काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार युवराज राहुल गांधी यांनी वर्षभरापूर्वी देशात ‘भारत जोडो’ यात्रेला प्रारंभ केला आणि चार हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून यात्रा समाप्त केली होती. या यात्रेच्या वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्र काँग्रेस आता राज्यात पदयात्रा काढणार असून, जनतेला संबोधित करणार आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एका बाजूला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, थोरात-चव्हाण द्वयी या नेत्यांना विभागनिहाय जबाबदार्या देऊन काँग्रेस महाराष्ट्रात प्रबोधन आणि जनजागृती करणार असल्याचे सांगण्यात आले. किमान यानिमित्ताने तरी काँग्रेसची नेतेमंडळी जनमानसात जाऊन काँग्रेस अस्तित्वात असल्याची जाणीव करून देतील, अशी अपेक्षा आहे. लोकांमध्ये जाऊन समर्थन प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणारी मंडळी आपापसात एकत्र नाहीत, हे वास्तव नाकारणे, काँग्रेससाठी अवघड आहे. खरं तर यापूर्वीही महाराष्ट्र काँग्रेसमधील दुही अनेकदा ठळकपणे अधोरेखित झाली आहे. नुकतीच मराठा आरक्षण प्रश्नावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यात पडलेली वादाची ठिणगी आणि दोघांनी खोडून काढलेल्या एकमेकांच्या भूमिका यामुळे काँग्रेसमध्ये फूट असल्याचे महाराष्ट्राने पाहिले. वडेट्टीवार विरोधी पक्षनेते झाल्यापासून नाना पटोले आणि विरोधी गँग त्यांच्या भूमिका चुकीच्या असल्याचे भासवण्याचा वारंवार प्रयत्न करीत आहेत. दुसरीकडे अशोक चव्हाण यांची काँग्रेस वर्किंग कमिटीमध्ये निवड झाल्यानंतर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिलेली प्रतिक्रिया बरंच काही सांगून गेली. वर्किंग कमिटीमध्ये माझी निवड न झाल्याचा माझ्या काही मित्रांना आनंद झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यातून थोरातांचे काँग्रेसमधील ‘ते मित्र’ कोण, हे अधिक स्पष्टपणे सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्र कॉँग्रेस अंतर्गत बंडाळीने त्रासलेली असताना पक्ष पदयात्रा काढून राज्य पिंजून काढण्याचे मनसुबे आखत आहे. देशाचा इतिहास पाहिला, तर अशाच प्रकारच्या यात्रांनी दूरगामी परिणाम नक्कीच केला. परंतु, महाराष्ट्रात काँग्रेसच्या या पदयात्रेला दुहीचे ग्रहण लागल्याने याचे भवितव्य काय असेल, हे वेगळे सांगायला नको.
राज्यात गेल्या ४० वर्षांपासून रखडलेल्या मराठा आरक्षण प्रश्नाला आता पुन्हा एकदा वाचा फुटली आणि योगायोग म्हणजे, या सरकारमध्येही देवेंद्र फडणवीस हेच सर्वात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. उपोषणाचं हत्यार उपसून ‘मराठ्यांचा नेता’ म्हणून पुढं येऊ पाहणार्या मंडळींना आरक्षण नेमकं कुठं रखडलं आहे, याची माहिती असेलच. विरोधकांकडून केल्या जाणार्या आरोपांत न जाता या आरक्षण विषयाचं घोडं नेमकं कुठं अडलंय, याची माहिती समोर येणं आवश्यक आहे. कायद्याने आखून दिलेली ५० टक्क्यांची मर्यादा आणि त्या मर्यादेच्या पुढे जाण्यासाठी कराव्या लागणार्या तरतुदी, एका समाजाला आरक्षण दिल्यानंतर इतर समाजाकडून केली जाणारी संभाव्य मागणी, ओबीसी कोट्यातून आरक्षण देणं शक्य आहे की नाही, याबाबतची सत्यता आणि वास्तविकता आणि या सगळ्यात मराठा समाजाची आरक्षणाची वास्तववादी मागणी, अशा गोंधळात मराठा आरक्षणाचा विषय अडकला आहे. या संपूर्ण कायदेशीर सामाजिक आणि राजकीय पेच प्रसंगांची इत्यंभूत माहिती सर्व नेतेमंडळींना आहेच. पण, निवडक मोठे नेते या पेचप्रसंगाचा गैरफायदा घेऊन समाजाला नेहमीप्रमाणे भ्रमित करताना दिसतात. मराठा आरक्षण हा केवळ एका जातीचा विषय राहिलेला नसून, या विषयामुळे इतर अनेक समाज आणि प्रवर्ग प्रभावित होऊ शकतात, अशी शक्यता अनेक कायदेपंडितांनी यापूर्वीच व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणासाठी लढा दिलेल्या अनेक नेत्यांनीही सध्याच्या आंदोलनावर, आंदोलनाच्या कार्यपद्धतीवर आणि आंदोलन हाताळणार्या नेत्यांबाबत नापसंती व्यक्त केली आहे. समाज मग तो कुठलाही असो, त्यातील बोटावर मोजता येईल इतकी मंडळी सोडली, तर इतर समाज फारसा प्रगत नसतो आणि त्याला कायदेशीर बाबींचे ज्ञानही नसते. मराठा समाजातील पापभिरू आणि हक्कासाठी पोटतिडकीने भांडणार्या निरपराधांना हाताशी धरून माथी भडकवण्याचे आणि उद्रेक घडवून आणण्याचे दुष्प्रकार आजवर झालेले आहेत. या सगळ्यांपासून बाजूला जाऊन जर मराठा समाजाला आरक्षण हवं असेल, तर साळसूदपणाचा आव आणून सांत्वन करणार्या मंडळींपासून दूर राहणे अन् गैरसमजातून बाहेर पडणे, हे समाजाच्या हिताचे ठरावे!