सर्वांगीण विकासातून मुल तालुका महाराष्ट्रात अव्वल करणार : पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

28 Jan 2024 18:23:12

Sudhir Mungantivar


चंद्रपूर :
मुल तालुक्यात विविध लोकोपयोगी विकासकामे हाती घेण्यात आली आहे. मुख्य रस्ता, पाणीपुरवठा योजना, स्टेडियम, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालय, तसेच शंभर खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, कृषी महाविद्यालय, महिलांच्या पंखांना बळ देणारे सर्वोत्कृष्ट शुरवी महाविद्यालय यासारखे मोठे प्रकल्प उभे राहत आहे. मुल तालुक्याचा चेहरा- मोहरा बदलविण्यासाठी सर्वांच्या सहकार्याची आवश्यकता असून सर्वांगिण विकासातूनच हा तालुका महाराष्ट्रात अव्वल करण्याच्या दृष्टीने कार्य करण्यात येत असल्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
 
मुल नगरपरिषद क्षेत्रातील विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. पालकमंत्री मुनगंटीवार म्हणाले की, "देशाला संविधान अर्पण होऊन ७४ वर्षे पूर्ण झालीत. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दायित्व, कर्तव्य व जबाबदाऱ्या संविधानामध्ये लिखीत स्वरूपात दिल्या. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे हे ३५० वे वर्ष असून मुलचा गौरव वाढवीत छत्रपती शिवाजी महाराज व्यापार संकुलाची निर्मिती करण्यात आली."
 
"सर्वप्रथम जेव्हा स्व.दिलीप पारधी यांच्यासमवेत मुल येथे आठवडी बाजार बघण्यासाठी आलो. तेव्हा चिखल, कच्चा रस्ता व घाणीचे साम्राज्य होते. आता या ठिकाणी सुसज्ज अशा आठवडी बाजाराची निर्मिती करण्यात आली. महात्मा ज्योतिबा फुले या नावाने हे आठवडी बाजार सेवेसाठी लोकार्पित करीत आहे. महात्मा फुलेंनी “शेतकऱ्यांचा आसुड” हे पुस्तक लिहून शेतकऱ्यांसाठी असलेला भाव व्यक्त केला. हा बाजार येथील शेतकरी बांधवासाठी निश्चितच सेवा देईल," असा विश्वास मंत्री मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
 
महर्षी वाल्मिकीच्या नावाने मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वार उभारण्यात आले. प्रवेशद्वाराची निर्मिती व्हावी, यासाठी भोई समाजाच्या नागरिकांची मागणी होती. सदर प्रवेशद्वारासाठी ५० लाख रुपये मंजूर केले. मात्र, जागेअभावी २५ लाख रुपये खर्च करून गेटची निर्मिती झाली. या प्रवेशद्वारातून जातांना महर्षी वाल्मिकीचे स्मरण निश्चितच होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच शिल्लक २३ लाख रुपयात श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने दुसरे अटल गेट उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
पुढे बोलतांना ते म्हणाले की, "दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर शहीद स्मारकाची (म्युरल) निर्मिती करण्यात आली. या स्मारकामध्ये शहीद भगतसिंगाची प्रतिकृती आहे. स्वातंत्र्यासाठी “मेरा रंग दे बसंती चोला” म्हणत भगतसिंग हसत-हसत फासावर गेले. ते स्मारक येथील तरुण-तरुणींच्या आयुष्याचे उद्दिष्ट ठरवेल. या तरुणांमध्येही देशासाठी काही करावयाचे आहे, हा भाव निर्माण होईल," असेही ते म्हणाले.

Powered By Sangraha 9.0