मुंबई : दलित्तोद्धारासाठी आपले जीवन खर्ची घालणारे बिहारचे माजी मुख्यमंत्री दिवंगत कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याचा अतिशय सुयोग्य, दूरदृष्टीचा आणि आनंदाचा निर्णय केंद्रातील मोदी सरकारने घेतला आहे, अशी प्रतिक्रीया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत ही प्रतिक्रिया दिली.
चंद्रशेखर बावनकुळे आपल्या पोस्टमध्ये म्हणाले की, "दलितांच्या उत्थानासाठी दिवंगत कर्पूरी ठाकूर यांची अतूट बांधिलकी आणि त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाने भारताच्या सामाजिक-राजकीय जडणघडणीवर अमिट छाप सोडली आहे. हा खिताब केवळ त्यांच्या उल्लेखनीय योगदानाचा गौरव करत नाही तर अधिक न्याय्य समाज निर्माण करण्याचे त्यांचे ध्येय पुढे चालू ठेवण्यासाठी आम्हाला प्रेरणा देतो."
दिवंगत कर्पुरी ठाकूर यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष प्रारंभ होत आहे, त्यानिमित्ताने चंद्रशेखर बावनकुळेंनी त्यांना अभिवादन केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाचे स्वागतही केले. बिहारचे माजी मुख्यमंत्री 'जननायक' कर्पूरी ठाकूर यांना मंगळवारी सायंकाळी मरणोत्तर 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.