हलाखीच्या परिस्थितीतही रस्त्यावरील मुक्या प्राण्यांवर भूतदया दाखवून घरालाच ‘शेल्टर’ करणार्या संगीता उतेकर यांच्याविषयी...
ठाण्यातील वागळे इस्टेट, हाजुरी गावात चाळवजा छोट्या घराला मुक्या भटक्या प्राण्यांचे शेल्टर बनवणार्या प्राणिमित्र, ‘अॅनिमल रेस्क्यूअर’, ‘अॅनिमल फीडर’ संगीता दिलीप उतेकर यांचा जन्म ठाण्यातलाच. त्यांचे बालपण गरिबीत पण आनंदात गेले. प्राथमिक शिक्षण पालिकेच्या शाळेत, तर माध्यमिक शिक्षण मो. ह. विद्यालय, न्यू कळवा हायस्कूलमध्ये तेही स्वकष्टाने झाले. घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे ‘एचएससी’नंतर विवाह व विवाहानंतर त्या पदवीधर झाल्या. त्यांचे वडील हमाली व आई धुणीभांडी करायची, त्यामुळे पुढील शिक्षणात खंड पडला.
सुरुवातीला काही काळ खासगी कंपनीत कंत्राटी नोकरी केल्यानंतर त्यांचे प्रमोशन झाले. पण, नंतर इंटर्नशिपमध्ये अर्धांगवायूचा इटका आल्याने त्यांनी नोकरी सोडली. अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत असतानाच त्यांचे यजमानही मानसिक तणावामुळे घरी पडून होते. दरम्यान, त्या कालावधीत एक भटक्या कुत्र्याचे पिल्लू त्यांच्या दारात येऊन बसू लागले. त्या पिल्लाचा मुलीला लळा लागला, ती ते पिल्लू घरात पाळावयास आग्रही होती. घरात दोघेही आजारी असल्याने सुरुवातीला टाळले. पण, एरवी शांत असलेले यजमान त्या कुत्र्याच्या पिल्लासोबत बोलू लागले, खेळू लागले. हे पाहून त्या कुत्र्याच्या पिल्लाचा सांभाळ करण्याचे त्यांनी ठरवले. घर अगदी आनंदाने भरून गेले. काही दिवसांनी आणखी एक कुत्र्याचे पिल्लू कोणीतरी आणून सोडले आणि तेही स्वीकारले. मग हे सुरूच राहिले, एक-एक करीत दहा श्वान घरात राहू लागल्याने आयुष्यालाच कलाटणी मिळाली. त्यांच्या व यजमानाच्या तब्येतीत सुधारणा झाली.
त्यानंतर परिसरातील इतर भटके कुत्रे, व मांजरींच्या जेवणाचीही, त्या व्यवस्था करू लागल्या. विवाहापूर्वी केलेल्या नर्सिंग कोर्समुळे त्यांना या भटक्या जीवांवर उपचार करण्यासाठी, एक प्रकारे बळ आले. कोरोना काळातील लॉकडाऊनमध्ये त्यांनी अंगावरील दागदागिने विकून मुक्या प्राण्यांच्या जेवणाची व्यवस्था केली. सडलेले, किडे पडलेले, प्राण्याचे मृतदेह कोठे आढळले अथवा कोणी सांगितले की, ते आणून त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. एखाद्या आजारी श्वानाला रक्ताची गरज भासली, तर त्यांच्याकडील पाळलेल्या श्वानांपैकी दोन श्वानांचे रक्तदान करीत त्यांचे जीव वाचवून त्यांना जीवदान दिले.
असे एक-दोनदा नव्हे, तब्बल सहावेळा रक्तदान केल्याचे संगीता सांगतात. त्यासोबतच जखमी श्वानांवर उपचार करणे, लसीकरण, निर्बिजीकरण करणे, त्यांच्या हक्कांविषयी जनजागृती करणे, ही सर्व कामे त्या घरचा व्याप सांभाळून स्वखर्चातून करतात. दरवर्षी ३० ते ४० श्वानांचे लसीकरण त्या करतात. १९९३ पासून ही भूतदया सुरू आहे. हे सर्व करीत असताना अर्थातच त्यांना परिसरातील नागरिकांकडून त्रास होऊ लागला. पण, हा होणारा त्रासही त्यांनी सहन केला. पण, कार्य थांबविले नाही. त्यासाठी लागणारे शांत चित्त व प्रेरणा मी करीत असलेल्या आध्यात्मिक गोष्टींमुळे मिळाल्याचे त्या नमूद करतात.
गेली २२ वर्षं त्यांनी सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या ‘जीवनविद्या मिशन’चा अनुग्रह घेतला असल्याने शिवाय ध्यानसाधना आध्यात्मिक बैठक असल्याने येणार्या प्रत्येक परिस्थितीला, त्या सामोरे जातात. ‘जीवनविद्या मिशन’च्या माध्यमातून दोन वर्षं त्यांनी ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात प्रार्थना व स्वयंसूचना यांसारख्या सेवा दिल्यानंतर अर्धागवायूने लंगडत चालण्याऐवजी त्या चक्क धडधाकटपणे सरळ चालू लागल्या. कुणाच्याही मदतीविना मोबदल्याशिवाय स्वकष्टाने दररोज ६० ते ६५ भटक्या कुत्र्या-मांजरांना जेवू घालते. वेळप्रसंगी नाल्यात पडलेले अथवा अडचणीच्या ठिकाणी असलेला एखादा जीव जेव्हा रेसक्यू करून त्याला जीवदान मिळते, तेव्हा मिळणारा आनंद हा एखाद्या पुरस्कारासारखाच असतो, असे त्या मानतात.
सध्या हाजुरीतील चाळवजा घरात त्या व त्यांचे यजमान आणि दहा भटके कुत्रे वास्तव्य करीत आहेत. त्यांची मुलगी पुण्याला असते. तेव्हा आता लवकरच त्या आपले, हे चाळीतील राहते घर म्हणजे विकून ‘डॉग शेल्टर’ बनविण्याचा विचार करीत आहेत. या ‘डॉग शेल्टर’मध्ये अपंग, अंध, वृद्ध श्वानांना ठेवण्याचा त्या विचार करीत आहेत. या सगळ्या कार्यात त्यांचे यजमान आणि मुलगी यांना त्या प्रेरणास्थान मानतात. “भूतदयेच्या या कामात समाजाकडून अनेक अडचणी उद्भवल्या. पण, त्याबद्दल त्या कुठलीही तक्रार करीत नाहीत. ही सृष्टी केवळ मानवासाठीच बनलेली नसून, या भूतलावर जो जीव जन्माला आला, त्या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे.
शिवाय, वाढत्या नागरीकरणात शहरातील निम्मा केरकचरा तर फक्त कावळे आणि भटक्या श्वानामुळे कमी होत असतो. हे सर्व पर्यावरणाचाच भाग आहेत. तेव्हा, नवीन युवापिढीने यासाठी पुढाकार घ्यावा,” असे त्यांना वाटते. त्यांची मुलगी पुण्यात राहते, तीदेखील त्या परिसरातील १२ ते १५ भटक्या श्वानांच्या जेवणाची, नसबंदी लसीकरणाची जबाबदारी घेत असून, आता बर्यापैकी तरुणाई जागरूक होत असल्याचे समाधान त्या व्यक्त करतात. अशा या भूतदयेच्या संगीताईला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!
९३२००८९१००