पौष शुद्ध द्वादशीला सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी ५०० वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामलला पुन्हा आपल्या जन्मभूमीत विराजमान होत आहेत. हिंदू जनमानसाला हतोत्साहित करण्यासाठीच अयोध्या, मथुरा आणि काशिविश्वनाथ या हिंदूंच्या तीर्थक्षेत्राची विधर्मी आक्रमकांनी विटंबना केली. परंतु, संत-महंत आणि सामान्य हिंदू जनमानसाने भारताची चिती सतत जागृत ठेवून निराश न होता पिढ्यान्पिढ्या हा संघर्ष सुरू ठेवला. श्रीरामलला विराजमान यांची भव्य मंदिरात पुनःप्रतिष्ठापना हीच भारत भाग्योदयाची नांदी असणार आहे.
अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका।
पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः
अयोध्या... भारतीय इतिहासातील प्राचीन मोक्षदायिनी सप्तपुरीमधील एक ऐतिहासिक नगरी. मर्यादापुरुषोत्तम श्रीरामाची जन्मभूमी, भगवान बुद्ध यांची तपोभूमी, जैन मतानुसार पाच तीर्थंकरांची जन्मभूमी, गुरू नानकदेव, गुरू तेगबहादूर आणि गुरू गोविंदसिंगजी महाराज यांची कर्मभूमी म्हणून विख्यात असलेली शरयू तीरावरील अयोध्या आज न्यायासाठी शेकडो वर्षांपासून प्रतीक्षेत आहे. भारतीय संविधानाच्या मूळ प्रतीतदेखील मर्यादापुरुषोत्तम श्रीराम, माता सीता आणि लक्ष्मण यांचे रेखाचित्र अंकित केले आहे. त्याअर्थाने श्रीराम हे संवैधानिक, सांस्कृतिक आणि अवतारी महापुरुष आहेत.
वाल्मिकी रामायणाच्या पाचव्या सर्गात अयोध्यापुरीचे वर्णन तपशीलवार केले आहे. शरयू नदीच्या काठावर वसलेल्या या नगरीची निर्मिती वैवस्वत मनू महाराजांनी केली होती. रामायणासह अनेक शास्त्रांमध्ये अयोध्येचा उल्लेख शरयू नदीच्या काठावर वसलेली नगरी म्हणूनच आढळून येतो. अयोध्येपासून १६ मैल अंतरावर नंदीग्राम नामक स्थान आहे. तेथूनच श्रीराम यांच्या अनुपस्थितीत भरताने अयोध्येचा राज्यकार्यभार सांभाळला. अयोध्या रघुवंशी राजांच्या कौशल जनपदाची फार जुनी राजधानी असे. वैवस्वत मनूचा मुलगा इक्ष्वाकू वंशजांनी या नगरीवर राज्य केले होते. या वंशात पुढे राजा हरिश्चंद्र, राजा भगीरथ, सगर आदींनंतर राजा दशरथ हे ६३वे शासक होते. याच वंशातील श्रीरामांनी पुढे शासन केले होते. हेच ते रामराज्य. त्यांचा पश्चात श्रीरामपुत्र कुशने हे नगर पुन्हा वसवले. कुशच्या पश्चात सूर्यवंशाची पुढील ४४ पिढ्यांपर्यंत रघुवंशीयांनी शासन केले.
उज्जैनचे राजा विक्रमादित्य यांना महादेवाने अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे आदेश दिले. अनेक वर्षं राजा विक्रमादित्य यांनी श्रीराजन्मभूमी शोधण्याचा प्रयत्न केला आणि अखेर ते अयोध्येत पोहोचले. शरयू नदीच्या काठांवर बसलेले असताना राजा विक्रमादित्य यांना काळ्या घोड्यावर एक काळा व्यक्ती येताना दिसला. ती व्यक्ती घोड्यासह पाण्यात गेली. पाण्यातून बाहेर आल्यानंतर ती व्यक्ती पांढरी शुभ्र झाली. राजा विचारात पडला. त्यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग केला. त्या व्यक्तीने सांगितले की, मी इथे दर रामनवमीला पाप धुण्यासाठी येतो. तेव्हा त्यांना कळले की, जिथे ते उभे आहेत ती रामाची नगरी अयोध्या आहे. राजाने विचारले की, ङ्गङ्घमला प्रभू श्रीरामाची जन्मभूमीच्या ठिकाणी जायचं आहे.फफ त्यानंतर त्या व्यक्तीने राजाला सांगितले की, ङ्गङ्घमी गेल्यावर एक गाय येईल. ती गाय जिथे जाऊन थांबेल, ती जागा श्रीरामजन्मभूमी असेल.फफ राजा गाईच्या मागे गेला आणि त्यांना अखेर रामजन्मभूमी मिळाली. राजा विक्रमादित्याने त्याजागी एक भव्यदिव्य रामजन्मभूमी मंदिर बांधले.
महाभारतकाळात याच रघुवंशीयांच्या वंशातील बृहद्रथ, अभिमन्यूच्या हातून महाभारताच्या युद्धात ठार मारला गेला. बृहद्रथाच्यानंतर बर्याच काळापर्यंत ही नगरी आधी मगध मग, कन्नोजच्या शासकांच्या अधिपत्याखाली राहिली. शेवटी येथे सैयद सालारने तुर्क शासनाची स्थापना केली. त्यानंतर अयोध्येसाठीची लढाई सुरू झाली. इसवी सन १५२६ मध्ये मुघल आक्रमक बाबर भारतावर चाल करून आला. भारतीय मानमर्यादा, मंदिरे यांची अक्षरशः धूळधाण करीत बाबराचा वरवंटा फिरत फिरत १५२८ मधे अयोध्येतील श्रीजन्मभूमीवर फिरला. इतिहासकार कनींघम याने लिहून ठेवले आहे की, बाबराचा सेनापती मीर बाकी याने श्रीराम जन्मभूमीवर तोफगोळे डागून भारतीय अस्मितेचा मानभंग केला.
सुमारे १५ दिवस सतत चाललेल्या या धर्मांध धुमाकुळाने १ लाख, ७४ हजार हिंदू साधू-संत, बैरागी आणि सामान्य नागरिक यांची कत्तल अयोध्येत घडवली गेली. एका कथेनुसार, विक्रमादित्य राजाने बांधलेल्या भव्य मंदिरातील प्रभू श्रीराम, लक्ष्मण आणि सीता माता यांच्या मूळ मूर्ती, विध्वंसापूर्वी अगोदरच तेथून काढून सुरक्षित ठिकाणी पाठवल्या होत्या. बाबराने अयोध्येकडे कूच केले. तेव्हा, मंदिराचे रखवालदार पंडित श्यामानंद महाराज मूर्ती घेऊन अयोध्येतून निघून गेले आणि पैठणच्या स्वामी एकनाथ महाराजांच्या स्वाधीन केल्या. नंतर या मूर्ती समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्याकडे सुपुर्द करण्यात आल्या. समर्थ रामदास स्वामी जेव्हा दक्षिण भारताच्या दौर्यावर होते, तेव्हा त्यांनी त्या मूर्ती तुंग आणि भद्राच्या पवित्र संगमाच्या काठावर कर्नाटकातील हरिहर नावाच्या छोट्याशा गावात ठेवल्या. तेव्हापासून हरिहर येथील नारायण आश्रमातील गुरूंकडून मूर्तींची पूजा केली जात आहे.
श्रीरामजन्मभूमीचा विध्वंस केल्यानंतर मंदिराच्या मलब्यातील अवशेषांचा उपयोग करून त्याच जागेवर मीर बाकीने एक मशीदसदृश्य ढाचा निर्माण केला. मात्र, अजानसाठी मिनार आणि वजूसाठी पाण्याची कोणतेही व्यवस्था नसलेला हा ढाचा कोणीही मशीद म्हणून स्वीकारला नाही. किंबहुना, अनेक शतके जन्मभूमी स्थान असल्याने हिंदू भाविक या ढाच्याभोवताली प्रदक्षिणा मारून मानसपूजन करीत. मात्र, बाबर आणि मीर बाकी यांच्या बर्बर दहशतवादी कृत्यामुळे कोणी जिला युद्धात जिंकू शकत नाही म्हणून विख्यात असलेल्या अयोध्या या जनपदाने शरयू तीरावर तेव्हा टाहो फोडला असेल.
१५२८ ते १९४९ पर्यंत जन्मभूमी मुक्तीसाठी अनेक आंदोलने झालीत. एकूण ७६ आंदोलने/युद्ध झाले आणि लाखो रामभक्तांनी बलिदान दिले. हिंदू परंपरेत स्थान माहात्म्य आहे. त्यामुळे श्रीराम जन्मस्थान हा समस्त हिंदूंच्या आस्थेचा आणि अस्मितेचा विषय. विवादित मशीदसदृश्य ढाचा हे मुळात जन्मभूमी स्थान असल्याने वाद वाढत असल्याचे पाहून तत्कालीन प्रशासनाने या स्थळी कुलूप लावले.
श्रीरामलला विराजमान
दि. २३ डिसेंबर, १९४९ रोजी या स्थळी तैनात सुरक्षा रक्षकाला जे प्रत्यक्ष दिसले, ते अत्यंत आश्चर्यजनक घडले. सुरक्षा रक्षक म्हणतो, मध्यरात्रीनंतर आकाशातून एक दिव्यप्रकाश त्या भवनात जाताना दिसला आणि अचानक बालरूपातील श्रीरामलला तिथे प्रगट झाले. पहाटे पहाटे ही वार्ता कानोकानी पसरली आणि आबालवृद्ध नागरिक माताभगिनींचे लोंढे रामलला दर्शनासाठी येऊ लागले.
न्यायालयात रामलला
सत्य आणि न्याय यांचा आजन्म पुरस्कार करणार्या धर्मधुरंधर श्रीरामाला न्यायालयीन वादात ओढले गेले. १९५० मध्ये काही श्रद्धाळू रामभक्त न्यायालयात गेले आणि प्रगट झालेल्या श्रीरामलला विराजमान यांची पूजाअर्चना आम्हाला करू द्यावी, अशी याचिका दाखल केली. याचदरम्यान मुस्लीम समाजातील १३ नागरिकांनी शपथपत्र दाखल करून विवादित जागी मंदिराचा विध्वंस करून ढाँचा उभारला असल्याने हे स्थान हिंदू समाजाकडे राहायला मुस्लीम समाजाची आपत्ती नाही, असे नमूद केले.
१९५९ मध्ये बैरागी निर्मोही आखाड्याने प्रशासनाचा रिसीवर हटवून त्याजागी महंत जगन्नाथदास यांची नेमणूक करून मंदिराची जागा निर्मोही आखाड्यास द्यावी, अशी मागणी केली. १९६१ मध्ये सुन्नी वक्फ बोर्डाने मंदिरातील मूर्ती हटवून विवादित स्थळास सार्वजनिक मशीद घोषित करण्यात यावे, यासाठी याचिका दाखल केली. पुढे मीनाक्षीपुरम प्रकरणानंतर १९८३ मध्ये उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे विराट हिंदू संमेलन झाले. ज्येष्ठ काँग्रेस नेते गुलजारीलाल नंदा आणि उत्तर प्रदेश सरकारमधील मंत्री दाउदयाल खन्ना या संमेलनात उपस्थित होते. समस्त हिंदू जनतेसाठी प्रातःस्मरणीय असलेल्या अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी आणि वाराणसी येथील काशिविश्वनाथ या तीन श्रद्धास्थानांच्या मुक्तीचा प्रस्ताव या संमेलनात एकमताने मंजूर करण्यात आला. श्रीराम जन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीचे गठन करण्यात आले. ज्याचे गोरक्षपीठाधिश्वर महंत अवैद्यनाथ अध्यक्ष तर दाउदयाल खन्ना महामंत्री झाले. विश्व हिंदू परिषदेचे प्रचारक अशोकजी सिंघल यांच्या नेतृत्वाखाली १९८४ मध्ये राम जानकी रथयात्रा देशभर काढण्यात आल्या.
१९८५च्या उडुपी येथील धर्मसंसदेत कुलूपबंद असलेल्या रामजन्मभूमीचे टाळे उघडून हिंदूंना पूजाअर्चना करू देण्यात यावी, असा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. १९८५ मध्ये रामजन्मभूमी आंदोलनाला गती मिळावी, यासाठी श्रीरामजन्मभूमी मुक्ती न्यास स्थापन करण्यात आला. जगद्गुरू रामानंदाचार्य शिवरामाचार्यजी महाराज यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या या न्यासात वरिष्ठ शंकराचार्य ज्योतिषपीठाधिपती जगद्गुरू शांतानंद (प्रयाग) महाराज, महंत अवैद्यनाथ महाराज, परमहंस रामचंद्रदास महाराज, महंत नृत्य गोपालदास महाराज आणि महंत रामसेवकदास महाराज, प्रभुदत्त ब्रह्मचारी महाराज यांच्यासोबत दाउदयाल खन्ना, विष्णू हरी डालमिया आणि अशोकजी सिंघल सदस्य म्हणून होते. अशातच १९८६ मध्ये फैजाबाद न्यायालयाने रामललाचे कुलूप उघडण्याचा आदेश दिला.
१९८९ मध्ये पूज्य देवराहा बाबा यांच्या निर्देशानुसार, देशभरात रामशिलापूजन झाले. विश्व हिंदू परिषदेने घेतलेल्या या कार्यक्रमात करोडो नागरिकांनी प्रत्यक्ष सहभागी होऊन पूजित झालेल्या लाखो शिला अयोध्येत पोहोचल्या. ही चळवळ पुढे नेण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्येपर्यंत रथयात्रा जाहीर केली. या मिरवणुकीचे नेतृत्व लालकृष्ण अडवाणी करत होते आणि त्यात हजारो कारसेवक किंवा स्वयंसेवकांचा समावेश होता. दि. २५ सप्टेंबर, १९९० रोजी सोमनाथ येथे यात्रा सुरू झाली आणि शेकडो गाव आणि शहरांमधून गेली. ते दिवसाला अंदाजे ३०० किलोमीटर प्रवास करत होते आणि अडवाणींनी एकाच दिवसात अनेकदा सहा जाहीर सभांना संबोधित केले होते. या यात्रेमुळे हिंदूंमध्ये धार्मिक आणि लढाऊ दोन्ही भावनांचे जागरण झाले आणि ही रथयात्रा भारतातील सर्वांत मोठ्या जनआंदोलनांपैकी एक बनली. १९८९ आणि १९९२ मध्ये झालेल्या कारसेवेत हिंदू समाजाने उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देऊन जननायक श्रीराम हे मनामनात कायमस्वरूपी आहेत याची प्रचिती दिली.
हिंदू जागृतीचा विस्फोट
दि. ६ डिसेंबर, १९९२ गीता जयंती दिनी लाखो रामसेवक कारसेवेकरिता अयोध्येत दाखल झाले. अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था असूनही ङ्गहोई है सोइ जो राम रची राखाफ या वचनावर विश्वास ठेवून ठरल्याप्रमाणे कारसेवेला प्रारंभ झाला. शरयू तीरावरील एक मूठभर रेती आणि ओंजळीभर पाणी शिलान्यासस्थळी टाकण्याचा साधा कार्यक्रम ठरला होता. मात्र, जमलेल्या लाखो रामसेवकांच्या डोळ्यात हिंदू समाजावर बाबराने केलेला अनन्वित अत्याचार आणि त्या क्रूरकरम्याचे प्रतीक असलेला तो ढाँचा सलत होता. संतांच्या शांततेच्या आवाहनानंतरही हजारो वर्षांचा अपमानास्पद डाग पुसून काढण्यासाठी जनतेचा रेटा ढाँच्याजवळ गेला आणि भारतमातेच्या मानचित्रावर लागलेला कंलक पुसला गेला. पुरातत्व सर्वेक्षण, उत्खनन, आध्यात्मिक पुरावे आणि परंपरा या योगे श्रीराम जन्मभूमीचे स्थान आणि त्याखाली पुरातन हिंदू मंदिराचे अवशेष ही बाब सिद्ध झाल्यानंतर दि. ५ ऑगस्ट, २०२० रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या हस्ते श्रीरामजन्मभूमी मंदिराचा शिलान्यास संपन्न झाला आणि आता पौष शुद्ध द्वादशीला सोमवार, दि. २२ जानेवारी रोजी ५०० वर्षांच्या संघर्षानंतर श्रीरामलला पुन्हा आपल्या जन्मभूमीत विराजमान होत आहेत.
हिंदू जनमानसाला हतोत्साहित करण्यासाठीच अयोध्या, मथुरा आणि काशिविश्वनाथ या हिंदूंच्या तीर्थक्षेत्राची विधर्मी आक्रमकांनी विटंबना केली. परंतु, संत-महंत आणि सामान्य हिंदू जनमानसाने भारताची चिती सतत जागृत ठेवून निराश न होता पिढ्यान्पिढ्या हा संघर्ष सुरू ठेवला. श्रीरामलला विराजमान यांची भव्य मंदिरात पुनःप्रतिष्ठापना हीच भारत भाग्योदयाची नांदी असणार आहे. लाखो कारसेवक, साधू-संत, महंत, आचार्य यांच्या परिश्रमाची फलश्रुती होणार असल्याने जगभरातील हिंदूंच्या उत्साहाला पारावार उरलेला नाही. संघटित हिंदू आणि समर्थ भारत यांच्या अस्मितेचा मानबिंदू म्हणजे श्रीरामजन्मभूमीवरील राष्ट्रमंदिर होय. चला तर श्रीरामलला विराजमान होत असताना ङ्गयाचि देही याचि डोळाफ बघूया आणि उच्चारवाने जयजयकार करूया..जय जय श्रीराम!
- डॉ. भालचंद्र हरदास