रेव्ह पार्टीची धुंदी

    02-Jan-2024
Total Views |
Police Actioned on new-year-eve-rave-party

मावळत्या वर्षाला निरोप देताना आणि नववर्षाचे स्वागत करताना अनेक बर्‍या-वाईट गोष्टी निदर्शनास येतात. वास्तविक इंग्रजांचे नववर्ष भारतीयांनी का साजरे करावे, इथंपासून ते मद्याचे ओसंडून वाहणारे प्याले एकमागोमाग एक रिचविणार्‍यांसाठी नववर्ष ही एक पर्वणीच. तसे पाहिले, तर भारतीय लोक उत्सवप्रेमी. पण, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करीत त्यांचे उत्सव, सोहळे अंगीकारल्याने बरेचदा व्यसनाधीनता वाढलेली दिसते. गेल्या काही वर्षांत तर ‘रेव्ह पार्टी’ नावाचे नवे फॅड जन्माले आले. त्यात सर्व वयोगटातील स्त्री-पुरुष युवावर्ग उत्साहाने सामील होतात. मोजक्याच देशात ‘रेव्ह पार्टी’ला मान्यता आहे. कारण, त्यात मद्य आणि ड्रग्जचा वारेमाप वापर असल्या पार्ट्यांमध्ये होत असतो. त्यातून दुर्घटनाही घडतात. ड्रग्जचे व्यसन लागले तर संपूर्ण आयुष्यच उद्ध्वस्त होते. त्यामुळे भारतात ‘रेव्ह पार्टी’ला कायदेशीर बंदी आहे. मात्र, काही जण सोशल मीडियाच्या माध्यमातून इच्छुकांशी संपर्क साधून छुप्या मार्गाने अशा ‘रेव्ह पार्टी’चे आयोजन करतात. मुंबईला लागून असलेल्या काही भागात तसेच रायगड, पुणे, सातारा या ठिकाणी आजवर अनेक लहान मोठ्या ‘रेव्ह पार्टी’ करण्याचा प्रयत्न झाला आणि तो पोलिसांनी उधळूनही लावला. दोन महिन्यांपूर्वी अशीच एक ‘रेव्ह पार्टी’ पुण्यानजीक झाली. त्यानंतर ठाण्यात मावळत्या वर्षाला निरोप देताना आयोजित ‘रेव्ह पार्टी’ पोलिसांनी वेळीच उधळून लावली. या ‘रेव्ह पार्टी’त ड्रग्जसोबत मद्य आणि मदिरेसह संगीतावर थिरकणारे बेधुंद होतात. त्यांना कसलीही शुद्ध नसते. मात्र, ज्यावेळी शुद्ध येते, त्यावेळी ते एकतर पोलीस कोठडीत असतात किंवा ड्रग्जच्या आहारी गेलेले असतात. स्वयंसेवी संस्था आणि सरकारकडून अमली पदार्थांविरोधी कारवाई तर केली जातेच, शिवाय व्यसनाधीनतेवरही उपाययोेजना केल्या जातात. मात्र, आयोजक आणि अशा पार्टीत सामील होणारे कायदा आणि आरोग्याची तमा न बाळगता, क्षणिक आनंदासाठी आहारीजातात. त्यातूनच ड्रग्जच्या व्यवसायाची साखळी सुरू होते. पंजाब, कर्नाटक ही राज्ये सर्वाधिक व्यसनाधीन झाली आहेत. छुप्या मार्गाने अशाप्रकारच्या पार्ट्या सुरूच राहिल्या, तर संपूर्ण देशच याच्या आहारी जाण्याची भीती आहे. त्यामुळे हे उद्योग कायमचे हद्दपार करण्यासाठी ड्रग्जविरोधी मोहिमांना अधिक वेगवान करणे गरजेचे.

झिंगलेले चालक

नववर्षाच्या स्वागतासाठी आयोजित पार्ट्यांसाठी अनेक जण घराबाहेर पडतात. हॉटेलिंग करतात. यानिमित्ताने काही जण आपल्याला जणू अमर्यादित मद्य रिचविण्याचा परवानाच मिळाला असल्याच्या अविर्भावात वावरताना दिसतात. त्यातूनच वाहनावरील नियंत्रण सुटण्याबरोबरच अनेक लहान-मोठे अपघातही होत असतात. यंदाही नववर्षाच्या रात्री मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड आणि इतर भागांत दोन हजारांपेक्षा अधिक जण अति मद्यपान करून वाहन चालवत असल्याचे निदर्शनास आले. या झिंगलेल्या चालकांवर वाहतूक विभागाने कायद्याचा बडगा उगारत योग्य ती कारवाई केलीच आहे. पण, दरवर्षीप्रमाणे थर्डीफस्टला पोलिसांचा चोख बंदोबस्त असतो, याची चांगलीच कल्पना असूनही मद्यपींना ना पोलिसांची भीती ना इतरांच्या जीवांची पर्वा. एवढेच काय तर अशा मद्यपींना पुन्हा घरी सोडण्याची जबाबदारीही बारमालकांवर टाकण्याचा प्रयत्न झाला. पण, परिणाम शून्यच! मर्यादेत मद्यप्राशन करण्यास अनुमती आहे. परंतु, जी मंडळी मर्यादेबाहेर पितात अशा तळीरामांची झिंग उतरविण्याची गरज असतेच. दोन वर्षांपूर्वी मावळत्या वर्षाला निरोप देताना झालेल्या विविध अपघातात १६ जणांनी जीव गमावला होता. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. सरकार ‘डोन्ट ड्रींक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ असा उपदेशात्मक फलक लावते.वाहनचालकांचे वेळोवेळी समुपदेशनही केले जाते. तरीही वर्षभरात मद्यपी चालकांमुळे भारतात एक हजारांच्यावर जीव जात असल्याची सरासरी आकडेवारी अलीकडेच प्रसिद्ध झाली होती. त्यामुळे सरकार अधिक कठोरपणे कायदे तयार करून त्यांची काटेकोर अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहे. मात्र, मद्याच्या आहारी गेलेल्यांना केवळ निमित्त हवे असते. ते मर्यादेपेक्षा अधिक पितात. त्यातूनच धुमस्टाईलने बेदरकार वाहन चालवून स्वत:सह इतरांचाही जीव धोक्यात घालतात. अशा झिंगलेल्या तसेच धुमस्टाईलवाल्यांवर कठोर कारवाई करणे काळाची गरज आहे. मात्र अशा झिंगलेल्या चालकासोबत स्वत:चा जीव धोक्यात घालण्याचे धारिष्ट कुणीही करू नये. हेही तितकेच महत्त्वाचे आहे. दुर्घटना घडल्यावर उपाययोजना व्यर्थ ठरतात. याबाबत असलेली उदासीनता झिंगलेल्यांना एक प्रकारे प्रोत्साहनच देत असल्याचे दिसते. ही फार मोठी शोकांतिकाच.

मदन बडगुजर 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.