माझी माती, माझा देश : एक यशस्वी अभियान

    08-Sep-2023
Total Views |
Article On Majhi Mati, Majhi Desh Abhiyan

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भारत सरकारने देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या आणि स्वातंत्र्य सेनानींच्या स्मृतींना अमरत्व देण्यासाठी ‘माझी माती, माझा देश’ या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. सामान्य नागरिकांच्या मनात वीर आणि वीरांगनांप्रती श्रद्धा आणि कृतज्ञतेचा भाव जागृत करणारे हे अभियान राबविल्याबद्दल सरकारचे मन:पूर्वक आभार. ‘मातीला नमन, वीरांना वंदन’ या उद्घोषासह या अभियानाने समाजात देशभक्तीचा भाव आणि जगात भारताला विकसित देश म्हणून घडविण्याचा संकल्प सर्वार्थाने जागृत केला.

आपण देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षं पूर्ण झाल्यानिमित्ताने अमृतमहोत्सवी वर्ष मोठ्या उत्साहात साजरे केले. पुढील २५ वर्षांत देश आपल्या स्वातंत्र्याची १०० वर्षं पूर्ण करणार आहे. याच २५ वर्षांच्या कालावधीला देशाचा ‘अमृतकाळ’ म्हणून संबोधित केले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमृतकाळ पूर्णत्वास येईपर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. आर्थिकदृष्ट्या आपला देश सशक्त झाला पाहिजे, देशाच्या सुरक्षेसाठी आपले सैन्यसामर्थ्य अन्य देशांच्या तोडीचे हवे, आपापसातील मतभेद विसरुन समाजात परस्पर सद्भाव आणि बंधुभाव विकसित झाला पाहिजे, महिलांचा सन्मान, गरीब, मागासवर्गीय, अनुसूचित जाती-जमाती, शहरी, ग्रामीण अशा सर्व समाजघटकांनी राष्ट्रोत्थानासाठी सक्रिय झाले पाहिजे, देशाने आपल्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान बाळगला पाहिजे आणि अशा भारताचे निर्माण करणे, हा प्रत्येक भारतीयाचा संकल्प झाला पाहिजे. संपूर्ण देशाने या संकल्पपूर्तीसाठी नेटाने उभे राहिले पाहिजे, म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंचप्रणची शपथ घेण्याचे आवाहन केले होते.

‘माझी माती, माझा देश’ हे अभियान काही टप्प्यांत संपन्न होणार आहे. प्रत्येक घराच्या अंगणातील मातीचे संकलन करून प्रत्येक गावात एका कलशात ही माती गोळा केली जाईल. ज्या घरांमध्ये माती उपलब्ध नाही, ते कुटुंब रोळी, अक्षता देऊन या अभियानात सहभाग नोंदवू शकतात. गावात एकत्रित होऊन सामूहिक कार्यक्रम आयोजित करणे, शाळांमध्ये स्वातंत्र्यसैनिकांचे फलक लावणे, पंचप्रणची शपथ आणि ७५ वृक्षांचे रोपण करुन अमृतवाटिका तयार करणे इत्यादी बाबींचा या अभियानात समावेश आहे. गावातून हे सगळे कलश जमा करून विकासखंड येथे आणले जातील. विकासखंडानंतर राज्यांची राजधानी, त्यानंतर दि. २९-३० ऑक्टोबर रोजी दिल्लीमध्ये सामूहिक कार्यक्रम तसेच दिल्लीत अमृतवाटिकेची निर्मिती होऊन हा कार्यक्रम संपन्न होईल. युवा, क्रीडा, संस्कृती, शिक्षण आणि पर्यावरण मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न होईल. भारतीय जनता पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहभागी होतील. पंतप्रधानांच्या निर्देशानुसार अनेक सामाजिक तसेच धार्मिक संस्था आपला या अभियानात अमूल्य सहभाग नोंदवत देशभरात देशभक्तीचे वातावरण निर्माण करण्यामध्ये साहाय्यभूत ठरणार आहेत.

देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या आंदोलनात जनसामान्यांना जोडण्यासाठी महापुरुषांच्या नेतृत्वात अनेक आंदोलने झाली. १९०५ साली वंग-भंग आंदोलनावेळी रक्षाबंधनाचा सण सामूहिक पातळीवर साजरा करणे, हे अशाच प्रकारचे आंदोलन होते. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वातील ‘जंगल सत्याग्रह‘, ‘भारत छोडो आंदोलन’, ‘चरखा’ तसेच ‘स्वदेशी’ यांसारख्या आंदोलनांनी समाजाला स्वातंत्र्य चळवळीशी जोडण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती, ज्यामुळे भारतातील अगदी लहान मुलेदेखील देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाला लावून ब्रिटिशांविरोधात मैदानात उतरली. स्वातंत्र्यप्राप्ती हेच देशांच्या नागरिकांचे लक्ष्य होते.

दुर्देवाने स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील राजकीय नेतृत्वाने भावी पिढीसमोर भविष्यासाठी कोणतेही लक्ष्य न ठेवल्याने आपण दिशाहीन झालो. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी देशाला विकसित राष्ट्र म्हणून प्रगती करण्यासाठीचे लक्ष्य निर्धारित केले. ही लक्ष्यपूर्ती साध्य करण्यासाठी तिरंगा यात्रा तसेच ‘माझी माती, माझा देश’ सारखे अभियान राबविले, ज्यामुळे संपूर्ण देश लक्ष्यप्राप्तीसाठी सक्रिय झाला. याचाच परिणाम आर्थिक, शैक्षणिक, विज्ञान तसेच क्रीडा क्षेत्रासह अन्य क्षेत्रांमध्येही आपल्याला स्पष्टपणे दिसून येत आहे. इथे एक गोष्ट आवर्जून नमूद करावीशी वाटते की, पंतप्रधान मोदींनी घोषित केलेले आणि यशस्वी झालेले ‘स्वच्छ भारत’ अभियान पाहिले की, १९६८ साली सिंगापूरने राबविलेल्या ‘कीप सिंगापूर क्लीन’ या अभियानाची आठवण होते.

कोणताही देश हा आपली संस्कृती, त्या-त्या देशाचे महापुरूष, आपल्या देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांच्या प्रेरणेनेच मार्गक्रमण करीत असतो. आपल्या देशाच्या या पवित्र मातीत त्या हुतात्म्यांच्या बलिदानी जीवनाचा सुगंध येतो. या भूमीचा कण अन् कण पवित्र आहे. या देशाला वैभव प्राप्त करुन दिलेले महापुरूषही याच मातीत खेळले, बागडले आणि मोठे झाले. आपल्या शरीरातील रक्त, त्वचा, हाडे सगळे काही याच मातीत पिकवलेल्या पवित्र अन्नातून तयार झाले आहे. आपल्याला प्राणवायूही याच मातीत उमललेल्या वनस्पतींमधूनच प्राप्त होतो. म्हणूनच तर कवींनी सुजलाम् सुफलाम् दुर्गा, सरस्वती, लक्ष्मी असा उल्लेख करीत या भूमीला वंदन केले आहे.

आखाड्यातील पहिलवान आजही हीच माती आपल्या अंगाला लावून स्वतःला पवित्र करतो. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी या भूमीचा कण कण शंकर असल्याचे म्हटले आहेच. १४० कोटी भारतीयांना जोडणारी अशी, ही आपली भारतमाता आहे. जगायचे या भारतमातेसाठी आणि मृत्यू पत्करायचा, तोही याच भारतमातेसाठी! हाच भाव देशवासीयांमध्ये जागृत करण्याचे काम या अभियानाने केले आहे. चला तर मग, आपण सगळ्यांनीही या अभियानात सहभागी होऊन आपल्या भारत देशाला विकसित बनवण्याचा संकल्प करुया.

शिवप्रकाश
(लेखक भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सहसंघटन महामंत्री आहेत.)
(अनुवाद : विजय कुलकर्णी)