खरं तर राहुल गांधी त्यांच्यावर कधीही न झालेल्या अन्यायासाठी उसना ‘न्याय’ मागत, ’भारत जोडो न्याय यात्रे’च्या नावाखाली राजकीय यात्रा करण्यात दंग आहेत. नियमभंग करुन अरेरावी करणार्या राहुल गांधींना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी चांगलाच दणका दिला. गांधींना त्यांनी कायद्याच्या चौकटीत राहून यात्रा काढण्याचा इशारा दिला. रामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्सव अयोध्येत सुरू असताना, इकडे राहुल गांधी आसामच्या बटाद्रवा येथील श्री श्री शंकर देव मठात जाण्याचा हट्ट धरून बसले होते. मात्र, आसाम पोलिसांनी त्यांना काही किलोमीटर आधीच रोखून धरले. त्यामुळे राहुल यांनी धरणे आंदोलन करत हैबरगावात ठाण मांडले. विशेष म्हणजे, यावेळी आजूबाजूची मंडळी रामनामाचा जयघोष करत असताना राहुल गांधी मात्र गुडघ्यावर हात ठेवून, निवांत बसले होते. त्यांच्या मुखातून रामनाम मात्र काही निघाले नाही.
यावेळी “रामभक्तीची काही लाट वगैरे नाही,” असे विधान करत पुन्हा आपले अज्ञान पाजळले. ज्यांना आपले पक्षात नेमके काय काम आहे, आपण नेमके काय केले पाहिजे, हेदेखील सांगावे लागते, त्यांना राम नेमका कसा कळणार, हादेखील प्रश्नच. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देऊनही काँग्रेसने अपेक्षेप्रमाणे सोहळ्याकडे पाठ फिरवली. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नावात ‘राम’ आणि काँग्रेस नेते डीके शिवकुमार यांच्या नावात ‘शिव’ आहे, असे हे नेते आज उच्चरवाने सांगत असले तरी यांना देवाचा मात्र प्रचंड तिटकारा. त्यात शिवकुमार यांनी ‘भाजपने आम्हाला धर्म शिकवू नये,’ असे सांगितले. त्यामुळे कितीही खोटा दिखावा केला, तरीही काँग्रेसींचा हिंदूद्वेष जगजाहीरच. आता रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात पार पडला. देशभर दिवाळी साजरी करण्यात आली; मात्र काँग्रेसचा रामद्वेष सोहळ्यानंतरही कायम आहे.
विशेष म्हणजे, प्राणप्रतिष्ठेच्या दुसर्याच दिवशी तब्बल सहा लाखांहून अधिक रामभक्तांनी श्री रामललाचे दर्शन घेतले. राहुल गांधींना ही गर्दी दिसली नसावी किंवा दिसूनही त्याकडे दुर्लक्ष केले असेल. ही लाखो रामभक्तांची गर्दी म्हणजे रामलाटच. हीच रामलाट 2024 मध्ये आता काँग्रेसची पुन्हा खाट पाडल्याशिवाय राहणार नाही, हे निश्चित!
चौकशीपूर्वीची ‘इव्हेंटबाजी’
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे ‘पळणारा नाही, तर लढणारा दादा’ असे बॅनर काही ठिकाणी झळकले. त्याचे कारण म्हणजे, ‘बारामती अॅग्रो’ कथित गैरव्यवहार प्रकरणी रोहित पवारांना बुधवारी ‘ईडी’कडून आलेले चौकशीचे बोलावणे. मग काय रोहित पवारांनीही आजोबांच्या पावलांवर पाऊल ठेवत, शक्तिप्रदर्शन करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. ‘ईडी’ कार्यालयात प्रवेश करण्याआधी काही मिनिटांचा अनोखा ‘सोहळा’ तथा भावनिक क्षणदेखील पाहायला मिळाला. ’ईडी’च्या कार्यालयात जाण्याआधी खासदार सुप्रिया सुळे यांनी रोहित पवार यांना भारताच्या संविधानाची प्रत भेट म्हणून दिली.
प्रत द्यायला काही हरकत नाही; पण ते चौकशीला जात असताना संविधान देण्याने आपसुकच न्याय होईल की सर्व गुन्हे माफ होतील? मुळात चौकशीसाठी बोलावणारी संस्था ही संवैधानिकच. त्यामुळे जर कायद्यात आणि संविधानाच्या मार्गाने रोहित पवार जात असते, तर त्यांना ‘ईडी’ने चौकशीसाठी बोलावले असते का? जाताना रोहित पवार सुप्रिया सुळे यांच्या पाया वगैरे पडले. “सध्याचा काळ शरद पवार गटासाठी संघर्षाचा असून, विजय सत्याचाच होईल. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा पुढे नेण्याचे काम शरद पवारांनी गेली सहा दशके केले आहे. त्याच महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी आमची ही लढाई आहे,” असे यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या. आता रोहित पवारांची चौकशी ’ईडी’ करत असताना, याचा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी नेमका काय संबंध, ते ताईंनाच ठावूक!
तत्पूर्वी त्यांनी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांचेदेखील पाया पडून आशीर्वाद घेतले. ‘ईडी’ चौकशीच्या नावाखाली शक्तिप्रदर्शनाचा हा काही पहिला प्रकार नाही. रोहित यांनी आजोबांचाच कित्ता गिरवत, चौकशीला जाताना शक्तिप्रदर्शन केले. शरद पवारांनाही ‘ईडी’ने चौकशीला बोलावले असताना, तेव्हा त्यांनी शक्तिप्रदर्शन करत रॅलीच काढली होती. त्यामुळे चौकशीला बोलावले म्हणजे आपण काहीतरी भव्यदिव्य आणि समाजोपयोगी काम केले आहे, असे रोहित पवार यांना वाटले असावे. ’ईडी’ चौकशीला पवारांनी पूर्ण राजकीय ‘इव्हेंट’ केला. हा ‘इव्हेंट’ कितपत फायदेशीर ठरतो, ते येत्या काही दिवसांत कळेलच!