विदेशातही दुमदुमला 'जय श्री राम'चा नारा! रामलला प्राणप्रतिष्ठापना सोहळा जगभरात साजरा

22 Jan 2024 15:29:48

Ram Nam


मुंबई :
अयोध्या येथे नुकताच रामललाचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडला असून अनेक वर्षांपासून सुरु असलेल्या संघर्षाचे फलित मिळाले आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण असताना जगभरातही अनेक देशांनी हा दिवस साजरा केला आहे. तेथील मंदिरांची सजावट करुन विविध प्रकारे हा उत्सव साजरा करण्यात येत आहे.
 
नेपाळमधील जनकपूर येथील जानकी मंदिराची सजावट करण्यात आली आहे. येथे एक लाखांहून अधिक दिवे लावले जाणार आहेत. याशिवाय श्रीलंकेतील सीता एलिया मंदिरातही पूजाअर्चा करण्यात आली. रावणाने सीतेचे अपहरण केल्यानंतर तिला याच मंदिरात ठेवल्याचे बोलले जाते. तसेच इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन यांनी हिंदीत ट्विट करून राम मंदिराच्या भव्य सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
 
याशिवाय न्यूझीलंडचे मंत्री डेव्हिड सीमोर यांनीदेखील गळ्यात भगवा रुमाल गुंडाळून 'जय श्री राम'चा नारा दिला. मॉरिशसमधील मंदिरांमध्येही दिवे लावून रामनामाचा जप करण्यात आला. फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये रामललाच्या प्राणप्रतिष्ठापने निमित्त रामभक्तांनी रॅली काढली. ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील श्री दुर्गा मंदिरात अयोध्या राम मंदिराचा अभिषेक सोहळा साजरा करताना भाविक दिसले. यावेळी मंदिरात राम भजन करण्यात आले. तसेच भारतीय वंशाचे लोक हातात झेंडे घेऊन 'जय श्री राम' म्हणताना दिसले. रविवार, २१ जानेवारी रोजी अमेरिकेत न्यूयॉर्कमधील टाइम्स स्क्वेअर येथे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने लोक रामनामात रंगलेले दिसले.


Powered By Sangraha 9.0