अयोध्या आंदोलनाचे पंचप्राण!

    21-Jan-2024
Total Views | 198

Karsevak

स्वतंत्र भारताच्या इतिहासात १९८३ ते २०१९ या काळात झालेले रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन ही एक विलक्षण घटना होती. एखाद्या प्रश्नाच्या सोडवणुकीसाठी एवढे दीर्घ, संघटित व सूत्रबद्ध, सुनियोजित प्रयत्न एवढ्या व्यापक प्रमाणावर यापूर्वी कोणीही केलेले नव्हते. या प्रश्नावर जनमत तयार करण्यासाठी आखलेले कार्यक्रमदेखील नावीन्यपूर्ण व वैशिष्ट्यपूर्ण होते. श्री रामजानकी रथयात्रा, शिलापूजन, श्रीराम ज्योती यात्रा आणि शेवटच्या टप्प्यातील दोन वेळा झालेल्या कारसेवांमध्ये लक्षावधींचा सहभाग. सर्वकाही अवर्णनीय, अद्भुत असेच होते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या दृष्टीने ते मंतरलेले दिवस होते. अयोध्या आंदोलनात असे काही साधक होते की ज्यांची तपस्या, पुरुषार्थ कधीच विसरता येणार नाही. त्यांचा त्याग, समर्पण आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा अयोध्येच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने अंकित होईल यात तीळमात्र शंका नाही. आज या लेखात अशा काही व्यक्तींचा परिचय करून देणार आहे. ज्यांनी जन्मभूमी मुक्ती आंदोलनातून राष्ट्र निर्माणाचा मार्ग प्रशस्त केला.
 
लालकृष्ण अडवाणी
 
जानेवारी १९८९ मध्ये हिमाचल प्रदेशातील पालमपूर येथे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन झाले. त्या काळात लालकृष्ण अडवाणी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तोपर्यंत रामजन्मभूमी आंदोलनाची मशाल प्रज्वलित ठेवण्याचे काम संतांच्या नेतृत्वाखाली प्रामुख्याने विश्व हिंदू परिषद करत होती. या अधिवेशनापर्यंत भाजप पक्ष म्हणून आंदोलनात सहभागी नव्हता. देशातील अन्य विरोधी पक्ष या आंदोलनाच्या विरोधात उभे ठाकले होते.निवृत्त न्यायाधीश तारकुंडे यांनी तर शिलान्यासाला परवानगी मिळू नये म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली होती. समाजात मात्र या आंदोलनाला वाढते समर्थन मिळत होते. या सगळ्या पार्श्वभूमीवर पालमपूर अधिवेशनात अडवाणींच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करण्यात आला. भारतीय जनता पक्ष उघडपणे श्रीराम जन्मभूमी आंदोलनाला समर्थन देत आहे, असे जाहीर करण्यात आले. अयोध्येच्या रामजन्मभूमी स्थानी मंदिर उभारणे हा राष्ट्रीय अस्मितेचा मुद्दा आहे, असे ठासून सांगण्यात आले. त्या क्षणापासून अडवाणी या विषयाची बुलंद तोफ म्हणून मैदानात उतरले. त्याच काळात तथाकथित धर्मनिरपेक्षतावाद्यांनी अनेक वर्षं बासनात पडलेला मंडल आयोगाचा अहवाल बाहेर काढला आणि हिंदू समाजातील जातीजातींमध्ये संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न केला. या जातीगत राजकारणाच्या गदारोळात अडवाणींनी भाजपचे समर्थपणे नेतृत्व केले. जाती-जातीत भांडणे लावून आपली सत्तेची पोळी भाजणार्‍यांना आपल्या तर्कशुद्ध विचाराने सडेतोड उत्तर दिले. एका बाजूला मंदिर आंदोलनाला व्यापक समर्थन मिळत होते. ३ लाख, १६ हजार गावांमधून विटांचे पूजन होऊन त्या विटा अयोध्येच्या जन्मभूमी मंदिरासाठी पाठविण्यात आल्या होत्या.
 
रामभक्तांचे व्यापक जनसमर्थन लक्षात घेऊन, संतांनी दि. ३० ऑक्टोबर, १९९० या दिवशी प्रत्यक्ष कारसेवेची (हाताने करावयाची सेवा) घोषणा केली. दुसरीकडे भाजपने या आंदोलनात उडी घेतली होती. दि. २५ सप्टेंबर ते ३० ऑक्टोबर या काळात अडवाणींच्या नेतृत्वात सोमनाथ ते अयोध्या या ऐतिहासिक यात्रेला सुरुवात झाली. दहा हजार किमी आणि आठ राज्यांमधून ही यात्रा गेली. यात्रेला प्रचंड जनसमर्थन मिळाले. अनेक गावांमध्ये, शहरांमध्ये जनता तासन्तास त्यांच्या स्वागतासाठी, रथाचे दर्शन घेण्यासाठी उभी असल्याचे चित्र दिसत होते. जणू काही अयोध्येचे श्रीराम आपल्याला दर्शन देण्यासाठी आले आहेत, या भावनेने लोक रथ ज्या मार्गावरून गेला, त्या ठिकाणची माती कपाळी लावत होते. 'गर्वसे कहो हम हिंदू हैं'चा नारा प्रत्येक सभेत बुलंद होत होता. श्री राम जन्मभूमी मंदिर हा हिंदू-मुस्लीम प्रश्न नसून, राष्ट्रीय स्वाभिमानाचा विषय आहे.
 
देशाच्या माथ्यावरील अपमानाचा कलंक पुसून टाकण्यासाठी दि. ३० ऑक्टोबरला 'चलो अयोध्या'ची हाक अडवाणी प्रत्येक सभेत देत होते. त्यावेळी उत्तर प्रदेशमध्ये मुलायमसिंहांचे सरकार होते आणि त्यांनी संपूर्ण उत्तर प्रदेशच्या सीमा बंद केल्या होत्या. 'यहाँ परिंदा पर नही मार सकता' अशी दर्पोक्ती त्यांनी केली होती. संपूर्ण देशभर भीतीचे सावट होते. कारसेवेला जाणार्‍यांनी आपले कफन सोबत न्यावे, घरातील मंडळींची निरवानिरव करूनच निघावे, असे वातावरण त्यामुळे निर्माण झाले होते, अशा काळ्याकुट्ट अंधारातून आशेचा, विश्वासाचा, स्वाभिमानाचा दीपक मनामनात जागवत यात्रा मार्गक्रमण करत होती. 'बच्चा बच्चा राम का, जन्म भूमी के काम का, हिंदू हितकी बात करेगा, वही देश पर राज करेगा' या घोषणांनी हिंदू तरुणाईला रोमांचित करण्याचे काम लालकृष्ण अडवाणींच्या यात्रेने केले होते. यात्रेच्या दरम्यान झालेल्या अडवाणींच्या भाषणांनी सांस्कृतिक राष्ट्रवादाची वैचारिक मांडणी अतिशय उत्तमपणे केली होती.
 
दि. ८ नोव्हेंबर, १९२७ साली कराचीत जन्मलेले अडवाणी रा. स्व. संघाशी जोडले गेले. काही काळ ते प्रचारकही होते. तद्नंतर जनसंघ (भाजपचा पूर्वावतार) आणि भाजप असा प्रवास राहिला. ङ्गऑर्गनायझरफ या इंग्रजी साप्ताहिकाचे संपादक म्हणूनही त्यांनी काही काळ काम पाहिले. लोकसभा, राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून आलेले अडवाणी २००२ ते २००४ या काळात देशाचे उपपंतप्रधान होते. आज अडवाणींच्या रथयात्रेला ३३ वर्षं झाली. रथयात्रेच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना अटकही झाली होती. त्यांच्या निषेधार्थ विश्वनाथ प्रताप सिंगांचे शासन कोसळले. वयोपरत्वे २०१४ नंतर ते राजकारणात सक्रिय राहिले नाहीत. पण, राजकारणाची दशा आणि दिशा बदलण्यातील त्यांचे योगदान विसरता येणार नाही. १९८४ साली भारतीय जनता पक्षाला लोकसभेच्या केवळ दोन जागा मिळाल्या होत्या. २०१४ साली त्याच पक्षाला पूर्ण बहुमत मिळण्यात अडवाणींच्या रथयात्रेची महत्त्वाची भूमिका आहे, यात तीळमात्र शंका नाही.
 
साध्वी उमा भारती
 
अयोध्या आंदोलनाला जनसंघर्षाचे स्वरूप देण्यामध्ये संतांप्रमाणेच अनेक साध्वींचाही मोठा वाटा होता. अध्यात्म, पूजाअर्चा, प्रवचने आदींमध्ये व्यस्त असलेले साधू, संन्यासी, बैरागी आणि साध्वी आपल्या पारंपरिक मठांमधून बाहेर पडल्या आणि लोकजागरणरुपी अस्मितेचे तांडव उभे केले. याच मालिकेतील एक अग्रणी नाव म्हणजे मध्य प्रदेशातील टिकमगढच्या उमा भारती. आपल्या मठात मधुर स्वरात कृष्ण भजन म्हणण्यात आणि भागवत कथा ऐकविण्यात मग्न असलेल्या साध्वी अयोध्या आंदोलनाची धगधगती मशाल बनल्या. एका बाजूला अडवाणींची रथयात्रा समाजात हिंदुत्वाचे स्फुल्लिंग चेतवत होती, तर दुसरीकडे उमा भारती आंदोलनाची मशाल घेऊन भोपाळ ते अयोध्या पदयात्रेला निघाल्या होत्या. उत्तर प्रदेशात हिंदू विरोधी मुलायमसिंह सरकार होते. राज्याच्या सर्व सीमा सील केलेल्या होत्या. निमलष्करी दले बंदूक रोखून सिद्ध होती. अशा काळात ङ्गलाठी गोली खायेंगे, मंदिर वही बनायेंगेफचा नारा देत तरुणाईला कारसेवेचे आवाहन करत निघालेल्या उमा भारतींना चित्रकूट येथे अटक झाली. पण, पोलिसांना गुंगारा देत साध्वी उमा भारती दि. ३० ऑक्टोबरच्या कारसेवेसाठी अयोध्येत पोहोचल्या. आपल्याला ओळखू नये म्हणून त्यांनी मुंडन केले.
 
स्वाभिमानाच्या पुन:प्रतिष्ठापनेसाठीचा त्यांचा हा त्याग त्यावेळी वर्तमानपत्रांमधून खूप गाजला होता. कारसेवा यशस्वी झाली होती. पण, शेकडो निशस्त्र कारसेवकांना मुलायमसिंह यांच्या पोलिसांनी गोळ्या घातल्या होत्या. याही कठीण काळात आंदोलकांचे मनोधैर्य उंचावण्याचे काम करणार्‍या साध्वी उमा भारती संघर्षाचा चेहरा आणि आवाज बनल्या. आंदोलनातील संघर्षामुळे त्यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. १९९०च्या लोकसभा निवडणुकीत त्या खजुराहो मतदारसंघातून निवडून आल्या. पहिल्या कारसेवेत वादग्रस्त वास्तूच्या घुमटावर भगवा ध्वज फडकला होता. पण, अपमानाचा कलंक असलेली वास्तू मात्र कायम होती. अशावेळी संतांनी १९९२ साली दुसर्‍या कारसेवेची घोषणा केली. तथाकथित सेक्युलरवादी आणि त्यांचे भाट असलेल्या वर्तमानपत्रांनी मथळे दिले - यावेळी कारसेवक मोठ्या संख्येने निघणार नाहीत, यावेळची कारसेवा फसणार. अशा वातावरणात उमा भारतींच्या प्रखर वक्तृत्वाने कारसेवकांमध्ये उत्साह संचारला. लक्षावधी कारसेवक नोव्हेंबर १९९२च्या अखेरीस अयोध्येत दाखल झाले.
 
न्यायालयीन निर्णयाची प्रतीक्षा होती. पण, न्यायालय टाळाटाळ करत होते. कारसेवकांच्या धैर्याचा बांध सुटत चालला होता. दि.६ डिसेंबर, १९९२ मंचावर सर्व मान्यवर कारसेवकांना मार्गदर्शन करत होते. त्या वेळचे साध्वी उमा भारतींचे भाषण अयोध्येच्या संघर्षगाथेत सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल असे होते. 'सरयू का पानी हमारे खून से लाल भी हो जाये, तो पीछे नही हटेंगे, मंदिर बनाने के लिए अगर जरूरत पडी तो हम अपनी हड्डीयों को इट बना देंगे और लहू को गारा.' उमा भारतींच्या मुखातून अंगार बरसत होता, तर डोळ्यातून संघर्षयज्ञ पूर्ण झाल्याबद्दल अश्रुधारा वाहत होत्या. नकली धर्मनिरपेक्षतावाद्यांच्या नाकर्तेपणामुळे कारसेवकांच्या धैर्याचा बांध तुटला. कारसेवकांमध्ये हजार हत्तींचे बळ एकवटले. बाबरीवर घणाचे घाव पडू लागला, रामाची वानर सेना बाबरीवर तुटून पडली. बघता बघता बाबरी जमीनदोस्त झाली. हे दृश्य बघून उभा भारतींच्या चेहर्‍यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. या आनंदाच्या क्षणी एखाद्या लहान निरागस बालकाप्रमाणे त्या मुरली मनोहर जोशींना बिलगल्या. बाबरीच्या पतनाचा नव्हे, तर राम मंदिर निर्माणाचा आनंद होता. कलंक मिटला होता, पण भव्य मंदिराचे स्वप्न साकार व्हायचे होते. त्यानंतरही आंदोलनात उमा भारती सक्रिय राहिल्या. वेगवेगळ्या सभा, पदयात्रांमधून, 'मंदिर वही बनायेंगे, मंदिर भव्य बनायेंगे'चा विश्वास जागवत राहिल्या. त्या काही काळ मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री झाल्या. २००४ ते २०१४ या काळातील काँग्रेस सरकारच्या रामसेतू उखडून टाकण्याच्या विरोधात त्या ठामपणे उभ्या राहिल्या. उपोषण केले आणि आंदोलन यशस्वी झाले. मध्य प्रदेशातील गल्लीपासून दिल्लीपर्यंत अयोध्या संघर्षाची ज्योत प्रज्वलित ठेवणार्‍या साध्वी उमा भारतींचे नाव आंदोलनाच्या शीर्षस्थ नेत्यांमध्ये आवर्जून घेतले जाईल.
 
साध्वी ॠतंभरा
 
आपल्या ओजस्वी भाषणांनी अयोध्या आंदोलनाला वेगळे परिमाण देणार्‍या एका अग्निशिखेचे नाव आहे, साध्वी ऋतंभरा. लुधियानाच्या दौराहा गावात एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या साध्वी ॠतंभरांचा ओढा अध्यात्माकडे होता. त्यामुळे लहान वयातच त्यांनी भगवी वस्त्रे धारण केली आणि साध्वी झाल्या. युगपुरुष स्वामी परमानंदजी यांच्या प्रेरणेने त्यांनी स्वतःला राम मंदिर आंदोलनात झोकून दिले. ज्या ज्या ठिकाणी त्या बोलायला उभ्या राहत, त्या त्या ठिकाणी हजारोंचा जनसमुदाय जमा होत असे. त्यांच्या मुखातून निघालेला प्रत्येक शब्द श्रोत्यांमध्ये ऊर्जेचा संचार करत असे. १९९० सालच्या कारसेवेत एक साध्वी घोषणा देत अयोध्येच्या दिशेने निघाली. 'सौगंध राम की खाते हैं, हम मंदिर वही बनायेंगे.' त्या तरुण साध्वीचे नाव होते ॠतंभरा. अशोकजी सिंघल आणि अडवाणी राम मंदिर आंदोलनाचा चेहरा होते. पण, साध्वी त्या आंदोलनाची बुलंद तोफ होत्या. हा बुलंद आवाज हिंदुस्थानच्या कानाकोपर्‍यात गुंजत होता. गल्लीबोळात, नाक्या नाक्यावर ॠतंभरांच्या भाषणाच्या टेप ऐकल्या जात होत्या.
 
१९९१चे वर्ष होते. ॠतंभरांचा झंझावती प्रवास मुंबईत होता. त्यातली एक सभा दुपारी १२ वाजता लालबाग मार्केट नाक्यावर ठेवली होती. कामाच्या दिवशी आणि भर दुपारी या सभेला कोण येणार, अशी चिंता आम्हा कार्यकर्त्यांना भेडसावत होती. त्या ठरलेल्या वेळी सभास्थानी आल्या. माईक हातात घेतला आणि घोषणा केली, 'कहो गर्वसे हम हिंदू हैं,' श्रोत्यांमधून प्रतिसाद आला, 'हिंदुस्थान हमारा हैं.' वारुळातून मुंग्या बाहेर पडाव्यात तसे लालबागच्या चाळीतून, गल्ल्यांमधून माणसांचे जथ्थे सभास्थानी जमा झाले. सगळे वातावरण मंतरलेले होते. तत्कालीन उत्तर प्रदेश शासनाने ज्यावेळी श्रीराम जानकी यात्रेला सुरक्षा देण्यास नकार दिला, त्यावेळी संतांनी युवाशक्तीला आवाहन केले. त्यातून बजरंग दल आणि पुढे जाऊन दुर्गा वाहिनीची स्थापना झाली. साध्वी ऋतंभरा दुर्गा वाहिनीच्या संस्थापक-संयोजिका होत्या. दि. ६ डिसेंबर, १९९२ रोजी बाबरीचे पतन होताना साध्वी मंचावर उपस्थित होत्या. श्रीराम जन्मभूमी आंदोलनाच्या दरम्यान त्या इंदोरमध्ये गेलेल्या असताना, मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दिग्विजय सिंग यांच्या आदेशाने त्यांना अटक करण्यात आली होती. चार दिवस जेलमध्ये त्यांना नरकयातना भोगायला लागल्या. अनेक ठिकाणी त्यांनी वेश बदलून पोलिसांना गुंगारा देत अयोध्या मुक्तीचा शंखनाद सुरूच ठेवला. युगपुरुष स्वामी परमानंदजी यांच्या प्रेरणेने त्या अयोध्या आंदोलनाच्या प्रखर प्रवक्त्या झाल्या. एका बाजूला हिंदुत्वाची प्रखर शिखा, तर दुसरीकडे ममता रुपी वात्सल्य. आज वृंदावनमध्ये ५४ एकरच्या परिसरात ङ्गवात्सल्य ग्रामम याची साक्ष देत आहे.
 
मुरली मनोहर जोशी
 
ज्यावेळी अयोध्येची वादग्रस्त वास्तू ध्वस्त झाली, त्यावेळी व्यासपीठावर मुरली मनोहर जोशी हजर होते. मंचावर शीर्षस्थ नेत्यांची भाषणे सुरू होती आणि अचानक कारसेवकांच्या एका गटाने बाबरीवर चढाई केली आणि मिळेल त्या शस्त्राने, लाथा बुक्क्यांनी, पायाने नाचून, दगडाने ठेचून तो सांगाडा जमीनदोस्त केला. हे दृश्य बघून मुरली मनोहर जोशींच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या. जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान त्यांच्या चेहर्‍यावर होते. ते आपल्या भाषणात नेहमी म्हणत असत, 'जब तक विध्वंस नही होगा, तब तक निर्माण कैसे संभव होगा!' हिंदू समाजाने आपल्या शौर्याने त्यांचा शब्द खरा केला होता. त्या काळात अडवाणी आंदोलनाचा चेहरा होते, तर मुरली मनोहर यांनी आंदोलनाला गती देण्याचा प्रयत्न केला.
 
भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असलेले डॉक्टर मुरली मनोहर जोशी राजकारणातील स्थानीय समीकरणांचे जाणकार मानले जात असत. १९८९ साली ज्यावेळी भाजपच्या पालमपूर अधिवेशनात श्रीराम जन्मभूमी लढ्याला समर्थन देण्याचा ठराव मांडला गेला, त्यावेळी जोशींनी त्याचे सहर्ष समर्थन केले. अयोध्या आंदोलन ज्यावेळी शिखरावर होते, त्या काळात मुरली मनोहर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष राहिले. अयोध्या आंदोलनाला आपल्या भाषणांनी एक वैचारिक पाठबळ मिळवून देण्याची त्यांची भूमिका हिंदू समाज सदैव स्मरणात राखेल. हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वाच्या मुद्द्यावर आग्रही असणार्‍या मुरली मनोहर जोशींनी श्रीनगरच्या लाल चौकात तिरंगा फडकविण्याचा संकल्प करत तिरंगा यात्रा काढली होती. दि. ५ जानेवारी, १९३४ रोजी जन्मलेले मुरली मनोहर ऐन तारुण्यात रा. स्व. संघाशी जोडले गेले. पुढे राजकीय क्षेत्रात विविध जबाबदार्‍या स्वीकारत १९९६ साली गृहमंत्री आणि तद्नंतर मानव संसाधन विकासमंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले. त्यांच्या प्रदीर्घ देशसेवेचा सन्मान म्हणून २०१७ साली त्यांना 'पद्मभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
अशोक सिंघल
 
स्वातंत्र्यानंतरच्या काळातील विराट हिंदू एकतेचे शिल्पकार म्हणून अशोक सिंघल यांचे नाव घ्यावे लागेल. आग्र्यातील संपन्न परिवारात जन्मलेले अशोकजी जन्मजात बुद्धिमान विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होते. बनारस हिंदू विश्वविद्यालयातून १९५० साली इंजिनिअर झाले आणि तद्नंतर दिल्ली हरियाणासारख्या अनेक प्रांतात रा. स्व. संघ प्रचारक म्हणून काम केले. १९८३ साली तामिळनाडूच्या मीनाक्षीपुरममध्ये हिंदूंच्या सामूहिक धर्मांतरणाची घटना घडली. संपूर्ण देशभर याची तीव्र प्रतिक्रिया उमटली. या घटनेच्या विरोधात देशभर जागरण करण्यासाठी देशाच्या तीन ठिकाणांहून एकात्मता यात्रा काढण्यात आल्या. त्या वेळेपासून अशोकजी सिंघल विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात सक्रिय झाले. १९८३ साली लखनौमध्ये झालेल्या एका संमेलनात दाऊ दयाल खन्ना यांनी अयोध्या जन्मस्थान मुक्तीचा विषय मांडला. त्याला अनेकांनी समर्थन दिले. त्यातूनच पुढे १९८४ साली धर्म संसदेचे अधिवेशन संपन्न झाले. अनेक संतांची मनधरणी करत, त्यांना धर्मस्थान मुक्तीचे महत्त्व पटवत अशोकजींनी सर्व संतांना धर्म संसदेच्या व्यासपीठावर एकत्र आणले. याच ऐतिहासिक धर्म संसदेने श्रीराम जन्मभूमी मुक्ती यज्ञ समितीची घोषणा केली. वैचारिक स्पष्टता, दृढनिश्चय अद्भुत संघटन कौशल्य आणि प्रभावी वक्तृत्व या गुणांच्या आधारावर सज्जनशक्तीला संतशक्तीची जोड देत आंदोलनाला व्यापक स्वरूप दिले.
 
बाबरी ढाँचा हा केवळ स्थानिक जमिनीचा मुद्दा न मानता, त्याला राष्ट्रीय अस्मितेचे स्वरूप देण्यात अशोकजींचा मोलाचा वाटा आहे. ते कुशल संघटक तर होतेच, पण त्यासोबतच ते उत्कृष्ट गीत गायक होते. पंडित ओमकार नाथ ठाकूर यांच्याकडून त्यांनी संगीताचे धडे घेतले होते. पहिल्या धर्म संसदेत त्यांनी गायिलेल्या 'चंदन हे इस देश की माटी, तपोभूमी हर ग्राम हैं, हरबाला देवी की प्रतिमा, बच्चा बच्चा राम हैं' या गीताने उपस्थितांना रोमांचित केले. त्यांनी जवळजवळ २० वर्षे विश्व हिंदू परिषदेचे नेतृत्व केले. जन्मभूमी आंदोलनासाठी देश विदेशात व्यापक जनसमर्थन जमविण्यात महत्त्वाची आक्रमक भूमिका बजावली. १९८९ साली ज्यावेळी मंदिराचा शिलान्यास झाला, त्यावेळी 'यह मात्र एक मंदिर का नाही, हिंदू राष्ट्र का शिलान्यास हैं,' असे प्रेरणादायी उद्गार त्यांनी काढले. सर्वार्थाने ते आंदोलनाचे प्रमुख शिल्पकार होते.
 
आयुष्याच्या शेवटच्या काळात हॉस्पिटलमध्ये असताना जन्मभूमी मुक्ती आंदोलनाच्या खटल्याबाबत चंपतरायजींशी चर्चा करत होते. "माझ्याकडे आता फार दिवस नाहीत," असे अशोकजी म्हणाले आणि ते ऐकून चंपतरायजी खूपच निराश झाले. हे पाहिल्यावर, "तुला राम मंदिर होईपर्यंत वर यायला परवानगी नाही, आलास तर राम मंदिराचा प्रसाद घेऊनच ये," असे भावनिक आवाहन अशोकजींनी केले होते. अद्वैताची भावना किंवा नातं काय आणि कसं असतं, याची अलौकिक अनुभूती त्यावेळी आल्याचे चंपतरायजी म्हणाले. १९८९ मध्ये गावागावात शिलापूजनाचे कार्यक्रम होऊन सर्व शिला (विटा) अयोध्येत जमा झाल्या होत्या. देशभर वातावरण तापत होते. पण, जन्मभूमी स्थानीच मंदिर होईल का? याबाबत माध्यमांमध्ये, विचारवंतांमध्ये मतमतांतरे सुरू होती.
 
काही जण मंदिर कशाला हवे, त्या ठिकाणी शाळा, हॉस्पिटल काढा. काहीजण तर चक्क प्रसाधनगृह बांधा, अशा चेष्टा करणार्‍या सूचना करत होते. ज्या काळात विजय कुठेही दृष्टिपथात नसताना एक तपस्वी साधक मात्र, 'मंदिर वही बनेगा, मंदिर भव्य बनेगा' या निर्धाराने मंदिरांच्या खांबांचे, कळसाचे, पायाचे दगड टाकण्याचे काम अविरत चालू राहील, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत होता. एका विशेष स्वप्नाच्या पूर्ततेसाठी संपूर्ण आयुष्य वेचणारा एक महान ऋषी आज ते स्वप्न साकार होत असताना आपल्यात नाही. पण, जीवनाची सार्थकता, मानवी आयुष्याचा मोक्ष कशात आहे, याची अमिट छाप सोडून जाणार्‍या अशोकजी सिंघल यांना विनम्र अभिवादन.
 
अयोध्या आंदोलनात अनेकांचा सहभाग होता. पू. देवरहा बाबा, महंत अभीरामदासजी, पू. परमहंस रामचंद्र दासजी, फैजाबादचे पूर्व जिल्हा अधिकारी के. के. नायर, दाऊदयाल खन्ना, महंत अवैधनाथ, विहिंपचे ओमकारजी भावे, निवृत्त न्यायमूर्ती देवकीनंदन अग्रवाल, पू. विश्वेश तीर्थजी महाराज, पू. स्वामी रामदेवजी महाराज, पू. सत्यमित्रानंद गिरीजी महाराज, परासरणजी, आंदोलनातील अनेक कार्यक्रमांचे कल्पक योजनाकार मोरोपंत पिंगळे, राजमाता विजया राजे सिंधिया यांच्यासारख्या अनेकांनी आपल्या पुरुषार्थाने जन्मभूमी मंदिर निर्माणाचा मार्ग प्रशस्त केला आहे. पण, लेखातील शब्दांची मर्यादा लक्षात घेता या सर्वांबद्दल विस्ताराने लिहिणे शक्य नाही. या सर्व मंडळींनी वैचारिक संक्रमणाची पायाभरणी केली, त्या सर्वांचे मी कृतज्ञतापूर्वक स्मरण करतो. आज यातील अनेक जण दिवंगत झाले आहेत. त्यांच्या स्मृतीस विनम्र प्रणाम करतो. त्यांनी राष्ट्रनिर्माणाचा मार्ग मोकळा केला आहे. आजच्या पिढीला या मार्गावरून चालत जायचे आहे आणि त्याचे अंतिम गंतव्य स्थान भारत मातेला विश्वगुरू पदावर विराजमान करण्याचे आहे. 
जय श्रीराम...
 
- मोहन सालेकर
(लेखक विहिंप, कोकण प्रांताचे प्रांत मंत्री आहेत.)
अग्रलेख
जरुर वाचा