‘भारत’ या नावाला मनोरंजन विश्वातून शंभर टक्के पाठिंबा

    06-Sep-2023
Total Views |
 
india vs bharat
 
 
मुंबई : देशात सध्या G-20 परिषद सुरू असून या परिषदेला उपस्थित राहणाऱ्या पाहुण्यांना जेवणाचे निमंत्रण राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आले होते. या निमंत्रणावर 'प्रेसिडेंट ऑफ भारत' असे लिहिल्यानंतर देशाचे नाव भारत की इंडिया असा नवा वाद सुरू झाला आहे. या प्रकरणात राजकारण्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सगळ्यांनीच समाज माध्यमावरुन आपली मतं नोंदवली. देशात घडणाऱ्या प्रत्येक घटनांवर व्यक्त होण्याचा अधिकार या देशातील नागरिकांना असल्यामुळे भारत आणि इंडिया या नावाच्या वादावर मनोरंजन विश्वातून कलाकारांनी देखील आपले मत मांडले आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, मनोज जोशी, जॅकी श्रॉफ यासोबतच अभिनेत्री कंगना राणावत हिने देखील समाज माध्यमावर भारत याच नावाला पाठिंबा दिला आहे.
 
अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवर ‘भारत माता की जय’ असे लिहित सुचकपणे भारत या नावाला पाठिंबा दिला आहे. तर, अभिनेते मनोज जोशी यांनी ट्विटरवर ‘भारत हमको जान से प्यारा है’, हे गाणे गात व्हिडिओ शेअर केला आहे. याव्यतिरिक्त अभिनेत्री कंगना राणावत हिने तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन एक जुनी पोस्ट पुन्हा शेअर केली आहे. ज्यात तिने लिहिले होते की, २०२१ मध्ये 'गुलाम नाम' इंडियाला रद्द करायला हवं. त्याऐवजी देशाला 'भारत' म्हणायला हवं. कंगनाने आता ही पोस्ट पुन्हा शेअर करत "आणि काही लोक याला काळी जादू म्हणताय... ही फक्त धूसर बाब आहे प्रिये... सर्वांचे अभिनंदन!! एक गुलाम नावापासून मुक्त झालो आहोत... जय भारत”,असे लिहिले आहे. तर मराठी कलाविश्वातून अभिनेते सुनील बर्वे आणि सुशांत शेलार यांनीही भारत या नावाला १०० टक्के पाठिंबा दिला आहे.
 
 
 
 
“राष्ट्रपती भवनाकडून निमंत्रण पत्रिकेवर इंडिया ऐवजी भारत हे नाव लिहिले आहे याचा आनंद आणि आदरच आहे. शिवाय मला व्यक्तिगतरित्या भारत या नावाविषयी एक वेगळीच आत्मियता आहे. त्यामुळे भारत याच नावाला पाठिंबा आहे”, असे अभिनेते सुनील बर्वे मुंबई तरुण भारतशी बोलताना म्हणाले. तर अभिनेता सुशांत शेलार म्हणाला की, “भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. हिच प्रतिज्ञा बालपणापासून आपण शिकलो आहोत आणि त्यातील बाबी आचरणात आणल्या आहेत. त्यामुळे देशाचे नाव हे इंडिया ऐवजी भारत असण्याला माझा पाठिंबा आहे”. त्यामुळे भारत या नावाला मनोरंजन विश्वातूनही पाठिंबा मिळत असून या देशाप्रती प्रत्येक सुजाण नागरिकांचे प्रेम हे दिसून येत आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.