मुंबई : संपूर्ण देश सध्या २२ जानेवारीची आतुरतेने वाट पाहात आहेत. अयोध्येत रामलल्ला यांच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून या सोहळ्याला दिग्गज मंडळी उपस्थित राहणार आहेत. कलाविश्वातूनही अनेकांची उपस्थिती या सोहळ्याची शान वाढवणार आहे. दरम्यान, या सोहळ्यापूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी केल्याची माहिती मिळत असून या ठिकाणी बच्चन घर बांधणार आहेत. त्यामुळे अमिताभ बच्चन अयोध्येचे रहिवासी होणार अशी चर्चा रंगली आहे.
हिंदुस्थान टाईम्सच्या वृत्तानुसार, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी अमिताभ बच्चन यांनी अयोध्येत जमीन खरेदी केली आहे. मुंबईच्या द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा यांच्या ७ स्टार एन्क्लेव्ह द सरयूमध्ये एक प्लॉट खरेदी केला असून त्याजागी बच्चन १० हजार स्क्वेअर फूटांचे घर बांधणार असल्याचे समजत आहे. या प्लॉटची किंमत १४.५ कोटी रुपये आहे. अयोध्येत गुंतवणूक केल्यानंतर अमिताभ बच्चन भावना व्यक्त करताना म्हणाले की, 'अयोध्येचे माझ्या मनात विशेष स्थान आहे.'
एचओएबीएलचे अध्यक्ष अभिनंदन लोढा म्हणाले की, "सरयूचे प्रथम नागरिक म्हणून मी अमिताभ बच्चन यांचे स्वागत करतो. हा प्रोजेक्ट राम मंदिरपासून केवळ १५ मिनिटांच्या अंतरावर असून आंतरराष्ट्रीय विमानतळ अर्ध्या तासांच्या अंतरावर आहे. हा प्रोजेक्ट २०२८ पर्यंत पूर्ण होण्याची योजना आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर अयोध्या आणि आजूबाजूच्या परिसरात जमिनींच्या किंमतीत मोठी वाढ झाली असून टाटा ग्रुपसोबत अनेक लोकं एकत्र येत गुंतवणूक करत आहेत.
कलाकरांना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे आमंत्रण
अयोध्येत २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अमिताभ बच्चन, रजनीकांत, हेमा मालिनी, माधुरी दीक्षित, कंगना रनौत, आशा भोसले, अरुण गोविल, दीपिका चिथालिया, नितीश भारद्वाज, मधुर भंडारकर, प्रसून जोशी, रतन टाटा, मुकेश अंबानी, गौतम अडाणी, चंद्रशेखरन, एसएन सुब्रम्हण्यम, सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर, महेंद्र सिंह धोनी, विराट कोहली, अनूप जलोटा, अनुराधा पौडवाल, कैलाश खेर, मैथिली ठाकूर, कन्हैया मित्तल, स्वाती मिश्रा, रंजन गोगाई, सुधीर अग्रवाल अशा दिग्गज कलाकरांना आमंत्रित करण्यात आले आहे.