रत्नागिरी(विशेष प्रतिनिधी): "ज्याप्रमाणे समुद्र मंथन होऊन त्यामधून अमृत मिळालं असे म्हंटले जाते, तसेच समुद्र याविषयावर आणि तेथील परिसंस्थेवर विविध अंगांनी विचारांचं मंथन व्याला हवं, अन्यथा आपल्याला विकासाचं अमृत कसं मिळणार? त्यामुळेच सागर महोत्सव हा आसमंत संस्थेचा एक अत्यंत स्तूत्य उपक्रम आहे," अशा शब्दात भारतीय नोदलाचे निवृत्त कमांडर आणि उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीरंग जोगळेकर यांनी आपली भूमिका मांडली.
रत्नागिरीतील गोगटे जोगळेकर महाविद्यालयामध्ये गुरूवार दि. ११ जानेवारी रोजी महाराष्ट्रातील द्वीतीय सागर महोत्सवाला उत्साहात सुरूवात झाली. सकाळी ९:३० वाजता डॉ. श्रीरंग जोगळेकर आणि राष्ट्रीय समुद्रविज्ञान संस्थेचे (NIO) डॉ. ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थीतीत कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. तसेच यावेळी गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य साखळकर सर, मत्स्य महाविद्यालयाचे डॉ. नाईक उपस्थीत होते. विशेष म्हणजे, महाएमटीबी आणि द हॅबिटॅट्स ट्रस्ट निर्मित स्पिशीज अँड हॅबिटॅट्स अवेअरनेस प्रोग्रॅम अंतर्गत दाभोळ खाडी या भागाचे विशेष प्रक्षेपण केले गेले. समुद्राविषयी पुर्वापार असलेले काही श्लोक, अध्यात्मातील संदर्भ आणि उदाहरणं देत श्रीनिवास पेंडसे यांचे 'महासागराचे अध्यात्मिक दर्शन' हे प्रवचन रंगले.
नौदलाचे निवृत्त कमांडर व्ही. एम. आपटे यांचे हायड्रोग्राफी या विषयावर दीर्घ मार्दर्शनपर सत्र झाले. पाण्याखालील जग हायड्रोग्राफीच्या माध्यमातून समजावुन देत प्रश्नोत्तरे घेत हे सत्र संपले. महाएमटीबीच्या वैतरणा खाडी आणि अनसुरे खाडी या चित्रफिती दाखवत महोत्सवाचा पहिला दिवस संपन्न झाला. यावेळी आसमंत बेनेवोलंस फाऊंडेशन या संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार पटवर्धन, संचालक नितीन करमारकर, राजन पेंडसे, जगदीश खेर आणि श्रीप्रसाद देशमुख उपस्थीत होते.