इराणचा दौरा केला होता. या दौर्यात जयशंकर यांनी इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी आणि परराष्ट्रमंत्री हुस्सैन अमीर-अब्दुल्लाहियन यांची भेट घेत, जहाजांवर होणार्या हल्ल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. हुतींच्या मालकांशीच चर्चेतून हा प्रश्न सोडवावा ही गरज आहे.
यशस्वी परराष्ट्र धोरण आणि मुत्सद्देगिरीद्वारे हा विषय सोडविता येणे शक्य असल्याचे, भारत सातत्याने सांगण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, हुती बंडखोरांची ताकद पाहता आणि लाल समुद्रावरअवलंबून असलेला जगाचा व्यापार लक्षात घेता, इथे पडलेली युद्धाची ठिणगी रशिया-युक्रेन, इस्रायल पॅलेस्टाईननंतर आणखी एक युद्धकेंद्र निर्माण करू शकते आणि या घडीला ते परवडणारे नाही. त्यामुळे या वादळात भारताची मुत्सद्देगिरी वादळात आशेचा किरण ठरेल, अशी आशा!