क्रांती या शब्दात दोन अक्षरे आहेत आणि राम या शब्दातदेखील दोनच अक्षरे आहेत. क्रांती म्हणजे, आमूलाग्र परिवर्तन. हे परिवर्तन दोन प्रकारचे असते. पहिले परिवर्तन समाजाच्या सर्व रचनेतील मूलगामी बदलाचे असते आणि दुसरे परिवर्तन समाजाच्या विचार प्रक्रियेतील आमूलाग्र बदलाचे असते.
क्रांतीचा इतिहास असा आहे की, ती हिंसक असते. फ्रान्सने 1779 साली हिंसक क्रांतीचा अनुभव घेतला. समाज बदलला, राज्यव्यवस्था बदलली, समाजाच्या मानसिकतेत बदल झाला, हा बदल घडवून आणण्यासाठी जुन्या व्यवस्थेतील राजा-राणीपासून ते पाद्य्रांपर्यंत सर्वांना कापून काढण्यात आले.
अशी दुसरी क्रांती रशियात झाली. फ्रेंच राज्यक्रांतीची पुनरावृत्ती झाली. झार निकोलसपासून ते सामान्य भांडवलदारापर्यंत सर्वांना ठार करण्यात आले. नवीन व्यवस्था आणायची, तर जुन्यांना ठार केले पाहिजे, ही युरोपातील क्रांतीची वैशिष्ट्ये आहेत. सत्ता बदलासाठीसुद्धा जो हिंसाचार होतो, त्यालादेखील क्रांती असेच म्हणतात.
भारत मात्र अशी क्रांती स्वीकारत नाही. जुन्या व्यवस्थेतील सर्वांना कापून काढले पाहिजे आणि नवीन व्यवस्था समाजावर लादली पाहिजे, हा भारतीय पिंड नाही. आपल्याकडेही बदल होतात, मूलगामी बदल होतात; पण ते उत्क्रांतीच्या स्वरुपात होतात. आकस्मित बदल घडवून आणणे, हा आपला स्वभाव नाही. अशा बदलाच्या पर्वातून आपण चाललो आहोत आणि ती मानव जातीची ऐतिहासिक गरज आहे.
थोर ब्रिटिश इतिहासकार डॉ. अनॉर्ल्ड टॉयन्बी यांचे एक अवतरण फार प्रसिद्ध आहे, ते असे की, “आता हे सुस्पष्ट होत चालले आहे की, पा0श्चात्त्यांनी प्रारंभ केलेल्या अध्यायाचा शेवट हा भारतीय अध्यायाने होणार आहे. असे झाले नाही, तर मानवजातीला आत्मनाशाकडे वाटचाल करावी लागेल. इतिहासाच्या अत्यंत धोकादायक कालखंडात मानवजातीच्या मुक्तीचा एकमेव मार्ग हा भारतीय मार्ग आहे.“
आपल्या देशात ढीगभर ‘एमिनंट हिस्टोरिअन’ आहेत आणि ते इतिहासात भन्नाट शोध लावित असतात. अनॉर्ल्ड टॉयन्बी हे भारतीय नाहीत, इंग्रज आहेत. परंतु, त्यांना जसे आकलन झाले, तसे आकलन आमच्या ‘एमिनंट’ इतिहासकारांना होत नाही. हा भारतीय मार्ग कोणता असेल? हे रामाने हजारो वर्षांपूर्वी निर्धारित केलेले आहे. सध्या ‘राम’ या दोन अक्षरांच्या क्रांतिपथावरून आपण चालत आहोत.
हा क्रांतिमार्ग 1947 साली जेव्हा देश स्वतंत्र झाला, तेव्हाच प्रशस्त व्हायला पाहिजे होता, दुर्दैवाने तसे घडले नाही. याचे कारण सत्तेवरून गोरे इंग्रज गेले आणि काळे इंग्रज आले. हे काळे इंग्रज जन्माने भारतीय आणि विचारांनी पाश्चात्त्याळलेले. रामायण, महाभारत, वेद-उपनिषदे, भगवान गौतम बुद्धांचे त्रिपिटक, जैनांचा अनेकांत विचार त्यांच्या गावीदेखील नव्हता. त्यांना भारत ‘मॉडर्न’ करायचा होता. या भानगडीत तुम्ही पडू नका, असे महात्मा गांधी कंठरवाने सांगत होते.
गांधीजी म्हणत की, “इसका अर्थ यह हुआ की हमें अंग्रेजी राज्य तो चाहिए, पर अंग्रेज नहीं चाहिए। आप बाघ का स्वभाव तो चाहते है, लेकिन बाघ नहीं चाहते। मतलब यह हुआ की आप हिंदुस्तान को अंग्रेज बनाना चाहते है। और हिंदुस्तान जब अंग्रेज बन जाएगा तब वह हिंदुस्तान नहीं कहा जाएगा, लेकिन सच्चा इंग्लिस्तान कहा जाएगा। यह मेरी कल्पना का स्वराज नहीं है।”
परंतु, गांधीजींचे ऐकायला कोणाला वेळ नव्हता. 1947 साली स्वातंत्र मिळाले. गांधीजींचा उपयोग संपला आणि गांधीजींचा ‘राम’ पुन्हा वनवासात गेला. त्याला 75 वर्षे वनवासात राहावे लागले. आता अयोध्येत रामाच्या जन्मस्थानी भव्य मंदिर उभे राहत आहे. दि. 22 जानेवारीला प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे आणि सर्व देशभर सर्व वृत्तपत्र, वाहिन्यांवर त्याचीच चर्चा चालू आहे. सर्व देश राममय झालेला आहे. मंदिराच्या अक्षता घरोघर देण्यासाठी कार्यकर्ते फिरले आणि प्रत्येकाचे आस्थेने स्वागत झाले. लोकं भारावून गेले. पुरोगामी विचार करायचा, तर ‘अक्षता’ म्हणजे काय, तर तांदळाचे दाणे. कुठल्याही वाण्याच्या दुकानात ते विकत मिळतात. परंतु, भारत या अर्थाने पुरोगामी नसल्याने, ‘अक्षता’ या ‘अक्षता’ असतात, तांदळाचे दाणे नसतात.
‘राम’ या दोन अक्षरांनी कोणती उत्क्रांतमय क्रांती दिलेली आहे? रामाने आपल्या सर्वांना आपल्या मुळाकडे वळविले आहे. आपण कोण आहोत? आपण या भूमीचे पुत्र आहोत, रामच म्हणाला होता की, “जननी जन्मभूमी स्वर्गाहून महान आहे.” ही जननी जन्मभूमी आम्हाला चराचर सृष्टीवर ‘आत्मवत सर्व भुतेशू’ या भावनेने प्रेम करायला शिकविते. सर्व मानव आपले आहेत, सर्व प्राणीजगत आपले आहे, सर्व वनस्पतीजगत आपले आहे आणि या सर्वांशी आपल्याला एकत्वाच्या भावनेने व्यवहार करायचा आहे. हा माझा, तो दुसर्याचा असा भेदभाव ही जननी जन्मभूमी आपल्याला शिकवित नाही.
मानवतेचा विचार शिकण्यासाठी आणि शिकविण्यासाठी आपल्याला कोणत्याही विदेशी पंडिताची गरज नाही. त्यांचा मानवतावाद राजकारणमूलक, देशस्वार्थमूलक आणि वंशघमेंडी असतो. तो आपल्या स्वभावात बसणारा नाही. ज्या विद्वानांनी, पत्रपंडितांनी, राजकीय नेत्यांनी तो स्वीकारला आहे, ते आता देशात उघडे-नागडे पडत चालले आहेत. अशांची नावे इथे घेता येतील; परंतु पवित्र रामाच्या लेखात अपवित्र नावांचा उल्लेख करू नये, असे मन सांगते म्हणून इथे तो टाळतो.
अयोध्येत राममंदिराची उभारणी होत आहे, हा क्षण सनातन शाश्वत चिरकालीन भारताच्या जागृतीचा क्षण आहे. दीर्घकाळ आपण झोपून राहिलो, शुद्र स्वार्थामुळे आपापसात लढत राहिलो, समाजात भेदाच्या भिंती उभ्या केल्या. अनेकवेळा निरर्थक आध्यात्मिक तत्त्वचर्चेत काळ गमावला. एक राम नाम सर्व अध्यात्माला पुरेसं आहे. रामकृष्ण परमहंस यांच्या जीवनातील एक प्रसंग आहे. एक सिद्ध साधू दक्षिणेश्वरला आले होते. त्यांची आध्यात्मिक उंची फार मोठी होती. त्यांच्याकडे एकच ग्रंथ होता, त्या ग्रंथाला ते कोणाला हात लावू देत नसत. उत्सुकतेपोटी रामकृष्णांनी त्या साधूच्या नकळत तो ग्रंथ उघडून बघितला. ग्रंथाच्या पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत फक्त ‘राम’नाम लिहिलेले होते, बाकी काही नव्हते. एक रामनाम असे तारक आहे. या नावात भेदभाव मिटविण्याचे सामर्थ्य आहे, आध्यात्मिक सामर्थ्य आहे, भौतिक सामर्थ्य आहे, शस्त्रसामर्थ्य आहे, राजनीती सामर्थ्य आहे, विकास सामर्थ्य आहे, समाजाला सर्वांगाने सुखी करण्याचे सामर्थ्य आहे.
हे सामर्थ्य इतकी वर्षे आपण विसरलो. ते विसरावे अशा राजवटी होत्या. आता तो काळ संपत चालला आहे. आता ‘राम’नामाच्या अनुभूतीचा कालखंड आलेला आहे.
9869206101