रामराज्य आणण्याची जबाबदारी आता आपली : सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

22 Jan 2024 20:02:06

Dr. Mohanji Bhagwat in Ayodhya
(Mohanji Bhagwat Speech at Ayodhya)

नवी दिल्ली : अयोध्येत केवळ श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठा झाली नसून त्यासोबतच भारताचे ‘स्व’त्वदेखील स्थापित झाले आहे. त्यामुळे आता देशात रामराज्य आणण्याची जबाबदारी आपली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक (रा. स्व. संघ) डॉ. मोहनजी भागवत यांनी सोमवारी अयोध्येत केले.
 
अयोध्येतील भव्य मंदिरात श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेनंतर रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी देशवासियांना संबोधित केले. ते म्हणाले, "आजच्या दिवसाचा आनंद हा अवर्णनीय असा आहे. आज केवळ मंदिरात श्रीरामललाची प्राणप्रतिष्ठाच झाली नसून त्यासोबतच भारताच्या ‘स्व’त्वाचीही प्रतिष्ठापना झाली आहे. नव्या ऊर्जेने आणि चेतनेने भारलेला भारत देश आता संपूर्ण जगास मार्गदर्शन करण्यासाठी सज्ज झाला आहे"

 
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तपस्वी आहेतच, त्यांनी श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेपूर्वी कठोर असे अनुष्ठान केल्याचे सरसंघचालकांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, "पंतप्रधानांप्रमाणेच आता आपणही देशासाठी तप करण्याची वेळ आली आहे. अयोध्येत कलह झाला, म्हणून श्रीराम वनवासात गेले. वनवासातून परत येण्यापूर्पी त्यांनी जगातील कलह मिटविला होता. आता पाचशे वर्षांनंतर ते पुन्हा अयोध्येत आले आहेत. त्यामुळे आता आपल्यालादेखील आपल्यातले छोटे छोटे तंटे आणि कलह बाजुल ठेवण्याची आणि ह्रदयात करूणा, सेवा आणि परोपकाराने कर्तव्यपथावर चालावे लागणार आहे. प्रभू श्रीराम हे चराचरात आहेत, त्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकास सोबत घेऊन आणि त्यांच्यासोबत समन्वय साधून राष्ट्रकार्यासाठी सज्ज होण्याची आणि रामराज्य आणण्याची जबाबदारी आता आपली आहे"
 
 
Powered By Sangraha 9.0