जनामनातील प्रभू श्रीराम

25 Jan 2024 20:58:08
 ram mandir
 
सनातन म्हणजे सदा नित्य नूतन. जे केव्हाच जुने होत नाही असे. गेले दोन महिने आपण काही वेगळे अनुभवतो आहोत, असे वाटते का? काही नवीन, पण तरीही ओळखीचे असे? ‘राम’ नामाची एक लाटच आलीये जशी. गाण्यांपासून सोशल मीडिया आणि रिल्सपासून ते थेट ‘एआय’पर्यंत, सगळं वातावरण राममय झालं होतं. ही एवढी उत्कट ऊर्जा ’रा’ आणि ‘म’ या दोन अक्षरांमध्येच आहे की काय असे वाटावे! सर्व अभिव्यक्तीची माध्यमे रामकथेने दुथडी भरून वाहत होती.
 
चित्रे, रांगोळ्या, फेसबुक पोस्ट, लेख, लेखमालिका, गीतरामायण आणि कित्ती काय काय. हे एक अभिसरणच होते. या प्राणप्रतिष्ठापनेयोगे एक अमौलिक असे चिंतन घडले. राम मंदिर हा केवळ श्रद्धेचा किंवा आस्थेचा विषय राहिला नव्हता, तर प्रत्येक मजकुरातून रामाविषयीचं प्रेम सतत जाणवत होतं. कसं असतं, साहित्य म्हणजे भावनांची विचारांची उत्कट अभिव्यक्ती असते. साहित्य हा समाजमनाचा आरसा असतो. साहित्याच्या बदलत्या प्रवाहांतून समाजाचा ओढा जोखता येतो.
 
साहित्य म्हणजे इथे केवळ लिखित साहित्य नाही, तर चित्रे, चित्रपट, रेकॉर्ड केलेले संगीत, संगीतबद्ध केलेली गीते. छायाचित्रित करून ठेवलेल्या रांगोळ्या आणि इतर कलाकृती. एक असा दस्तऐवज ज्याचा आधार भविष्यातही भूतकाळ शोधताना घेतला जाऊ शकतो. या साहित्यात कालानुरूप सतत नावीन्य येत राहत आणि म्हणूनच ते जीवंत राहते. पण काही विषय असे असतात जे कधीच जुने होत नाहीत.
 
गेल्या दोन महिन्यांत ‘राम’ या विषयावर सर्व कलाकार आणि साहित्यिकांचे झालेले मंथन, हा त्याचाच ठसठशीत पुरावा. घराघरात दिवाळी साजरी झाली. प्रत्येक घरासमोर पणत्या तेवत होत्या. मंदिरे, कार्यालयं, हाऊसिंग सोसायटी अशा सर्व ठिकाणी उत्स्फूर्तपणे दीपोत्सव साजरे केले गेले. स्त्रियांनी उपवास धरले. कित्येक मंदिरात तर राम जन्म सोहळा प्राणप्रतिष्ठापनेच्या मुहूर्तावर संपन्न झाला. हृदयातला राम असा सहस्त्र वाटांनी आपल्या भेटीला पुन्हा आला. साजरा झाला. राम हे सकळ हिंदूंचे श्रद्धास्थान आहे, याच पुनश्च प्रत्यय आला.
 
श्रद्धास्थान आणि राजा राम
 
हिंदूंचे देव अमानवी नाहीत. माणसाचीच ती आदर्शरूपे आहेत. राम हा राजा होता. त्याच्या युगात त्याची प्रजा केवळ सुखीच नव्हती, तर समाधानीसुद्धा होती. म्हणून रामराज्याचे गोडवे युगानुयुगे गायले गेले. राम हा आपल्या संस्कृतीचा अगदी पूर्वापारपासून अविभाज्य भाग आहे. राम म्हणजे केवळ रामायण अशी धारणा होती काही वर्षांपूर्वी. मग त्यावर गीतरामायण रचलं गेलं. त्यानंतर त्याला संगीत प्राप्त झालं आणि त्याचे जाहीर कार्यक्रम होऊ लागले. प्रसिद्धी मिळाली. इतर भाषांमध्ये त्याची भाषांतरे झालीच. पण, भारतीय सर्वच भाषांमध्ये नवनवीन साहित्यनिर्मिती रामाभोवतीने घडू लागली. रामाची मंदिरे गावागावातून बंधली जाऊ लागली, त्यायोगे भजन-कीर्तनाचे कार्यक्रम रंगू लागले.
 
माणसे एकमेकांना भेट दिल्यानंतर ‘राम राम’ म्हणत हा रामासोबतचा प्रवास अंतयात्रेपर्यंत चालू राहतो. रामजन्मभूमी आंदोलनासाठी दोन वेळा कारसेवा झाली. ‘जय श्रीराम’च्या बुलंद घोषणांनी, रामऊर्जेने बाबरी ढाँचा जमीनदोस्त झाला. आक्रमकांच्या अत्याचाराचे, अन्यायाचे प्रतीक पुसून टाकण्याबरोबरच रामललाचे आता मंदिर होणार, आपले राम तंबूतून भव्य प्रासादात विराजमान होणार, ही देव-देश-धर्माच्या लढ्यासाठीची भावनाच मुळी किती विलक्षण!
 
प्रजा प्रिय राजा राम. श्रद्धेत एवढी ताकद असते. आपली श्रद्धास्थाने आपल्या ताब्यात असायला हवीत. त्यावर कुण्या नवख्या संस्कृतीचं आक्रमण नको. त्यांचं पावित्र्य निरंतर राहायला हवं. यासाठी रस्त्यापासून ते न्यायालयापर्यंत अविरत संघर्ष झाला. रक्त सांडले. अखेरीस चांगल्याचा वाईटावर विजय झाला. सत्यमेव जयते!
 
५०० वर्षांनंतर आपल्या मर्यादापुरुषोत्तम राजा रामाची जन्मभूमी पुन्हा एकदा नटली. अगदी तशीच जेव्हा प्रभू श्रीराम वनवासानंतर पुन्हा अयोध्येला पधारले होते. दीपोत्सवाने तेव्हा अयोध्यानगरी लखलखली होती, आता तशीच पुन्हा एकदा अयोध्यनगरी रामप्रकाशाने झगमगली. रामलला प्राणप्रतिष्ठित झाले. पुन्हा एकदा आपल्या न्याय्य हक्कांसाठी आपण लढले पाहिजे, हा आदर्श भारताने सार्‍या जगाला यानिमित्ताने घालून दिला. पुन्हा एकदा संपूर्ण विश्व आपल्या संस्कृतीविषयी असलेले आपले प्रेम आणि त्या प्रेमाचा आपण केलेला आदर, याचे साक्षीदार झाले. पुन्हा रामराज्य अवतरले!
 
Powered By Sangraha 9.0