व्रतस्थ छंदोवती

    09-Sep-2023
Total Views |
Article On Raga singer Malini Rajurkar

रागगायिका विदुषी मालिनी राजूरकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा सांगीतिक प्रवास आणि त्यातील आठवणींना उजाळा देणारा संवादिनी वादक सुयोग कुंडलकर यांचा लेख...

रंगमंचावर जी कला सादर होते, तो त्या कलाकाराच्या कलेचा एक लहानसा भाग असतो. पण, त्यामागे रियाज, चिंतन-मनन अशी एक प्रदीर्घ चालणारी प्रक्रिया असते. कलेचा आविष्कार, तिच्यातले प्रयोग, त्याचा होणारा परिणाम, जाणवणारी उत्कटता, बदलणारं भावविश्व आणि त्याचबरोबर आपल्या स्वतःच्या कलाप्रस्तुतीची चिकित्सा आणि समीक्षा एक उत्तम कलाकार स्वतः सतत करत असतो. या दीर्घ साधनेनंतर सिद्ध होते, ती खरी कला! कलाकार केवळ मैफिलीतच नाही, तर या प्रवासात शोधायचा असतो. किती साधना ती आणि हीच मालिनीताईंची ओळख!

मालिनीताई ग्वाल्हेर घराण्याच्या गायिका. ग्वाल्हेर घराण्याची परंपरागत गायकी आपण ऐकली तर ती मर्दानी, जोरकस, पण नजाकत असलेली आहे. तिला पुरुषी लहेजाची मोठी झाक आहे. त्या गायकीतला तो (eliment) कायम ठेवून ती गायकी स्त्री सुलभ करून मांडण्याचं मोठं काम मालिनीताईंनी केलं. अर्थात, त्यातली आक्रमकता, त्यातला आवेश, जोश हे मात्र जसंच्या तसं पोहोचेल, ही काळजी घेऊनच! जयपूर घराण्याची एक अनवट, अवघड वाट बालगंधर्वांनी आपल्या नाट्यगीतांत अतिशय ललित रुपात मांडली. हे उदाहरण मला द्यावंसं वाटेल. मालिनीताईंनीही हे तत्त्व गाणं मांडताना उत्तम जोपासलं होतं. एका स्त्री कलाकाराकडून ग्वाल्हेर घराण्याची गायकी मांडताना त्यातले गमक, घसीट, बलपेचदार स्वरवाक्याची पुकार या संगीत अलंकारांचा जोरकस अतिरेक झाला, तर ते तितकंसं सुश्राव्य राहत नाही. मात्र, या तंत्राचा अतिशय सुंदर मेळ गायकीला धक्का न लावता मालिनीताईंनी जोपासला, सादर केला आणि प्रस्थापित केला.

मालिनीताईंचं शिक्षण झालं, ते त्यांचे चुलत सासरे पंडित गोविंदराव राजूरकर आणि त्यानंतर आपले पती पंडित वसंतराव राजूरकर यांच्याकडे. तेव्हा पुरुषाने गावी अशी गायकी आपण उचलताना त्यात स्त्रीसुलभता यावी, याचा बारीक अभ्यास त्यांनी केलेला जाणवतो. कुमारजी, अभिषेकी बुवा, वसंरावतजी, भीमसेनजी, गंगुबाई या कलाकारांचं गाणं ऐकून ग्वाल्हेर गायकीची मूस न बदलता, एक स्वतःचा ‘मालिनी टच’ आपल्या गायकीला त्यांनी दिला. गुरूंनी दिलेलं गाणं जसंच्या तसं न गाता, त्या गायकीला स्वतःच्या आवाजधर्माशी, विचारांशी जोडून अत्यंत सुंदर पद्धतीने त्यांनी गाणं मांडलं. त्यांनी काही लयीही बदलल्या. ग्वाल्हेर घराण्याचे जे तीन-चार आवर्तनांचे ख्याल होते, ते एका किंवा दोन आवर्तनात त्यांनी गायले. एक प्रकारचे हे संगीतातले परिवर्तनच! अतिशय कठोर रियाज त्यांनी केला. दीर्घकाळ केला. त्यांचा आवाज सुरेल, पल्लेदार, चपळ होता. दमदार होता. अतिशय सूक्ष्म सुयोग्य अनुनासिक होता. आपल्या आवाजाचा आणि मांडल्या जाणार्‍या गायकीचा जाणीवपूर्वक अभ्यास करून त्यांनी आपल्या आवाजाला शोभून दिसेल, असं घोटीव गाणं सादर केलं.

मालिनीताई केवळ गायल्या. पैसे, प्रसिद्धी, मान-सन्मान यात त्या कधीच अडकल्या नाहीत. त्यांच्याकडे केवळ रागसंगीत गाणार्‍या गायिका म्हणून न पाहता एक तत्त्वनिष्ठ व्यक्ती म्हणूनदेखील मी पाहतो. सांगीतिक मूल्य-तत्त्व आणि व्यवहार यात कधीही, त्यांनी तडजोड केली नाही. त्या पैशाकडे बघून कधीच गायल्या नाहीत, तर एक सांगीतिक बांधिलकी म्हणून गायल्या आणि म्हणूनच मी त्यांना गुरुस्थानी मानतो.

मालिनीताईंच्या आयुष्यात त्यांनी संगीत विश्वातील परिवारापासून, मित्रपरिवार आणि रसिक यांचा ऋणानुबंध जपला होता. विशेष म्हणजे, शेवटपर्यंत टिकवलाही! बरेचदा कलाकार जितका मोठा तेवढाच तो व्यक्ती म्हणूनही मोठा असेलच असं नाही; पण मालिनीताई याला सन्माननीय अपवाद! आपल्या गायकीबाबत त्या जितक्या जागरूक असायच्या तितक्याच आपल्या कुटुंबाप्रती, समाजाप्रती जागरूक होत्या. आपली शारीरिक ताकद, मला जो काही सांगीतिक मजकूर द्यायचा आहे, तो तसेच माझे ‘संगतकार’ त्यादिवशी आहेत का, याबाबत त्यांनी कधीच तडजोड केली नाही. या महिन्यात अनेक आमंत्रणे आहेत म्हणून सगळी स्वीकारा, असे त्यांनी कधीही केले नाही. अगदी तत्त्वनिष्ठ. कलाकाराला वय नसतं. त्याची कला ही त्याची ओळख. त्यांच्यासमोर मी अगदीच नवखा! परंतु, जेव्हा-जेव्हा मी त्यांना साथ केली, तेव्हा तेव्हा त्या ‘अहो-जाहो’ करत. बरोबरीचा मान देत. तसंच सांगीतिक शंकांचं, चुकांचं निरसन करत. म्हणजे कसं तर, काहीवेळा मैफिलीत साथ करताना माझी एखादी चूक झाली किंवा एखाद्या स्वरावर अनावश्यक ठेहराव झाला, चलन चुकलं तर फक्त त्या व्यक्तीलाच कळेल, अशा हळुवार नजरेतून तिथेच दुरुस्ती करून द्यायच्या. त्यांनी अशा छोट्या-छोट्या प्रसंगातून घडवलंय, शिकवलंय. कितीतरी वेळा अतिशय सहजपणे अनेक रागरररुपांबाबत मार्गदर्शन केलंय. त्या कधी हातचं राखून बोलल्या नाहीत. कित्येक बंदिशी त्यांनी सांगितल्यात. समजावल्यात. त्या अशाच. सहज...

ताईंनी ज्याप्रमाणे पूर्वसुरींचा अभ्यास केला, तशी एक पद्धतसुद्धा संगीत क्षेत्रात घालून दिली. ती म्हणजे स्त्री कलाकारांनी कसे सादर व्हावे, मैफिलीत कसे असावे, कसे गावे, कसे वागावे. हे उदाहरणासह दाखवून मापदंड घालून दिले. हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, गंगुबाई हनगल या गायिकांना त्यांनी आदर्श मानले. ग्वाल्हेर घराण्याच्या पारंपरिक बंदिशीबरोबरच श्रीकृष्ण नारायण रातंजनकर, सी. आर. व्यास, शंकर अभ्यंकर, गोविंद नारायण नातू, बाळाभाऊ उमडेकर, कुमार गंधर्व, रामाश्रय झा, दिनकर कैकिणी अशा अनेक ज्येष्ठ कलाकारांच्या बंदिशी त्यांनी गायल्या. अर्थात, त्या बंदिशींना स्वतःच्या विचारांचा, गायकीचा विशिष्ट संदर्भ देऊन! स्वतःची संपूर्ण मैफल केवळ ख्याल आणि टप्पा गाऊन त्यांनी सिद्ध केली. ठुमरी, भजन नाहीच. ‘असंही गाणं असतं’ हे त्यांनी दाखवून दिले. हे नक्कीच पुढचे पाऊल होते. क्वचितच झुला, निवडक निर्गुणी भजनं त्यांनी गायली. त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला काही नाट्यगीतही त्या गायल्या. गाताना केवळ गाणं सादर करणं नाही, तर त्यामागचा विचार मांडणं, हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट असायचं. अगदी अलीकडे माझ्या ‘रागचित्र’ या संग्रहातील बंदिशी जेव्हा त्यांना गाव्याशा वाटल्या, तेव्हा मी यातील काही रचनांमध्ये माझ्या गायकीनुसार थोडे बदल करून गाऊ का, अशी प्रांजळ पूर्वपरवानगी त्यांनी घेतली. हा त्यांचा अतिशय मोठेपणा.

जेव्हा लतादीदींना ‘भारतरत्न’ पुरस्कार मिळाला, तेव्हा शरद पवारांच्या घरी दीदींच्या सन्मानार्थ त्यांनी मालिनीताईंना गाण्यासाठी विचारलं होतं. तेव्हा मैफिलीपूर्वीची त्यांची सांगीतिक अस्वस्थता मी पाहिलीये. लता दीदींसमोर आपण गातोय, तेव्हा एक अवीट सांगीतिक अनुभव त्या व्यक्तीला मिळावा, यासाठीची धडपड आणि त्यामागचे प्रामाणिक प्रयत्न मी पाहिले. हे असं प्रत्येकच मैफिलीपूर्वी त्यांना मी पाहत आलोय. त्यांची सांगीतिक मूल्य जाणीवपूर्वक पाहत आलोय. यातूनच मी त्यांना गुरुस्थानी पाहू लागलो.

ताईंनी ग्वाल्हेरचे प्रचलित राग गायलेच; पण त्याबरोबर कर्नाटकी संगीतातून जे राग आलेत ‘सालगवराळी’, ‘बसंतमुखारी’, ‘सरस्वती’, ‘नारायणी’, ‘विजयानगरी’, ‘किरवाणी’, ‘अभोगी’, ‘चारुकेशी’ असे विविध राग गाऊन त्यातलं संगीत मांडलं. गळ्याची, श्वासाची आणि बुद्धीचीही परीक्षा पाहणारा ’टप्पा’ ज्या सहजतेने त्यांनी लोकाभिमुख केला, त्यावर शिक्कामोर्तब झाले की, स्त्रीही तेवढ्याच ताकदीनिशी ‘टप्पा’ गाऊ शकते! आवाजाचा पोत सहजतेने बदलण्यात त्यांचा हातखंडा. ‘टप्पा’ गाताना तारसप्तकात आवाज कर्कश्श होण्याच्या शक्यता असतात; परंतु मालिनीताईंबाबत हे कधीच झाले नाही.

त्यांनी त्यांच्या घराला नेहमी प्राधान्य दिले. तुमचं घर जर व्यवस्थित असेल, तरच तुम्ही निखळपणे स्टेजवर गाऊ शकता, असा त्यांचा विश्वास होता. ज्येष्ठांच्या संगीताचे कौतुक त्यांनी केलेच; पण नव्या तरुण गायकांच्या गायकीचेही त्यांनी तेवढेच कौतुक केले, त्यांना प्रोत्साहन दिले. एखाद्याचं काही आवडलं की, त्या रसग्रहण करून आम्हाला ऐकवत. म्हणत, ‘हा बघ किती छान गातो, ऐक!’ त्यांची राहणीही अगदी साधी होती. तेवढ्याच साधेपणाने, सहजपणे त्यांनी संगीतातून निवृत्तीही घेतली. त्यानंतर त्या बाहेरच्या मैफिलीत कधीच गायल्या नाहीत. आमच्या व्हॉट्सअ‍ॅप मैफिली मात्र रंगत. निवृत्ती घेतल्यानंतर त्यांना जाहीर झालेले पुरस्कारसुद्धा त्यांनी घेतले नाहीत.

मैफिलीला जाताना घरातून ‘संगतकारां’च्या मानधनाची पाकिटे बनवून त्या यायच्या. आयोजकांनी चेक दिल्यानंतर त्यानंतर मानधन देऊ, असे त्यांनी कधीच केले नाही. तसेच त्या मानधन देताना त्यात प्रवास खर्चसुद्धा असायचाच. म्हणजे अगदी पुण्यात मैफल असेल आणि मी घरून रिक्षाने गेलो, तर ते वरचे २० रुपयेसुद्धा त्या देणार. तुमचे मानधन संपूर्णपणे तुमच्या घरीच गेले पाहिजे, हा त्यांचा अट्टहास. संध्याकाळी मैफिल म्हणून त्या संपूर्ण दिवस गाण्यातच असायच्या. त्या त्या गावात फिरून येणं, गाण्याच्या दिवशी लोकांना भेटणं वगैरे नाहीच. श्रोते तिकीट काढून मला ऐकायला येतायत ना मग, त्या बदल्यात त्यांना उत्कृष्ट संगीतानुभव मिळायलाच हवा, ही भूमिका. तक्रार करण्याचा स्वभावच नाही. तंबोरे सगळीकडे उत्तम मिळत नाहीत. मग टॅबवरून डिजिटल तंबोर्‍याशी त्यांनी जुळवून घेतलं. खरंतर लाकडी तंबोरा म्हणजे त्यातल्या आवाजात एक नैसर्गिक नाद येतो, तो डिजिटल वाद्यांवर येत नाही. पण, पुन्हा जुळवून घेण्याचे कसब! आज त्या नाहीत, तेव्हा लक्षात येतं, अरे, किती गृहीत धरत गेलो आपण त्यांना. अजूनही त्यांनी सांगितलेल्या सांगीतिक गोष्टींवर काम करायचं राहिलंय. अजूनही या बंदिशी, अशा गाऊन पाहायच्या राहिल्यात. राहून गेलंय बरंच काही... आठवणींसहित... पुष्कळसं...

सुयोग कुंडलकर
(शब्दांकन : मृगा वर्तक)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.