शिवरायांची वाघनखं लवकरच मायभूमीत; मंत्री सुधीर मुनगंटीवार ऑक्टोबरमध्ये इंग्लंड दौऱ्यावर

08 Sep 2023 18:48:56
Cabinet Minister Sudhir Mungantiwar England Tour

मुंबई :
परकीय आक्रमणकारी क्रूरकर्मा अफझलखानाचा वध करताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली वाघनखे पुन्हा एकदा मायदेशी परतणार आहेत. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या शिवरायांनी ज्या वाघनखांच्या मदतीने अफझलखानचा वध केला होता ती सध्या इंग्लंडमधील संग्रहालयात जतन करून ठेवण्यात आलेली आहेत. ती भारतात आणण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. या कामासाठी मंत्री सुधीर मुनगंटीवार येत्या ऑक्टोबर महिन्यात इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहेत.

राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत स्वतः माहिती दिली आहे. "छत्रपती शिवाजी महाराजांनी व्यभिचारी आणि दुष्ट प्रवृत्तीच्या अफझलखानचा वध करण्यासाठी वापरलेली वाघनखे परत आणण्याचे आमचे स्वप्न पूर्णत्वास येत आहे. या कामासाठी मी स्वतः १ ऑक्टोबर रोजी इंग्लंडला जाणार असून ३ ऑक्टोबर रोजी या संदर्भात सामंजस्य करार करण्यात येणार आहे. या करारावर स्वाक्षरी होत असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत,"असे मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.

"ऑक्टोबरमध्ये सामंजस्य करार झाल्यावर अंदाजे नोव्हेंबरमध्ये ही वाघनखं भारतात येणार असून मुंबईत ती ठेवण्यात येणार आहेत. नोव्हेंबर महिन्यात वाघनखे आणण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हेदेखील सोबत राहतील. महाराष्ट्रात वाघनखे येताच एक मोठा सोहळा आयोजित केला जाणार आहे," अशी माहिती सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.

Powered By Sangraha 9.0