भांडुप पश्चिमेकडील १८०० मीमी व्यासाच्या जलवाहिनी दुरुस्तीचे काम
परिसरातील काही भागांमध्ये आज पाणीपुरवठा बंद
25-Jan-2024
Total Views |
मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता विभागाद्वारे कळविण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवार, दि.२५ जानेवारी रोजी भांडुप पश्चिमेकडील श्रीराम पाडा परिसरातील सॅडल बोगद्याजवळ १,८०० मिमी व्यासाच्या तानसा जलवाहिनीमधे गळती झाल्याने महानगरपालिकेमार्फत तातडीचे दुरुस्ती काम हाती घेण्यात आले आहे. हे दुरुस्ती काम योग्य प्रकारे व्हावे, यासाठी जलवाहिनी वरील पाण्याचा दाब कमी करणे गरजेचे असून याकरिता भांडुप कॅबिन येथील तानसा पश्चिम जलवाहिनीवरील झडप बंद करणे आवश्यक आहे. हे काम पूर्ण होण्यासाठी अंदाजे १२ तासाचा कालावधी लागणार आहे. परिणामी भांडुप पश्चिम परिसरातील काही ठिकाणचा आजचा पाणीपुरवठा बाधित होणार आहे. तरी या परिसरातील नागरिकांनी पाणी जपून व काळजीपूर्वक वापरावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे करण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतलेल्या तातडीच्या दुरुस्ती कामामुळे 'एस' विभागातील भांडुप पश्चिमेकडील डोंगराळ भागात पाणी पुरवठा बाधित होणार आहे. यामध्ये प्रामुख्याने श्रीरामपाडा, तुळशेतपाडा, वाघोबावाडी, रामनगर, तानाजीवाडी , रावते कंपाऊंड, त्रिमूर्ती नगर, शिवाजी नगर, नरदास नगर, टेंभीपाडा, साई हिल, साई विहार, सोनापूर येथील काही भाग, खिंडीपाडा, गांव देवी रोड, गाव देवी टेकडी, मरोडा हिल, पाटकर कंपाऊंड, गणेश नगर, सर्वोदय नगर तसेच भांडुप जलाशय येथून होणारा पाणी पुरवठा, रमाबाई नगर पंपिंग, महात्मा फुले नगर पंपिंग सप्लाय व डांबर कंपनी या ठिकाणांचा समावेश आहे. तरी जलवाहिनी दुरूस्तीचे काम पूर्ण होइपर्यंत या परिसरांमधील पाणीपुरवठा बंद राहील.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.