मुंबई (विशेष प्रतिनिधी): पेंच अभयारण्यामध्ये सोमवार दि. ४ सप्टेंबर रोजी दोन गिधाडे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आली आहेत. २ वर्ष वयाच्या या गिधाडांना बीएनएचएस मार्फत रिंगींग ही करण्यात आले आहे.
नागपुर आणि गोंदियामध्ये ही गिधाडे आढळली होती. त्यांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर ते सुदृढ असल्याची खात्री झाली. खाण्याचे स्त्रोत तुलनेने कमी झाल्यामुळे तसेच ही गिधाडे लहान वयाची असल्यामुळे त्यांना खाद्य शोधणे मुश्कील होत होते. खाद्य न मिळाल्यामुळे थकलेल्या अवस्थेत ही गिधाडे आढळली होती. या अशक्त असलेल्या असलेल्या गिधाडांवर नागपुरच्या ट्रान्झीट ट्रीटमेंट सेंटरमध्ये काही दिवस उपचार केल्यानंतर आता त्यांना पेंच अभयारण्यात सोडण्यात आले आहे.
विदर्भातील पेंच आणि नागपुर क्षेत्रामध्ये नैसर्गिक अधिवासातील गिधाडांची संख्या चांगली आहे. त्यामुळे या गिधाडांना पेंच अभयारण्यात सोडण्यात आले आहे. या गिधाडांना नैसर्गिक अधिवासात मुक्त करताना पुढील अभ्यासासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी मार्फत रिंगींग करण्यात आले आहे.