मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी १९ जानेवारीला जाहीर करण्यात आली. त्यात कोल्हापुरच्या विनायक पाटील याने पहिला क्रमांक मिळवला आहेत.
एमपीएससीने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर ही गुणवत्ता यादी जाहीर केली. यादीमध्ये एकूण १८३० उमेदवारांचा समावेश आहे. विविध २३ संवर्गातील ६१३ पदांसाठी राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ घेण्यात आली होती. राज्यसेवेची आतापर्यंतची सर्वाधिक पदांची भरती प्रक्रिया असल्याने राज्यभरातील उमेदवारांचे या निकालाकडे लक्ष लागले होते. या निकालात धनंजय बांगर यांनी राज्यात द्वितीय तर सौरभ गावंडे यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
परीक्षेतील पदांसाठी पसंतीक्रमाचे पर्याय सादर करण्यासाठीची प्रक्रिया २२ जानेवारीपासून सुरू करण्यात येणार आहे. अधिसूचित संवर्ग-पदांसाठी १ ते २३ यातील पसंतीक्रम निवडणाऱ्या उमेदवारांचा त्यांनी दिलेल्या पसंतीक्रमानुसार सर्व पदांवरील निवडीसाठी विचार होईल.पसंतीक्रमाचे पर्याय केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सादर करणे आवश्यक असून, त्यासाठीची अंतिम मुदत २९ जानेवारी आहे.