सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवार, दि. १९ जानेवारीला महाराष्ट्रातील सोलापूरात ९० हजारहून अधिक गोरगरीबांना घरांचे स्वप्न पूर्ण केल्याची घोषणा केली. यासोबतच इथे त्यांनी अमृत २.० योजनेची सुरुवात केली. ज्या अंतर्गत आता शहर आणि गावांचा कायापालट होणार आहे. अटल मिशनही याचाच एक भाग आहे. त्यांनी २ हजार कोटींपेक्षा अधिक जनकल्याणकारी योजनांचे लोकार्पण केले या कार्यक्रमावेळी १५ हजार जणांना घराचा ताबा मिळाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल रमेश बैस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासह अन्य मान्यवर मंडळीही उपस्थिती होती.
देशातील सर्वात मोठ्या हौसिंग सोसायटी असल्याचा मान या प्रकल्पाला मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठमोळ्या भाषणातून उपस्थितांची मने जिंकली. मोदी म्हणाले, "हा काळ आमच्यासाठी भक्ती भावाचा आहे. २२ जानेवारीला ऐतिहासिक क्षण येत आहे. ज्यावेळी प्रभू श्रीराम आपल्या भव्य मंदिरात विराजमान होतील. अयोध्येचं दर्शन करताना रामाला तंबूत पाहून आपलं मन व्यथित होत होतं." आपल्या मागील दौऱ्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राम मंदिर लोकार्पण सोहळ्यापूर्वी ११ दिवसांचं अनुष्ठान सुरू केलं होतं. त्याची सुरुवात त्यांनी नाशिकच्या पंचवटीतून केली होती. आता योगायोगाने मोदी दुसऱ्यांदा दौऱ्यावर आहेत आणि त्यानिमित्त हजारो मजूरांच्या घरांचा संकल्प पूर्णत्वास येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यानिमित्त एक याचा आनंद व्यक्त केला. मोदींनी लोकार्पणावेळी केलेल्या भाषणात ते म्हणाले की, "माझंही असचं एक स्वप्न होतं की मलाही असं घर मिळालं पाहिजे.", असं म्हणतू ते भावूकही झाले.
प्रभूश्री रामांच्या आदर्शांवर चालण्याचा प्रयत्न करत सरकार देशात शुसान आणि ईमानदारीचं राज्य आणण्याचा प्रयत्न करत आहेत. सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास हा मंत्र रामराज्यातील प्रेरणेतूनच मिळाला आहे, असेही ते म्हणाले. २०१४ मध्ये सरकार स्थापन केल्यानंतर लगेचच मी म्हणालो होतो की, "हे गोरगरीबांसाठी समर्पित असेच सरकार आहे. त्यानंतर आम्ही एक एक योजना गोरगरीबांचं स्वप्न पूर्ण करण्याच्या दृष्टीने लागू करत आहोत. त्यांचे जीवन सुकर व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत", असेही मोदी म्हणाले.
आत्तापर्यंत देशात दोन प्रकारचे विचार सुरू होते. एक आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी लोकांना भडकवत रहा. दुसरा मार्ग आहे आत्मनिर्भर श्रमिक आणि गरीबांचे कल्याण करा. कित्येक वर्षे गरीबी हटावचा नारा त्या लोकांनी दिला पण गरीबी दूर झाली नाही. गरीबांच्या नावावर योजना लागू केल्या जात होत्या मात्र, त्यांचा लाभ कुणा दुसऱ्यांनाच मिळत राहिला. गरीब गरीबच राहिला. त्यांचा पैसा मधल्या दलालांनाच मिळत गेला. यापूर्वीच्या सरकारांची नीति, नियत आणि निष्ठाच शंकास्पद होती.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, "विश्वकर्मा बंधुंचे जीवन बदलण्यासाठीच सरकारने 'पीएम विश्वकर्मा योजना' तयार केली. या योजनेअंतर्गत श्रमिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. अत्याधुनिक उपकरणे दिली जात आहेत. त्यांना विकसित भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भारताला आत्मनिर्भर बनविण्यासाठी सुक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांचे मोठे योगदान आहे. त्यामुळेच सरकार या क्षेत्राला सातत्याने प्रोत्साहित करत आहे.
“केंद्र सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात जगातील प्रथम तीन अर्थव्यवस्थेत सामाविष्ठ होणार आहे. ही मोदीची गॅरेंटी आहे. येत्या काळात भारत हा पहिल्या तीन देशांमध्ये येऊन बसेल याची मी गॅरेंटी देतो. ज्यांना कुणी विचारलं नाही त्यांची मी पूजा केली. ज्यांची कधी कुणी विचारणा केली नाही त्यांची मी पूजा केली", असे म्हणत त्यांनी सोलापूरकरांचा निरोप घेतला. सोलापूरातील नियोजित कार्यक्रमानंतर मोदी कर्नाटक आणि तमिलनाडूतील नियोजित कार्यक्रमांसाठी पोहोचले. मोदींचा या १९ जानेवारीला तीन राज्यांचा दौरा होता.