ज्ञानवापी मशीद ही तेथील भव्य मंदिर पाडून उभारण्यात आली, असे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. नागरी शैलीतील एक मोठे मंदिर येथे होते. त्याचाच वापर करून, ज्ञानवापी उभारली गेली. वैज्ञानिक पद्धतीने हे सत्य समोर आले आहे. औरंगजेबाने याची उभारणी केली, याचा उल्लेख गॅझेटमध्ये असला, तरी आता ते सिद्ध करावे लागत आहे.
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, ‘ज्ञानवापी’चे वर्णन नागरी शैलीतील मंदिर असे करण्यात आले आहे. काशी येथील श्री विश्वनाथ मंदिरही याच शैलीत बांधलेले आहे. सर्वेक्षण अहवालानुसार, ‘ज्ञानवापी’ हे एक भव्य हिंदू मंदिर होते. मंदिराची रचना अयोध्येत बांधलेल्या श्रीराम मंदिरासारखीच आहे. प्रवेशद्वारानंतर दोन मंडप आणि गर्भगृहाची कल्पना करण्यात आली आहे. पूर्वेकडील भिंतीसमोर मंदिर असण्याची शक्यताही अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, पूर्वेकडील भिंत बंद असल्याने, त्यापुढील सर्वेक्षण करता आले नाही. हिंदू पक्षकारांचे असे म्हणणे आहे की, जिथे-जिथे आवारात खोदकाम करून पुरावे गोळा करावे लागतील, त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला विनंती केली जाईल. ‘ज्ञानवापी’च्या सध्याच्या संरचनेला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचणार नाही, अशा पद्धतीने हे उत्खनन करण्यात येणार आहे. ‘ज्ञानवापी’चे सत्य काय आहे, हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध करणे, हाच आमचा उद्देश आहे, असे हिंदू पक्षकारांनी म्हटले आहे.
सर्वेक्षण केल्यानंतर, पुरातत्त्व विभागाने वैज्ञानिकदृष्ट्या केलेल्या अहवालात असे स्पष्टपणे म्हटले आहे की, मशिदीपूर्वी येथे एक भव्य हिंदू मंदिर होते. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या पथकाला ‘ज्ञानवापी’च्या सर्वेक्षणात ५५ शिल्पे सापडली आहेत. ‘ज्ञानवापी’च्या भिंतीसह अनेक ठिकाणी १५ शिवलिंगे तसेच विविध काळातील ९३ नाणीही आढळली आहेत. दगडी मूर्तींबरोबरच घरगुती वापराच्या २५९ वस्तू सापडल्या. राम असे लिहिलेला एक दगड सापडला आहे. ‘जीपीआर’ सर्वेक्षणात, मुख्य घुमटाखाली तुटलेल्या अवस्थेतील शिवलिंग सापडले आहे. याचे मुख्य शिवलिंग म्हणून वर्णन केले जात आहे. तसेच यात ३२ महत्त्वाच्या हिंदू ठिकाणांचा उल्लेख आहे. शिवलिंगासोबत नंदी आणि श्रीगणेशाच्या मूर्तीही सापडल्या आहेत. विष्णू, कृष्ण, हनुमानासह इतर देव-देवतांच्या मूर्ती आढळून आल्या.
वैज्ञानिक पद्धतीचा वापर करून केलेल्या पाहणीत विष्णू, मकर, कृष्ण, हनुमान, द्वारपाल व नंदी यांच्या मूर्तींचा समावेश आहे. मुघल काळ तसेच ब्रिटिश राजवट यांसह इतर कालखंडाच्या खुणा सापडल्या आहेत. मूर्ती आणि धार्मिक चिन्हांचे वय दोन हजार वर्षे आहे. ‘ज्ञानवापी’च्या भिंतीसह अनेक ठिकाणी सापडलेल्या मूर्ती आणि धार्मिक चिन्हांची रीतसर तपासणी करण्यात आली असता, ‘जीपीआर’सह इतर तंत्राद्वारे केलेल्या तपासणीत काही चिन्हांचे वय दोन हजार वर्षे जुने असल्याचे आढळून आले. प्रत्येक चिन्हाचे पूर्ण वर्णन अहवालात करण्यात आले आहे. सर्वेक्षणाचा अहवाल चार खंडांत आहे. पहिल्या खंडात १३७ पाने असून, यात सर्वेक्षण अहवालाची रचना आणि संक्षिप्त माहिती आहे. दुसर्या खंडात पान १ ते १९५ पर्यंतचा वैज्ञानिक सर्वेक्षणाचा अहवाल आहे, तर तिसर्या भागात पान क्रमांक २०४ पासून वर परत मिळालेल्या वस्तूंचा उल्लेख आहे. चौथ्या विभागात छायाचित्रे आणि आकृत्या आहेत. एक हजार छायाचित्रेही या अहवालात आहेत.
अहवाल मंदिराच्या चार खांबांवरून संरचनेची संकल्पना मांडतो. ज्ञानवापी येथील मंदिराचा नकाशा बनवला नसला, तरी त्यांच्या अहवालात भव्य मंदिराचे वर्णन करण्यात आले आहे. त्यात प्रवेश, मंडप आणि गर्भगृहाचा उल्लेख आहे. ‘ज्ञानवापी’चा सर्वेक्षण अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर हिंदू पक्षकार सर्वोच्च न्यायालयात दुसरा अर्ज दाखल करणार असून, याद्वारे संकुलात असलेल्या बंदिस्त भागाचे सर्वेक्षण करण्याची विनंती केली जाईल. त्याशिवाय अन्य काही ठोस पुरावे गोळा करण्यासाठी, अयोध्येत ज्या पद्धतीने श्रीराम जन्मभूमीचे उत्खनन करण्यात आले, तशाच पद्धतीचे उत्खनन करण्याची मागणी केली जाणार आहे. एकोणिसाव्या शतकात ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या जेम्स प्रिन्सेप याने आपल्या पुस्तकात ‘ज्ञानवापी’ हे मंदिर असल्याचा दावा केला होता. जेम्स प्रिन्सेपने पुराव्यासह माहिती सादर करण्यासाठी ‘लिथोग्राफी’ तंत्रज्ञानाचा वापर केला आहे.
पुरातत्त्व विभागाच्या अहवालात तीन रहस्ये समोर आली आहेत. हिंदू पक्षकार ती उघड करण्याची मागणी करणार आहे. पूर्वेकडील भिंत बंद करण्यात आली असून, येथे एक विहीर आढळली आहे. पूर्वेकडील भिंत का बंद आहे, याचा शोध घेणे आवश्यक आहे. तसेच आढळून आलेल्या विहिरीचे महत्त्व काय आहे? यासोबातच वजूखान्याचे सर्वेक्षणही करण्यात यावे, ही मागणी केली जाणार आहे. ‘ग्राऊंड पेनिट्रेशन रडार’ (जीपीआर) तंत्रज्ञानावर आधारित पुरातत्त्व विभागाच्या अहवालात, ज्ञानवापी मशिदीची पश्चिम भिंत हा विशाल हिंदू मंदिराचा उर्वरित भाग आहे. पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या मंदिराचे खांब तसेच अन्य काही खांब यांच्यात काही बदल करून, मशिदीच्या उभारणीसाठी ते वापरण्यात आले, असे अहवालात म्हटले आहे. अहवालात असेही म्हटले आहे की, मशिदीच्या एका खोलीत सापडलेल्या अरबी-पर्शियन शिलालेखात मशीद औरंगजेबाच्या राजवटीत (१६७६-७७) बांधल्याचा उल्लेख आहे. मंदिराचा काही भाग विद्यमान बांधकामात पुन्हा वापरण्यात आला, हे यात अधोरेखित करण्यात आले आहे.
वैज्ञानिक अभ्यास/सर्वेक्षण, स्थापत्यशास्त्रीय अवशेषांचा अभ्यास, उघड केलेली वैशिष्ट्ये आणि कलाकृती, शिलालेख, कला आणि शिल्पे यांच्या आधारे असे म्हणता येईल की, सध्या असलेल्या संरचनेच्या बांधकामापूर्वी येथे हिंदू मंदिर अस्तित्वात होते, असेही अहवालात म्हटले आहे. म्हणजेच ‘ज्ञानवापी’ ही मंदिराच्या जागेवर उभारण्यात आली. औरंगजेबाने अबुल हासनच्या नावाने फर्मान जारी करून, काशीची मंदिरे तोडण्याचा आदेश दि. ८ एप्रिल १६६९ रोजी दिला होता. त्यानुसार दि. २ सप्टेंबर १६६९ रोजी श्री विश्वनाथाचे मंदिर पाडल्याचे जाहीर करण्यात आले. वाराणसी गॅझेटमध्ये याचे लिखित दस्तावेज उपलब्ध आहेत.
काशी येथील ज्ञानवापी मशिदीचे कामकाज पाहणार्या, ‘अंजुम इंतेझामिया मस्जिद समिती’ने ज्ञानवापी मशिदीला अन्य योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यास, तसेच श्री विश्वनाथाची मूळ जागा हिंदूंना देण्यास आदरपूर्वक सहमती दर्शवावी, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी केले आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण यांनी ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण केले असून, न्यायालयात अहवाल सादर केला आहे. त्यानुसार येथील भव्य मंदिर पाडून, ज्ञानवापी मशिदीची उभारणी करण्यात आली, असे दिसून येते, असे निरीक्षण नोंदवले आहे. त्यासाठीचे पुरावे सादर करण्यात आले आहेत, याकडे परिषदेचे कार्याध्यक्ष आलोक कुमार यांनी लक्ष वेधले आहे. संकलित केलेले पुरावे तसेच पुरातत्त्व विभागाचा निष्कर्ष हेच सिद्ध करतात की, हे श्री विश्वनाथ यांचेच मंदिर होते. भारतातील दोन प्रमुख समुदायांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध निर्माण होण्याच्या दिशेने ही धार्मिक कृती एक महत्त्वपूर्ण पाऊल असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.