नवी दिल्ली : श्री रामललाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा नुकताच पार पडला असून जगभरात या सोहळ्याचे आकर्षण राहिले आहे. अमेरिकास्थित टाईम्स स्क्वेअर येथे राम मंदिराची ३डी चित्रे दाखविण्यात आली आहेत. त्यामुळे जगभरातील रामभक्त याक्षणी श्री राम मंदिर लोकार्पण सोहळ्याचे साक्षीदार होत आहेत.
तसेच, न्यूयॉर्क टाइम्स स्क्वेअरमध्ये थेट प्रक्षेपण करण्यात आले तर वॉशिंग्टन डीसी, एलए आणि सॅन फ्रान्सिस्को येथेही स्वतंत्र कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अनेक मंदिरांमध्ये राम भजनाचा गजर होत असून लोक मोठ्या संख्येने जमले आहेत.
दरम्यान, मॉरिशसमध्ये अयोध्येतील राम लल्लाचा अभिषेक सोहळा पाहण्यात येत आहे. तेथील रामभक्त रामनामात दंग झाले आहेत. एकंदरीत, आता फक्त एक भारतीय कार्यक्रम राहिलेला नाही तर जगभरातील लाखो लोक साजरा करत असलेला जागतिक उत्सव बनला आहे. जगभरातील लाखो लोक अयोध्येत राम लल्लाच्या राज्याभिषेकाचा उत्सव साजरा करत आहेत. ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.