मुंबई : राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दल सदैव तत्पर राहून नागरिकांना सुरक्षितता देण्याबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उत्कृष्ट कामगिरी करीत आहे. ही गौरवास्पद बाब असल्याच प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.
गोरेगाव येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र पोलीस दिन साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी पोलीस महासंचालक (अतिरिक्त कार्यभार) विवेक फणसाळकर, तसेच विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यपाल म्हणाले की, 'सद्रक्षणाय खलनिग्रहणाय' या महाराष्ट्र पोलिस दलाच्या ब्रीद वाक्याप्रमाणे आपल्या कृतीतून उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय-आंतराष्ट्रीय स्तरावर अनेक पदक जिंकून महाराष्ट्र पोलीस दलाची प्रतिमा उंचावली आहे. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
राष्ट्रीय पातळीवर पदकांची कमाई
- हरियाणा येथे आयोजित आखिल भारतीय पोलीस रेसलिंग क्लस्टर -२०२३ स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलाने सहा सुवर्ण, चार रौप्य आणि १२ कांस्य अशी एकूण २२ पदके प्राप्त केली आहेत. जागतिक पोलीस आणि फायर गेम्स-२०२३ विनिपेग कॅनडा येथे आयोजित कुस्ती, बॉडी बिल्डिंग, फिझिक्स बॉडी बिल्डिंग या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील खेळाडूंनी तीन सुवर्ण, दोन रौप्य व दोन कांस्य अशी एकूण सात पदके प्राप्त केली आहेत. मुंबई येथे आयोजित ८८ व्या अखिल भारतीय आणि साऊथ एशियन रब्बी स्पर्धेत- २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस रब्बी संघाने कांस्यपदक प्राप्त केले आहे.
- भोपाळ येथे आयोजित ६३ व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा स्पर्धेत महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एक सुवर्ण, चार रौप्य व सहा कांस्य अशी एकूण ११ पदके प्राप्त केले आहेत. गुजरात येथे आयोजित २४ व्या अखिल भारतीय पोलीस बॅण्ड स्पर्धा २०२३ मध्ये महाराष्ट्र पोलीस पाईप बँड संघाने सुवर्णपदक प्राप्त केली आहेत तसेच बिगुल संघाने सुवर्ण पदक, ब्रॉस बॅण्ड संघाने कांस्य पदक प्राप्त केले आहे.
- तसेच बेस्ट पाईप ब्रँड प्रकारात एक सुवर्ण पदक प्राप्त केले आहे. मागील सहा वर्षांपासून महाराष्ट्र पोलीस पाईप ब्रँड संघाने सलग सहा सुवर्ण पदक प्राप्त केली आहेत. अशा प्रकारे राज्याची संघभावना कायम राखून राज्याचा नावलौकिक केले आहे. असेही राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सांगितले.
राज्यात ४८ सायबर पोलीस ठाणी आणि ४४ सायबर लॅब
सागरी सुरक्षा, नक्षलवादाबरोबरच सायबर सुरक्षेसारखे नवे आव्हान उभे आहे. सायबर गुन्हे रोखण्यासह महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांसंबंधातील गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. राज्यात सध्या ४८ सायबर पोलीस ठाणे व ४४ सायबर लॅब सुरू करण्यात आल्या असून अत्याधुनिक तंत्रसामुग्री पुरविण्यात येत आहेत. तसेच यावर्षी पोलीस दलामध्ये १८ हजार नवीन पदे भरण्यात आली असून त्यांचे प्रशिक्षण सुरू आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक (अतिरिक्त कार्यभार) विवेक फणसाळकर यांनी दिली.