मुंबई : अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी संपुर्ण देशभरातील रामभक्त उत्साही आहेत. तर दुसरीकडे दाक्षिणात्य अभिनेत्री नयनतारा हिच्या अन्नपूर्णी या चित्रपटामुळे वाद निर्माण झाला आहे. या चित्रपटात प्रभू श्री राम मांसाहार करत होते असे संवाद असून यावरुन विश्व हिंदु परिषदेने आक्रमक भूमिका घेतली होती. यानंतर नेटफ्लिक्सवरुन हा चित्रपट काढून टाकण्यात आला आहे, तसेच, निर्माते असलेल्या झी वाहिनीने लेखी माफी देखील मागितली आहे. पण आता या सिनेमाचे निर्माता-दिग्दर्शकाला तुरुंगात टाकावं आणि झी स्टुडिओवर बंदी घालावी, अशी मागणी तेलंगणातील भाजपचे नेते टी राजा यांनी केली आहे.
टी राजा म्हणाले की, "नेटफ्लिक्स आणि झी स्टुडिओवर एक सिनेमा येत आहे अन्नपूर्णी. हा सिनेमा बनवणारे दिग्दर्शक निलेश कृष्णा आणि याची निर्मिती केली आहे झी स्टुडिओनं. या सिनेमाची कथा अशी आहे की, एका पुजाऱ्याची मुलगी एका मुस्लिम तरुणाशी प्रेम करते ज्याचं नाव फरहान दाखवण्यात आलं आहे. यामध्ये हिंदू तरुणी मुस्लिम तरुणाशी प्रेम करते आणि तिला कुराण पठण करायला लावलं जातं. तसेच बिर्याणी बनवण्यासाठी तिच्यावर दबाव आणला जातो. तसेच हा हिरो तरुणीला म्हणतो की भगवान रामानंच मांसाहार केला आहे तर तुला खायला काय अडचण आहे, अशी या सिनेमाची कथा आहे. या प्रकरणी झी स्टुडिओनं माफी देखील मागितली आहे. पण माफी मागितल्यानं काही होणार नाही. कारण अनेकदा आपण पाहिलं आहे की हिंदुंच्या भावनांशी खेळ केला जातो. लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यासाठी अशा प्रकारचे सिनेमे बनवले जातात", असेही टी राजा यांनी म्हटले आहे.
पुढे राजा म्हणाले की, “आज केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जग २२ जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटन सोहळा धुमधडाक्यात साजरा केला जावा यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज घराघरात रामायणाचं पठण केलं जात आहे. इतका चांगला माहौल खराब करण्याचं हे एक षडयंत्र आहे. त्यामुळं माझं गृहमंत्री अमित शहांना आवाहन आहे की त्यांनी झी स्टुडिओवर बंदी घालावी. तसेच अशा प्रकारचे कुठलाही चित्रपट जर ओटीटीवर प्रदर्शित होत असेल तर तो सेन्सॉर झाला पाहिजे. असे चित्रपट बनवण्याचा कोणीही प्रयत्न करत असेल त्यांना जोपर्यंत आपण तुरुंगात टाकत नाही तोपर्यंत अशा प्रकारचे चित्रपट बनवण्यापासून कुठलाही दिग्दर्शक किंवा निर्माता सुधरणार नाही, असेही टी राजा यांनी म्हटले.