अमेरिकेतल्या निवडणुकांमध्ये पुन्हा ‘ट्रम्प’ कार्ड

24 Jan 2024 20:40:35
 us electin
 
सध्या प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाकडे बहुमत असले तरी सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे. याशिवाय संसदेची मान्यता न लागणारी काही हजार पदं अध्यक्ष भरू शकतात. ट्रम्प यांनी २०२४ साली अध्यक्ष झाल्यास आपल्यासोबत काम करण्यासाठी तीन हजार माणसं प्रशिक्षित केली आहेत.
 
अवघ्या आठवडाभरात अमेरिकेतल्या रिपब्लिकन पक्षातील चित्र पालटले. आयओवातील पक्षाच्या मेळाव्यात अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी डोनाल्ड ट्रम्प यांच्या भव्य विजयानंतर आठवडाभराने न्यू हँपशायर या राज्यात रिपब्लिकन पक्षाच्या प्राथमिक फेरीच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी निकी हेली यांचा ११.३ टक्के मतांनी पराभव केला. मतदानापूर्वी दुसर्‍या पसंतीचे उमेदवार रॉन डिसॅन्टिस यांनी निवडणुकीतून माघार घेतली. आता मैदानात केवळ ट्रम्प आणि निकी हेली हे दोनच उमेदवार शिल्लक असून डिसॅन्टिस यांच्या पाठिंब्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षाच्या ८० टक्क्यांहून अधिक लोकांचा पाठिंबा आहे. निकी हेली यांनी अजूनही स्वतःचा पराभव स्वीकारला नसून यापुढेही लढत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
 
अमेरिकेच्या राजकारणात निकी हेली डोनाल्ड ट्रम्प यांच्या जवळच्या म्हणून ओळखल्या जात होत्या. नवख्या असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी २०१६ सालच्या निवडणुका लढायचा निर्णय घेतला, तेव्हा त्यांना पक्षातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. तेव्हा साऊथ कॅरोलिना राज्याच्या गव्हर्नर असलेल्या हेली यांनी डोनाल्ड ट्रम्पना पाठिंबा दिला होता. ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर त्यांनी हेलींना अमेरिकेचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत नेमले. त्यातून हेली यांची प्रतिमा राष्ट्रीय पातळीवर पोहोचली. त्यांनी २०१८ सालीच पदाचा राजीनामा दिला होता. २०२० सालच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प यांचा पराभव झाला.
 
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रक्षोभक वक्तव्यांमुळे दि. ६ जानेवारी, २०२१ ला ‘द कॅपिटॉल’ येथे झालेल्या झालेल्या हिंसक वळण लागले, असा ठपका ठेवून ट्रम्पना विविध समाजमाध्यम कंपन्यांनी बहिष्कृत केले. अमेरिकेतल्या माध्यमांनी त्यांच्याविरूद्ध राळ उडवली. ट्रम्प यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी अवघा आठवडाभर त्यांना पदच्युत करावे यासाठी त्यांच्याविरूद्ध अवघ्या सव्वा वर्षात दुसरा महाभियोग चालवला गेला. अमेरिकेतील अनेक न्यायालयांमध्ये ट्रम्पविरूद्ध खटले दाखल करण्यात आले. त्यातून डोनाल्ड ट्रम्प यांची राजकीय कारकिर्द समाप्त झाली, असा अनेकांचा समज झाला. पण, रिपब्लिकन पक्षात मात्र डोनाल्ड ट्रम्पची लोकप्रियता कायम राहिली.
 
“ट्रम्प यांनी २०२४ सालच्या अध्यक्षीय निवडणुका लढण्याचा निर्णय घेतला, तर मी लढणार नाही,” असा निर्णय निकी हेली यांनी सुरुवातीच्या काळात घेतला होता. नंतर तो बदलून फेब्रुवारी २०२३ मध्ये त्या डोनाल्ड ट्रम्पना आव्हान देणार्‍या पहिल्या उमेदवार ठरल्या. रिपब्लिकन पक्षातर्फे अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार्‍या पहिल्या अश्वेत महिला ठरण्याचा मान त्यांनाच मिळाला. सुरुवातीला या निवडणुकांसाठी १४ उमेदवार मैदानात होते. त्यात माजी उपाध्यक्ष माईक पेन्स यांचाही समावेश होता. या लढतीत फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डिसॅन्टिस बाजी मारतील असा अंदाज होता.
 
प्रत्यक्षात मात्र निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठी आघाडी घेतली. २०२४ सालच्या आरंभी निकी हेली यांनी दुसर्‍या क्रमांकावर झेप घेतली. दि. १५ जानेवारीला आयओवामध्ये मेळावा भरत असताना केवळ चार उमेदवार मैदानात होते. निकी हेली यांनी २०२३ सालच्या चौथ्या तिमाहीत २.४ कोटी डॉलरच्या देणग्या मिळवल्या. अमेरिकेतील मोठ्या उद्योगांनी देणग्या देताना निकी हेलींना प्राधान्य दिले. त्यामुळे ट्रम्प यांच्याशी एकनिष्ठ मतदार हेलींकडे संशयाने पाहू लागले. ट्रम्प यांना हरवण्यासाठी पक्षाचे विरोधक हेली यांना मदत करत असल्याचे आरोप करण्यात आले.
 
हेली यांनी न्यू हॅपशायर राज्यात जिंकणे महत्त्वाचे आहे. त्यांना जिंकवण्यासाठी डेमोक्रॅटिक पक्षाच्या मतदारांना निष्पक्ष म्हणून नोंदणी करून रिपब्लिकन पक्षाच्या मतदानात निकी हेलींच्या बाजूने मतदान करण्यास सांगितल्याचे आरोपही करण्यात आले. सामान्य परिस्थितीत असे आरोप हास्यास्पद वाटले असते. पण, सध्या जो बायडनविरूद्ध असलेली नाराजी बघता ट्रम्प यांना बायडन यांनी हरवण्यापेक्षा त्यांच्याच पक्षाच्या निकी हेलींनी हरवण्याची शक्यता जास्त आहे.
 
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची चाहूल लागल्याने अमेरिकेतील प्रस्थापितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आपल्या पहिल्या टर्ममध्ये अननुभवी ट्रम्पने अनेकांची पिसं काढली होती. पहिल्या टर्ममध्ये ट्रम्पना स्थिरस्थावर व्हायला वेळ लागला होता. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागर, ऊर्जा सचिव, गृह सचिव, माध्यम सचिव, रक्षा सचिव, अ‍ॅटर्नी जनरल आणि श्रमसचिव यांच्यासह महत्त्वाच्या पदांवरील शेकडो अधिकार्‍यांनी राजीनामा दिला होता किंवा त्यांची हकालपट्टी झाली होती.
 
ट्रम्प यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या ‘ब्रिटबार्ट माध्यम समूहा’चे स्टीव्ह बॅनन आणि ‘फॉक्स न्यूज’सोबतही त्यांचे पटेनासे झाले होते. इराणशी झालेला अणुइंधन समृद्धीकरण करार रद्द करणे, वातावरणातील बदल टाळण्यासाठी झालेल्या पॅरिस करारातून बाहेर पडणे, मित्रराष्ट्रांविरूद्ध व्यापारी निर्बंध लादणे आणि ‘नाटो’तून बाहेर पडण्याची शक्यता तपासणे अशा अनेक गोष्टींमुळे ट्रम्प यांची पहिली टर्म वादग्रस्त ठरली होती. ट्रम्प यांना स्थिरस्थावर व्हायला वेळ लागला. कारण, त्यांच्याकडे आपल्या विचारांना पुढे नेणारी माणसं नव्हती.
 
अमेरिकेत महत्त्वाच्या पदांवर नेमणुका करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहांची मान्यता आवश्यक असते. जर संसदेच्या दोन्ही सदनांत बहुमत नसेल, तर नेमणुका अडवून विरोधी पक्ष प्रशासन व्यवस्था खिळखिळी करू शकतात. सध्या प्रतिनिधीगृहात रिपब्लिकन पक्षाकडे बहुमत असले तरी सिनेटमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाचे बहुमत आहे. याशिवाय संसदेची मान्यता न लागणारी काही हजार पदं अध्यक्ष भरू शकतात. ट्रम्प यांनी २०२४ साली अध्यक्ष झाल्यास आपल्यासोबत काम करण्यासाठी तीन हजार माणसं प्रशिक्षित केली आहेत. चीन, रशिया, इस्रायल-हमास संघर्ष, मुक्त व्यापार आणि वातावरणातील बदल याबाबत ट्रम्प काय भूमिका घेऊ शकतील, याबाबतही मोठ्या प्रमाणावर चर्चा होत आहेत.
 
‘नाटो’ सदस्य देशांबद्दलची आपली नाराजी ट्रम्प यांनी लपवली नाहीये. ‘नाटो’चे सदस्य असलेले बहुतांशी युरोपीय देश संरक्षणावर आवश्यक असलेल्या दोन टक्क्यांपेक्षा कमी खर्च करतात. त्यामुळे त्यांना देशाच्या सामाजिक कल्याणावर अधिक खर्च करता येतो. ट्रम्पना हे बदलायचे आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाच्या बाबतीत त्यांची बायडन सरकारच्याविरूद्ध भूमिका आहे. अमेरिकेने युरोपातल्या राजकारणात ढवळाढवळ न करता, स्वतःच्या सीमा अवैध घुसखोरांपासून संरक्षित करण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांचे मत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये ५० लाखांहून जास्त लोकांनी अवैधरित्या अमेरिकेत प्रवेश केला आहे.
 
घुसखोरीचे प्रयत्न असेच सुरू राहिले, तर त्याचा अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेवर परिणाम होईल. डोनाल्ड ट्रम्पने हा घुसखोरांना हाकलून लावण्याचा निर्णय घेतला आहे. वातावरणातील बदलांबाबतही त्यांची वेगळी भूमिका आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबद्दल त्यांच्या मनात आदर असला तरी ट्रम्प यांच्याच काळात अमेरिकेने चीनविरूद्ध अतिशय कडक भूमिका घेतली. बायडन प्रशासनाला तिचे अनुकरण करणे भाग पडले. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ हे डोनाल्ड ट्रम्प यांचे घोषवाक्य. फेब्रुवारी महिन्यात आणखी पाच राज्यांमध्ये प्राथमिक फेरीच्या निवडणुका आहेत. त्यावरुन सध्या तरी डोनाल्ड ट्रम्पविरूद्ध जो बायडन यांच्यात पुन्हा एकदा निवडणूक होणार असे चित्र समोर दिसत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0