तळपणारा भास्करगड

19 Jan 2024 20:07:48
bhaskargad
 
नाशिक जिल्हा म्हणजे दुर्गप्रेमींसाठी एक प्रकारची पर्वणीच !! नाशिक जिल्ह्यात असलेल्या अनेक प्रसिद्ध डोंगररांगा म्हणजे सेलबारी, डोलबारी, अजिंठा - सातमाळा, त्रिंबक रांग इत्यादी असून यातलीच त्रिंबक रांग त्यातल्या ब्रह्मगिरी, अंजनेरी व सध्या इंस्टा रिल्समुळे तुफान गर्दी खेचणारा हरिहर उर्फ हर्षगड या किल्ल्यांमुळे भटक्यांच्या नकाशावर महत्त्वाचं स्थान पटकावून आहे. पण याच त्रिंबक रांगेतला व हरिहर किल्ल्याच्या प्रसिद्धीमुळे कुठेतरी नामनिराळा राहिलेला पण तितकाच देखणा किल्ला म्हणजे भास्करगड उर्फ बसगड. पाठीमागच्या उतवड डोंगरामुळे भास्करगड हरिहर वरून बघताना काहीसा कॅमोफ्लॉज झालेला असला तरी त्याच्या असीम सुंदर अश्या पायरी मार्गामुळे आणि त्याच्या ऑफबीटनेसमुळे भास्करगडचा ट्रेक एक वेगळाच अनुभव ठरतो.

स्करगडाजवळ असणार्‍या जांभूळवाडी उर्फ वाघखिंड (स्थानिक नाव) पासून सोप्या चढाईने आपण तासाभरात भास्करगडाच्या कातळकड्याच्या समोर येऊन उभे राहतो. या कातळकड्याला चिकटूनच काही नैसर्गिक गुहांच्या सोबतीने गडमाथ्याकडे वाटचाल सुरू ठेवायची. या वाटेवर आपल्या उजव्या बाजूला खोल दरी असल्याने अतिशय जपून जाणे गरजेचे आहे. पावसाळ्यात भास्करगड एक जगावेगळा अनुभव ठरत असला तरी या कातळकड्यावरून दरीत कोसळणारे उंच धबधबे आपल्याला पार करून जावे लागत असल्याने नवख्या दुर्गप्रेमींनी पावसाळ्यात भास्करगडाला भेट देणे पूर्णपणे टाळावे. हा प्रवास करून आपण पोहोचतो गडाच्या पायरीमार्गाजवळ.
 
काही वर्षांपूर्वी हा पायरीमार्ग मोठमोठ्या दगडांच्या राशीत लुप्त झाला होता. त्यावरून वाटचाल करणे आत्ताच्या तुलनेत तसे जोखमीचेच काम होते. तसेच भास्करगडाचा खणखणीत बांधणीचा दरवाजा जवळपास ७० टक्के मातीत गाडला गेला होता. या दरवाजातून गडावर प्रवेश करताना सरपटत किंवा खाली वाकूनच जावे लागत असे. पण ‘गडवाट’ या सेवाभावी संस्थेने पुढाकार घेऊन पायरीमार्गावरील दगड काढून हा नितांतसुंदर पायरीमार्ग मोकळा केला व गडाचा दरवाजा मातीच्या ढिगार्‍यातून बाहेर काढून या दोन्ही गोष्टींना मोकळा श्वास दिला. संस्थेच्या मावळ्यांनी बर्‍याच मोहिमा घेऊन हे अत्यंत दुर्दम्य काम पार पाडलं आणि म्हणून आजपर्यंत भास्करगडाचा जबरदस्त सर्पाकृती पायरीमार्ग आणि आता ताठ मानेने उभा असलेला दरवाजा आपल्याला पाहायला मिळतो. या दरवाजानंतर परत काही पायर्‍या चढून आपला गडमाथ्यावर प्रवेश होतो.
 
भास्करगडाच्या माथ्यावर पाण्याची खोदीव टाकी दिसून येतात. तसेच, कातळकड्याला लागून असलेली अगदी विरळ तटबंदी आपल्या नजरेस पडते पण बाकी ठिकाणी तटबंदी दिसून येत नाही. गडाच्या मुख्य पठारावर डावीकडे काही अवशेष नसून पाण्याची खोदीव टाकी आहेत. इथून आपण गडाच्या उजवीकडच्या पठारावर जायला निघालो की वाटेत एका वास्तूचे भग्नावशेष दिसून येतात. कदाचित हा वाडा असावा असे प्रथमदर्शनी वाहते. इथून पुढे जाताना उजवीकडे एक तलाव दिसून येतो. पुढे मारुतीरायाचे उघड्यावरील मंदिर व त्याच्याच पुढे पाण्याचे टाके आहे. साधारणपणे अर्ध्या तासात भास्करगडाची दुर्गफेरी पूर्ण होते. गडावर आजपर्यंत फार काही अवशेष शिल्लक नाहीत. पण गडाच्या कातळकड्यामध्ये पश्चिम बाजूला एक भलीमोठी गुहा व एक शिवलिंग पाहायला मिळते. तसेच या वाटेवरही एक पाण्याचे भुयारी स्वरूपातील टाके बघायला मिळते. या गुहा स्थानिक गाईड असल्याशिवाय सहजासहजी सापडत नाहीत. भास्करगडाच्या पश्चिमेकडे उतवड नावाचा भलामोठा डोंगर उभा असून उतवडवर मात्र कसलेली दुर्गावशेष नाहीत. भास्करगड जवळ शीतकडा व उंभार्डे हे दोन धबधबे असून पावसाळ्यात इथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
 
भास्करगडावरून दिसणारा प्रदेश मात्र निखालस सुंदर आहे. गडमाथ्यावरून समोरच फणी डोंगर, हरिहर किल्ला, ब्रह्मा डोंगर, कापड्या डोंगर, ब्रह्मगिरी, अंजनेरी किल्ला तसेच वैतरणा धरणाचा विस्तीर्ण पसारा दिसतो. गडाच्या मागच्या बाजूला जव्हार मोखाड्याचा म्हणजेच ठाणे जिल्ह्याचा प्रदेश असून भास्करगड परिसरातून मोरबारी उर्फ भातखळा, फडाची धार उर्फ बैलखांदा, मुळीची धार, गोचक्याची खांड इत्यादी घाटवाटा आहेत व आजही स्थानिक लोक या वाटांचा वापर पायथ्याच्या खोच किंवा शिरसोनपाडा या गावांना जाण्यासाठी वापरतात. त्रिंबक रांगेतील हरिहर, अंजनेरी, ब्रह्मगिरी या किल्ल्यांबरोबरच भास्करगड हा दुर्गम किल्लाही दिमाखात तळपत आहे. वेळ आहे आपण आपली वाट जराशी वाकडी करण्याची !!
 
कसं जायच
नाशिक इथून त्रिंबक रोड- घोटी फाटा - कोटमवाडी - निरगुडपाडा मार्गे वाघखिंड किंवा जांभूळवाडी खिंडीत यावे व तिथून तास-दीड तासांत गडावर जाता येते.
Powered By Sangraha 9.0