ऑलिम्पिकसाठी झटणारा चिन्मय

28 Jan 2024 19:51:43
Article on Chinmay Patil

चिन्मय प्रताप पाटील याने भारताला ‘ऑलिम्पिक’ पदक मिळवून देण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. त्यासाठी तो कशी तयारी करत आहे, त्याची आजपर्यंतची कारकिर्द यावर प्रकाश टाकणारा हा लेख...

चिन्मय हा डोंबिवलीकर आहे. त्याने वयाच्या सहाव्या वर्षांपासून अर्टिस्टिक जिम्नॅस्टिक खेळायला सुरुवात केली. जिम्नॅस्टिक खेळत असताना, चिन्मयमधील गुण त्याचे प्रशिक्षक पवन भोईर यांनी हेरले. त्याबाबत त्यांच्या पालकांना ही कल्पना दिली. त्यानंतर प्रशिक्षक पवन भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली चिन्मयने २०१९ साली ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक खेळण्यास शुभारंभ केला. वयाच्या १२व्या वर्षी चिन्मय याने सुरू केलेला त्यांचा हा प्रवास आजपर्यंत अविरतपणे सुरू आहे. चिन्मयचा खेळाचा सराव सुरू होता. पण, त्याच काळात ’कोविड’चा प्रादुर्भाव वाढू लागला आणि त्याबरोबर सर्व जग एका जागी थांबलेले! त्या प्रमाणे चिन्मयचा देखील खेळाचा सराव एका पाईंटवर येऊन थांबला.

‘कोविड’चा प्रादुर्भाव कमी होताच, चिन्मयने पुन्हा जोमाने भोईर जिमखान्यात सरावाला सुरुवात केली. ’कोविड’ काळात चुकलेला सहा महिन्यांचा सराव भरून काढला. त्यातच २०२२ मध्ये भरविण्यात आलेली जिल्हास्तरीय स्पर्धेत चिन्मयने सहभाग घेतला. ही स्पर्धा डोंबिवली पूर्वेतील श्रवण स्पोर्ट्स अकादमीमध्ये झाली. चिन्मयसाठी त्याने केलेल्या सरावाची चुणूक दाखविण्याची मिळालेली, ही पहिलीच संधी होती. चिन्मयने त्या संधीचे सोनं करत, आपली चमक दाखवून दिली. या स्पर्धेत चिन्मयला पहिला क्रमांक मिळाला. त्यानंतर अमरावती येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत देखील त्याने पहिला क्रमांक पटकाविला. दोन्ही स्पर्धेत पहिला क्रमांक पटकविल्याने, त्याची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली. त्यामुळे चिन्मयाचा आनंद गगनात मावेनासा झाला. चिन्मय सोबत त्यांच्या कुटुंबीयांना देखील आनंद झाला.

मात्र, दुर्दैवाने काही कारणास्तव त्यावेळी १४ वर्षे वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धा रद्द झाली. पहिल्याच राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेला पात्र ठरूनही खेळता आले नाही, यामुळे चिन्मय निराश झाला होता. अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या कुटुंबीयांनी त्याला धीर दिला. त्यांचे वडील प्रताप, आई योगिता, काका उत्तम, आनंद आणि किरण याशिवाय प्रशिक्षक पवन भोईर त्यांनी त्याला मानसिक पाठबळ दिले. त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. चिन्मयने पुन्हा जोमाने सराव सुरू केला. २०२२च्या अखेरीस त्याने पुन्हा नव्या स्पर्धेत सहभाग घेतला. जिल्हास्तरीय स्पर्धेत यश मिळवून, त्याने पुणे बालेवाडी येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत १६ वर्षांखालील गटात वैयक्तिक पातळीवर तिसरा क्रमांक मिळविला, तर सांघिक स्पर्धेत ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करताना, सुवर्ण पदकांची कमाई केली. चिन्मय एका मागून एक यश मिळवित गेला. त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. चिन्मयाच्या पावलावर पाऊल आता त्यांचा लहान भाऊ वीर देखील टाकत आहे. त्यांनाही ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक खेळण्यास सुरुवात केली आहे.

चिन्मयने आतापर्यंत अर्टिस्टिक आणि ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक खेळात वाल्टिंग टेबल प्रकारात एक सुवर्ण, एक रौप्य आणि एक कांस्य तर फ्लोअर एक्सरसाईझ प्रकारात एक सुवर्ण, दोन रौप्य, आणि एक कांस्य पदक प्राप्त केले आहे. ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिक प्रकारात आतापर्यंत त्याने जिल्हास्तरीय स्पर्धेत दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक प्राप्त केले आहे. चिन्मयची राज्यस्तरीय स्तरावरील कामगिरी उत्तम असून, त्याने तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदकाची कमाई केली आहे. ठाणे जिल्ह्याच्या संघातून खेळताना, राष्ट्रीय स्पर्धेत अंतिम विजेत्या संघात त्यांचा सहभाग होता. वैयक्तिक स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर त्याला एक कांस्यपदक मिळाले आहे.

ट्रॅम्पोलिन जिम्नॅस्टिकमध्ये एका स्पर्धेत दहा एलिमेंटचा एक सेट काढावा लागत असल्याचे चिन्मय सांगतो. उडीचे आडवे अंतर मोजण्यासाठी एक परीक्षक असतो. उडीचे हवेतील वेळेची नोंद मोबाईलवर काढली जाते. त्याचबरोबर उडीची अदलाबदली डीफिकल्टी लेव्हल अशा चार प्रकारांमध्ये मिळविलेल्या गुणांची बेरीज करून अंतिम निकाल काढण्यात येतो. त्याने १५.४८ सेंकद हवेतील उडीचे सर्वोत्तम उद्दिष्ट आतापर्यंत गाठले आहे. या खेळाचा नियमित सराव चिन्मय करतो. खेळाचे प्राथमिक एलिमेंट सुरुवातीला करून, नंतर तो बेसिक एलिमेंट करतो. आठवड्याचे पाच दिवस दररोज दीड तास सराव सध्या तो करत आहे. त्याला या खेळात तंदुरुस्त राहण्यासाठी आहारावर विशेष लक्ष ठेवावे लागते.

आहारात दूध, उकडलेली अंडी, कच्चे कडधान्य, सुका मेवा यांचा नियमित समावेश असतो. तो जंक फूड खाणे नेहमीच टाळतो. या वर्षी तो ज्युनियर गटातून खेळणार आहे. आता आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा त्याचा मानस आहे. किमान तीन तरी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळवाव्यात, अशी आशा बाळगून तो आहे. भारताचे बोधचिन्ह असलेला ट्रॅक सूट घालून, देशाला ’ऑलिम्पिक’ पदक मिळवून देण्याचे, सोनेरी स्वप्न सध्या तो पाहत आहे. ट्रॅम्पोलिन हा खेळ शालेय स्तरावर मुलांना समजला पाहिजे, यासाठी प्रयत्न होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. आपल्या यशाचे श्रेय आई-वडिलांना देणार्‍या हरहुन्नरी खेळाडूला त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ’मुंबई तरूण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!
 
Powered By Sangraha 9.0