लोककल्याणकारी योजनांतून विकासमार्गावर गतिमान ओडिशा

13 Jan 2024 20:24:35
Ek Bharat Shreshtha Bharat scheme in Odisha

‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ योजनेतील ओडिशाचे जोडीदार राज्य असणार्‍या महाराष्ट्रातील सात सदस्यीय माध्यम प्रतिनिधींनी दि. ८ ते ११ जानेवारीदरम्यान आयोजित अभ्यास दौर्‍याअंतर्गत ओडिशातील विविध आरोग्य, कृषी, औद्योगिक आणि तांत्रिक संशोधन संस्था, पर्यटन स्थळे आणि सांस्कृतिक स्थळांना भेटी दिल्या. यासह ओडिशाच्या ग्रामीण आणि शहरी भागातील ‘विकसित भारत संकल्प अभियान व्हॅन’ला मिळणारा प्रतिसाददेखील अनुभवला. यादरम्यान केंद्र सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधण्याची संधी मिळाली. तेव्हा ‘ओडिशायन’ या लेखमालिकेअंतर्गत ओडिशातील गेल्या नऊ वर्षांत घडलेल्या क्रांतीचा, परिवर्तनाचा आढावा घेणारा हा लेख...

'मला गावातल्या गरिबांपर्यंत, शहरातल्या झोपडपट्टीवासीयांपर्यंत सरकारचे सर्व लाभ पोहोचवायचे आहेत, तेही अडचणींशिवाय आणि म्हणूनच ही गाडी निघाली आहे. ही जी ‘मोदींची हमी देणारी गाडी’ आहे, ती तुमच्यासाठीच आहे. मग तुम्ही सर्वांनी अधिकाधिक संख्येने या कार्यक्रमाशी जोडून घ्यावं आणि कार्यक्रम यशस्वी करावा. देशात २०४७ मध्ये जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याची शताब्दी सुरू असेल, तेव्हा हा देश विकसित झालेला असेल, ही प्रखर भावना निर्माण करायची आहे,” हा प्रेरणादायी संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’विकसित भारत संकल्प यात्रे’च्या आरंभी देशवासीयांना दिला. केंद्र सरकारच्या विविध शासकीय योजनांचे लाभ थेट जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टिकोनातून देशभरात ’विकसित भारत संकल्प अभियान’ सध्या राबविले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ओडिशातील कटक जिल्ह्यातील टांगी, कोटासाही आणि पुरी जिल्ह्यातील निमपाडा येथे ‘विकसित भारत संकल्प व्हॅन’ला भेट दिली. यावेळी मोठ्या संख्येने गावातील महिला, पुरूष आणि विविध योजनांचे लाभार्थी आयोजित कार्यक्रमात उपस्थित होते. या नागरिकांशी संवाद साधला असता, केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभामुळे जीवन अधिक सुखकर झाले असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

कटक जिल्ह्यातील टांगीमधील कोटशाही गावातील ७८ वर्षीय गोलिया बीबी यांनी सांगितले की, “आम्ही वर्षानुवर्षे लाकडं गोळा करून, चूल पेटवून जेवण बनवत होतो. मात्र, ’उज्ज्वला योजने’तून आम्हाला गॅस सिलिंडर आणि शेगडी मिळाली. त्यामुळे आज आम्ही कमी वेळात जेवण बनवू शकतो. घरच्या इतर कामांसाठी महिलांना आता पुरेसा वेळ मिळतो. याच गावातील कविता बेहेरा यांना ’प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण’अंतर्गत पक्के घर मिळाले. आज केंद्र सरकारमुळे आम्हाला हक्काचा निवारा आणि डोक्यावर पक्के छत मिळाल्याचे सांगत, कविता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानले.केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देणारी व्हॅन देशाच्या शहरी आणि ग्रामीण भागातून फिरते आहे. ही व्हॅन गावाच्या मध्यवर्ती भागात लावली जाते. या व्हॅनवर दृक्-श्राव्य माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती दिली जाते. व्हॅन पाहण्यासाठी येणार्‍या गावातील नागरिकांसाठी ‘सेल्फी पॉईंट्स’ ही उभारण्यात आले आहेत. तसेच येणार्‍या गावकर्‍यांना माहिती पुस्तिका, कॅलेंडरचे वाटपही केले जाते. यावेळी आरोग्य तपासणी किंवा इतरही उपक्रम राबविले जातात. याचसोबत विविध योजनांमधील लाभार्थ्यांची माहिती गोळा केली जाते.

पुरी जिल्ह्यातील निमपाडा या गावात भेट दिली असता, या गावात ’प्रधानमंत्री आवास योजने’अंतर्गत मोठ्या संख्येने नागरिकांना घरे मिळाल्याचे त्यांच्याशी चर्चा केली असता समजते. आठ ते नऊ हजार लोकसंख्या असणार्‍या, या गावातील नागरिक ‘प्रधानमंत्री आवास योजने’सह ’उज्ज्वला गॅस योजना’, ‘पीएम स्वनिधी योजना’ आणि ’विश्वकर्मा योजने’चा देखील मोठ्या संख्येने लाभ घेत आहेत.ओडिशा राज्यात आजही मोठ्या संख्येने कोरीवकाम आणि दगडी शिल्पे बनविणारे कारागीर आहेत. ‘विश्वकर्मा योजने’मुळे मूर्तिकारांना व्यवसायासाठी आर्थिक पाठबळ प्राप्त झालेले दिसते. ’विकसित भारत संकल्प व्हॅन’च्या माध्यमातून ग्रामीण भागातील कामगारांना या योजनेची माहिती मिळाल्याने, आता मोठ्या संख्येने नागरिक योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करत असल्याचे देखील यावेळी अधिकार्‍यांनी सांगितले.
 
केंद्र सरकारने ’पंतप्रधान विश्वकर्मा कौशल सन्मान योजना’ सुरू केली. या योजनेंतर्गत पात्र नागरिकांना पाच टक्के सवलतीच्या दराने तीन लाख रुपयांची रक्कम सरकारकडून दिली जाते. पहिल्या टप्प्यात पात्र व्यक्तींना एक लाख रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे, तर दुसर्‍या टप्प्यात दोन लाख रुपयांची तरतूद आहे. योजनेअंतर्गत सर्व पात्र व्यक्तींना कौशल्य पडताळणीनंतर पाच दिवसांचे मूलभूत प्रशिक्षण आणि १५ दिवस किंवा त्याहून अधिक प्रगत प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षणासाठी दररोज ५०० रुपये भत्ता देण्याचीही तरतूद आहे. प्रशिक्षण उपकरणे खरेदीसाठी प्रोत्साहन म्हणून १५ हजार रुपये अनुदान देण्याची सुविधा आहे.’विकसित संकल्प अभियान व्हॅन’मुळे आज भारतातील गरीब, मध्यमवर्गीय नागरिकांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहोचत आहे. या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी भारत सरकारच्या विविध विभागांसह ग्रामीण भारतातील राज्य सरकारमधील अधिकारी वर्ग पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे. शासकीय पातळीवरील या यंत्रणांना आज नागरिकांचाही तितकाच उत्तम प्रतिसाद लाभलेला दिसतो. म्हणूनच आज देश बदलतोय, प्रगती करतोय आणि पारदर्शकपणे शेवटच्या घटकांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ थेट नागरिकांच्या बँक खात्यात मिळतो आहे, हाच आहे नवीन भारत!


- गायत्री श्रीगोंदेकर

Powered By Sangraha 9.0