जी-20 बैठकीसाठी दिल्ली सज्ज; भारत मंडपम असणार मुख्य आकर्षण

    06-Sep-2023
Total Views |
 Bharat-Mandapam
 
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन , ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासह जगभरातील ४० देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीत होणाऱ्या दोन दिवसीय जी-२० शिखर परिषदेला येणार आहेत. अतिथि देवो भव असं मानणाऱ्या भारतीय संस्कृतीला अनुसरून विदेशी पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्यासाठी दिल्ली सज्ज झाली आहे.
 
जगभरातील ४० देशांचे राष्ट्रप्रमुख एकाच वेळी भारतात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे तयारी ही ना भूतो ना भविष्यति अशाच प्रकारची करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारने केला आहे. ४० देशांचे राष्ट्रप्रमुख आणि त्यांच्या शिष्टमंडळासाठी दिल्लीतील ३६ पंचतारांकित हॉटेल बुक करण्यात आले आहेत. त्याचसोबत दिल्ली एनसीआरमधील १० पेक्षा जास्त पंचतारांकित हॉटेल जी-20 च्या बैठकीसाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहेत.
 
पाहुण्यांना हॉटेलमधून कार्यक्रमस्थळी नेण्यासाठी आलिशान गाड्या बुक करण्यात आल्यात. त्याचसोबत राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेच्या दृष्टीने २० पेक्षा जास्त बुलेटप्रुफ गाड्यांची बुकींग करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर दिल्लीच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात सजावटही करण्यात आली आहे.
 
एकाचवेळी एवढे सारे व्हीव्हीआयपी लोकं दिल्लीत येणार असल्यामुळे दिल्लीतील सुरक्षाव्यवस्थेचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे. देशभरातील तपास यंत्रणांची फौज दिल्लीवर नजर ठेवून आहे. त्याचबरोबर जी-२० च्या सुरक्षाव्यवस्थेसाठी ५० हजार सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर पाहुण्या देशांच्या तपास यंत्रणाही आपल्या राष्ट्रप्रमुखांच्या सुरक्षेसाठी दिल्लीत हजर असतील. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा पाहणाऱ्या सीक्रेट सर्व्हिसेसचे अधिकारी भारतात मागच्या तीन महिन्यांपासून तळ ठोकून आहेत.
 
ही झाली पाहुण्याच्या आदरातिथ्य आणि सुरक्षेची तयारी पण जी-२० बैठकीचे मुख्य आकर्षण असणार आहे, ते म्हणजे भारत मंडपम. खास जी-२० शिखर परिषदेसाठी तयार करण्यात आलेल्या भारत मंडपम या भारतील सर्वात मोठ्या कन्वेंशन सेंटरमध्ये मुख्य बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. भारत मंडपममध्ये एकावेळी १० हजार लोकांना सामावून घेण्याची क्षमता आहे.
 
भारत मंडपमला एकूण तीन मजले आहेत. प्रत्येक मजल्यावर भारतीय संस्कृतीची ओळख करुन देण्यासाठी अतिशय सुंदर सजावट करण्यात आलेली आहे. भारतीय परंपरा, विविधता, कला आणि बहुसांस्कृतिक वारसा याची अमिट छाप भारत मंडपमच्या प्रत्येक भिंतीवर कोरण्यात आली आहे.
 
जी-20 बैठकीला आलेल्या सर्व पाहुण्यांना सशक्त भारताचे नवे रुप दाखवण्याचा प्रयत्न भारताने केला आहे. यामध्ये भारत नक्कीच यशस्वी होईल.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.