परिंदा भी पर नही मार सकता...

22 Jan 2024 11:17:29
karseva ram mandir
 
थोडे पुढे रस्त्याच्यावरील भागातील मंदिरातील आवारात रक्तबंबाळ अशोक सिंघल यांचा फोटो काढून थोडा पुढे गेलो असता, रस्त्याच्या डावीकडे ‘जय श्रीराम’, ‘भारतमाता की जय’च्या घोषणा कानी पडल्याने, पाहतो तो काय, विवादित ढाँच्याच्या तिन्ही घुमटांचा कारसेवकांनी ताबा घेऊन उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी ‘परिंदा भी पर नही मार सकता’ ही दर्पोक्ती खोटी, मातीमोल केली होती, माझ्यासाठी मर्मबंदातील ठेव होती.
 
परवा भाजप प्रदेश कार्यालयात अयोध्येत दि. २२ जानेवारी रोजी होणार्‍या प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण आणि श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठा समारंभाच्या जनजागृतीचा भाग म्हणून श्रीराम मंदिराच्या प्रतिकृतीचा भव्य रथ आला आणि त्याच्या दर्शनासाठी नरीमन पॉईंट भागातील व्हाईट कॉलर नोकरदारांनी एकच गर्दी केलेली पाहून, माझे मन पार भूतकाळात गेले. १९८४ला ‘श्रीराम जन्मभूमी मुक्ती समिती’च्या स्थापनेनंतरच्या गंगामाता पूजन, भारतमाता यात्रा, श्रीराम ज्योती यात्रा, श्रीराम शिलापूजन अशा सर्व जनजागरण कार्यक्रमात मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्वयंसेवक, कारसेवक म्हणून फोटोग्राफर म्हणून सहभागी होत होतो. १९८९ला अयोध्येत राजमाता विजयराजे सिंधिया, अशोक सिंघल, कल्याण सिंह यांच्या हस्ते झालेल्या शिलान्यास समारंभात, नंतर विहिंपचा दिल्लीतील बोट क्लबवरील प्रचंड मेळावा अशा अनेक कार्यक्रमांत माझी आई, मामा हेदेखील माझ्या सोबत असत. प्रकाशचित्रकार म्हणून फोटो काढणं होतच असे. अयोध्येतील शीलान्यासाच्या वेळेस तेथील बॅरिकेड्स, प्रचंड पोलीस फौजफाटा, शारीरिक तपासणी यांमुळे शीलान्यास, रामललाच्या दर्शनासाठी प्रचंड संख्येने आलेल्या साध्वी, साधूंचा क्रोध, संताप या छायाचित्राला (इशीीं छशुी) फोटोचा पुरस्कार मिळाला होता.
 
१९९० सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भाजपचे तत्कालीन अध्यक्ष माननीय लालकृष्ण अडवाणी यांच्या श्रीसोमनाथ ते अयोध्या ही रथयात्रा मी राजकोटपर्यंत कव्हर करून मुंबईच नव्हे, तर सोलापूर, पुन्हा हैदराबादपासून मेडकमार्गे नांदेड आणि पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढणार्‍या आदरणीय लालजी, प्रमोदजी, गोपीनाथजी मुंडे यांची रथयात्रा ‘कव्हर’ केली. रथयात्रा दि. ३० सप्टेंबरला श्रीरामांच्या अयोध्येत पोहोचून तेथे कारसेवा होणार होती. माझी आई पांडुरंगाची वारकरी असल्याने, कार्तिकी एकादशीला निघताना, चार-पाच दिवस आधीच अयोध्येला पोहोच, असे बजावून पंढरपूरला रवाना झाली होती. उत्तर प्रदेशाच्या राजधानीचे शहर लखनौपासून रथयात्रा कव्हर करण्यासाठी, आठवडाभर आधीच पोहोचल्या-पोहोचल्या रथयात्रा लालूंच्या बिहारमध्ये रोखून लालजी, प्रमोदजी यांना अटक झाल्याचे वृत्त सगळीकडे वार्‍यासारखे पसरले आणि तीव्र आंदोलन थांबविण्यासाठी शहरात संचारबंदी पुकारली गेली. २९ तारखेला कसाबसा बाराबंकीमार्गे फय्यझाबाद, चार-पाच डिग्री तापमानाची पर्वा न करता, एकटाच भल्या पहाटेच अयोध्येकडे निघालो.
 
शरयूवरील पुलावर कारसेवकांवर पोलिसांच्या अमानुष अत्याचार, दमनशक्तीचा प्रसाद ते वृत्त कव्हर करणार्‍या पत्रकार, छायाचित्रकारांना देखील खावा लागला. त्यावेळेस लखनौतील एका अग्रगण्य इंग्रजी वर्तमानपत्रात फोटोग्राफर असलेल्या प्रवीण जैन यांचे दोन्ही कॅमेरे, लेन्स पोलिसांनी तोडून टाकले (हेच प्रवीण जैन पुढे ’इंडियन एक्सप्रेस’चे फोटो एडिटर झाले) माझा कॅमेरा झोळीत असल्याने वाचलो होतो, तसाच पुढे विवादित ढाँच्याकडे निघालो असता, गल्लीबोळातील साधू-संतांवर पोलिसी अत्याचार सुरूच होते. थोडे पुढे रस्त्याच्यावरील भागातील मंदिरातील आवारात रक्तबंबाळ अशोक सिंघल यांचा फोटो काढून थोडा पुढे गेलो असता, रस्त्याच्या डावीकडे ’जय श्रीराम’, ’भारतमाता की जय’च्या घोषणा कानी पडल्याने, पाहतो तो काय, विवादित ढाँच्याच्या तिन्ही घुमटांचा कारसेवकांनी ताबा घेऊन उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी ’परिंदा भी पर नही मार सकता’ ही दर्पोक्ती खोटी, मातीमोल केली होती, माझ्यासाठी मर्मबंदातील ठेव होती.
 
पाच-सहा दिवसांनी कार्यालयात आलो असता, ‘समकालीन’ या गुजराती आवृत्तीचे संपादक गांधी यांनी, “आपको मालूम हैं? वृत्तपत्र सृष्टी में ‘समकालीन’ने वर्ल्ड रेकॉर्ड बनाया हैं। अहमदाबाद मैं ५०० रुपये मैं लोगोने खरिदा।” पुण्याच्या एका मराठी वृत्तपत्राचे तत्कालीन संपादक अनिल टाकळकर यांनीदेखील आम्ही ३१ तारखेला अनेक वेळा वर्तमानपत्राच्या अनेक आवृत्त्या छापल्याचे सांगितले.
 
दि. ३० ऑक्टोबर १९९० अथवा ६ डिसेंबर १९९२ विवादित ढाँचा करसेवकांनी उद्ध्वस्त केला, तो अंगावर रोमांच, डोळ्यात आनंदाश्रू, जन्माच सार्थक झाल्याचं समाधान देणारा प्रसंग. एक वृत्त छायाचित्रकार म्हणून असे अनेकानेक क्षण मी टिपू शकलो. अगदी वर्ल्ड रेकॉर्ड करणारी चेतन शर्माची ’विश्वचषक’ क्रिकेटमधील पहिल्या हॅट्ट्रीकचा फोटो घेणारा, मी एकूलता एक फोटोग्राफर. महाराष्ट्र सरकारच्या गलथान कारभारामुळे दूध वरळीच्या समुद्रात सोडले जायचे, तो एक्सक्लुझिव्ह फोटो, मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट, पंतप्रधान नरसिंह राव यांचे हेलिकॉप्टरने राजभवनातील आगमन, अभिनव बिंद्राचे आपल्या देशासाठी ’ऑलिम्पिक’मधील पहिले सुवर्ण, त्या-त्या वेळेस गाजले; पण आज ३०-३५ वर्षांनंतर देखील जनमानसाच्या मनात अयोध्येतील माझ्या तीनही कारसेवेची छायाचित्रे स्मरणात आहेत.
 
मला वाटतं मुघल, निजामांनी राज्य करताना, लाखो हिंदूंच्या निर्घृण कत्तली करतानाच, आमच्या आयाबहिणींच्या अब्रूचे धिंडवडे काढतानाच, आमची श्रद्धास्थानं, लाखो मंदिर बेचिराख करून हिंदूंच्या भावभावना, मानसिकता बोथट केली होती. परमपूज्य सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी अयोध्येतील शिलान्यासाने ’हम होंगे कामयाब’ ही चेतना जागविली आणि दि. ६ डिसेंबरला संघ स्वयंसेवकांनी, कारसेवकांनी, हिंदूंनी इतिहास घडविला. सोमवार, दि. २२ जानेवारीला हिंदूंच्या ५०० वर्षांच्या अगणित बलिदान, अथक प्रयत्न, ध्यर्य, चिकाटी, आतुरता याचा अंत, आनंदाचा परमोच्च बिंदू म्हणजे परमपूज्य सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आपले आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीराम मंदिर लोकार्पण आणि श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा भारतातीलच नव्हे, तर जगाच्या कानाकोपर्‍यात असलेल्या, हिंदूंच्या घरी दीपावलीचा आनंदोत्सव असेल. जय श्रीराम!

-मोहन बने
Powered By Sangraha 9.0