देशभक्ती शिक्षा कायदा

10 Jan 2024 21:43:49
China's new patriotic education law

चिनी कम्युनिस्ट सरकारने चिनी जनतेला नव्या वर्षाची भेट काय दिली, तर एक नवा कायदा. हा कायदा म्हणजे, देशभक्ती शिक्षा कायदा. या कायद्यांतर्गत म्हणे, चीन आता विद्यार्थ्यांना देशभक्तीचे धडे देणार आहे. कारण, चिनी प्रशासनाचे म्हणणे आहे की, युवकांमध्ये ऐतिहासिक शून्यवाद निर्माण झाला आहे. देशाबद्दल निष्ठा कमी होत आहे. जनतेमध्ये देशप्रेम वाढावे म्हणून शिक्षणाच्या माध्यमातून चीन आता जनतेमध्ये देशप्रेम रूजवणार आहे.

अर्थात कम्युनिस्ट सत्ताधारी चीनला जनतेमध्ये देशप्रेम रूजवण्याची गरज का पडली असेल? तर चीनच्या कम्युनिस्ट प्रशासनाने अनेक वर्षं दडपशाही करत, चिनी जनतेला बंदिस्तच केले होते. सगळे अधिकार आणि हक्क कम्युनिस्ट शासनाला. शासनाच्या विरोधात कुणाला ब्र देखील उच्चारण्याचे स्वातंत्र्य नव्हते. तसा प्रयत्न केल्यास त्या व्यक्तीचा आणि समुदायाचा अंतही भयानकच होणार, हे अलिखित. या परिक्षेपात चिनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी स्वतःचे वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी, सातत्याने प्रयत्नही केले. चीनला आपण जगाचे सम्राट बनवतो आहोत, असा भ्रम जिनपिंगनी चिनी जनतेमध्ये निर्माण केला. जगभरातल्या गरीब राष्ट्रांना मदतीचे गाजर दाखवले. प्रत्यक्षात मात्र मदतीच्या नावावर या राष्ट्रांचे शोषण केले.

मदत तरी काय? आवळा देऊन कोहळा काढयण्याची चीनची पद्धतच. काही वर्षांपूर्वी श्रीलकां, पाकिस्तान नेपाळ आणि अगदी आफ्रिकेतील गरीब देशांनाही चीनने विकासाच्या नावाने आर्थिक मदती करायला सुरुवात केली. ही आर्थिक मदत अर्थातच कर्जाच्या स्वरुपातली होती. चीनच्या एक रकमी कर्ज स्वरुपातील मदतीला ही गरीब राष्ट्रे विसरली होती. त्यावेळी पाकिस्तान नावाचा सैरभैर जमिनीचा तुकडा तर केवळ भारताला विरोध म्हणून चीनचा अंकित बनू लागला होता. चीनने व्यवस्थित या सर्व छोट्या गरीब देशांमध्ये पाय रोवले. पण, या देशामध्ये चीनने दिलेल्या कर्जस्वरुपी मदतीने कधीही विकास झालाच नाही; उलट प्रकल्प रखडले गेले. त्यामुळे या देशांवर चीनचे कर्ज वाढत गेले. चीन जगातला महत्त्वाचा देश बनत चालला आहे, या समजुतीतून चिनी नागरिकही चिनी प्रशासनाची दडपशाही सहन करत होते.

मात्र, एक दशकानंतर सत्य बाहेर आलेच की, इतर राष्ट्रांना मदतीचे नाटक करणार्‍या, चीनची स्वतःची अर्थव्यवस्था कमजोर आहे. इतकेच काय? तर चीनमधून अनेक राष्ट्रांच्या कंपन्यांनी काढता पाय घेतला. त्यामुळे चीनची अर्थव्यवस्था आणखीन डगमगली. त्याआधी ’कोरोना’ने चीनचे नाव खराब केलेच होते. चीन म्हणजे ‘कोरोना’ हे समीकरणच झाले. त्यामुळेही चीनच्या आर्थिकतेवर परिणाम झाला. या सगळ्याचा एकत्रित परिणाम असा झाला की, चिनी जनतेच्या समोर चीनच्या प्रशासनाने जी स्वतःची ’सुपर पॉवर’ प्रतिमा निर्माण केली होती. ती आभासी प्रतिमा भंग पावली. चिनी युवकांना बेरोजगारीने ग्रासले. इंटरनेटच्या माध्यमातून चिनी जनता जगाच्या संपर्कात होतीच. त्यामुळेच चीनची जगात जी खलनायकी प्रतिमा निर्माण झाली. त्यामुळे आणि अंतर्गत समस्येमुळे चिनी जनतेचा कम्युनिस्ट प्रशासनाबद्दल मोहभंग झाला.

चीनवर एकहाती सत्ता राहावी, म्हणून कम्युनिस्ट पक्ष चीनचा वापर करत होता, हेसुद्धा चिनी जनतेला माहिती पडले.
त्यामुळे चीनच्या जनतेमध्ये कम्युनिस्टांविरोधात असंतोष निर्माण झाला. हा असंतोष दडपणे, कम्युनिस्ट प्रशासनाला सोपे नव्हते. त्यामुळे सध्या चिनी प्रशासनाने देशभक्तीचे गोडवे गायला सुरुवात केली आहे. या देशभक्तीच्या आड कम्युनिस्ट प्रशासन राष्ट्रपती जिनपिंगचे माहात्म्य वाढवणार आहे, हे स्पष्ट आहे. याची पूर्वतयारी चीनमध्ये केलेली होती. चीनमध्ये एका मोठ्या रेस्टॉरंटमध्ये उत्तम प्रकारचे अन्न कमी शुल्कात लोकांना मिळते. मात्र, त्या अलिशान रेस्टॉरंटमध्ये ठीकठिकाणी जिनपिंगचे कर्तृत्व आणि विचार यांवर आधारित फोटो लावले आहेत. पुस्तकांचा शेल्फही जिनपिंगच्या जीवनचरित्रावर आधारित पुस्तकांनी भरलेला. असो. देशभक्तीच्या नावाआड चिनी जनतेला आता कम्युनिस्ट पक्षाचे आणि जिनपिंगच्या हुकमूशाहीला समर्थन देणारे, धडे गिरवावे लागतील, असे दिसते. काहीही म्हणा, चीनने गेले काही दशके आशिया खंडात जे काही पेरले, ते आता उगवायला सुरुवात झाली आहे.


9594969638
Powered By Sangraha 9.0