विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी...

22 Jan 2024 17:32:58
ram mandir
 
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेदमंत्रांच्या घोषात १४० कोटी भारतीयांच्या वतीने अयोध्येतील भव्य मंदिरात श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा केली. यावेळी अवघ्या हिंदू समाजाच्या मनात “विजयपताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभु आले मंदिरी” अशी भावना दाटून आली होती.
 
अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरामध्ये सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पौष द्वादशीच्या दिनी इंद्र योग, मृगशिरा नक्षत्र, मेष लग्न आणि वृश्चिक नवांश, दुपारी १२ वाजून २९ मिनिटे ८ सेकंद ते १२ वाजून ३० मिनिटे ३२ सेकंदाच्या अभिजीत मुहूर्तावर भगवान श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा केली. प्राणप्रतिष्ठा विधी काशीचे विद्वान आचार्य गणेश्वरशास्त्री द्रविड आणि लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
 

ram mandir
 
धोतर, कुडता आणि गळ्यात उपरणे परिधान केलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हाती चांदीचे छत्र घेऊन भव्य श्रीराम मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर स्वस्ति वचन व गणेशपुजनाद्वारे प्राणप्रतिष्ठा विधींना प्रारंभ झाला. प्राणप्रतिष्ठा विधींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तल्लीन मनाने सहभागी झाले होते. प्राणप्रतिष्ठा विधी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते श्रीरामललाची आरती करण्यात आली. यावेळी उपस्थित पुरोहित चवऱ्यांनी श्रीरामललाची सेवा करत होते. यावेळी उपस्थितांनी घंटानाद केला. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काही क्षण भगवान श्रीरामललाचे मोहक रूप न्याहाळत होते, त्यानंतर पंतप्रधानांनी भगवान श्रीरामललास परिक्रमा घालून साष्टांग नमस्कार करून आशीर्वाद घेतले.
 
ram mandir 
 
प्राणप्रतिष्ठेसाठी गर्भगृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, श्रीरामजन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्यगोपालदास, कोषाध्यक्ष गोविंददेवगिरी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित होते.
 

ram mandir 
 
श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेमध्ये सर्व समाजाला सहभागी करून घेण्यात आले होते. प्राणप्रतिष्ठेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह यजमान म्हणून देशभरातील १५ जोडप्यांना बहुमान देण्यात आला. त्यामध्ये उदयपुर येथून वनवासी कल्याण आश्रमाचे अध्यक्ष रामचंद्र खराडी, आसाममधून राम कुई जेमी, जयपूरमधून गुरूचरणसिंह गिल, हरदोई येथील कृष्ण मोहन, मुलतानी येथून रमेश जैन, तामिळनाडूचे अझलारासन, महाराष्ट्रातून विठ्ठल कांबळे आणि घुमंतू समाज ट्रस्टचे महादेव गायकवाड, कर्नाटकातून लिंगराज वासवराज अप्पा, लखनऊचे दिलीप वाल्मिकी, काशीचे डोमराज अनिल चौधरी यांच्यासह कैलाश यादव आणि कवींद्र प्रतापसिंह आणि हरियाणाचे अरूण चौधरी हे प्राणप्रतिष्ठा विधींसाठी सपत्नीक यजमान होते.

Powered By Sangraha 9.0