एक प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उत्तम गायक, अशी ओळख असणार्या प्रदिप कडू यांचा कलाप्रवास...
सरकारी फायलींच्या गराड्यात अडकलेल्या एका अधिकार्याला आपल्यातला गोड सूर गवसतो आणि त्या अधिकार्याचा एक गायक म्हणून प्रवास सुरू होतो. त्याच प्रदिप कडू यांच्या कर्तव्यदक्ष अधिकारी ते गायक अशा कलाप्रवासाची ही गोष्ट. प्रदिप गुलाबराव कडू यांचा जन्म मूळचा अमरावतीचा. त्यांचे प्राथमिक शिक्षण अमरावतीतील सरकारी शाळेत झाले. त्यानंतर माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी श्रीसमर्थ हायस्कूलमधून केले. त्यानंतर त्यांनी शिवाजी कृषी महाविद्यालयातून कृषी विषयात पदवीचे शिक्षण घेतले. तसेच, ‘डेअरी सायन्स’मधून त्यांनी पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्याचबरोबर त्यांनी ‘एलएलबी’चे शिक्षणही घेतले आहे.
मुळात प्रदिप कडू यांच्या कुटुंबात कोणीही गायन कलेशी संबंधित नाही. प्रदिप कडू यांनाही शालेय जीवनात संगीताची फारशी आवड नव्हती. परंतु, शाळेच्या स्नेहसंमेलनात ते आवर्जून गाणं गात. त्यानंतर महाविद्यालयीन जीवनात ‘युवा महोत्सवा’सारख्या अनेक स्पर्धांमध्ये ते सहभागी होऊ लागले आणि तिथे त्यांना आपल्यातील गायन कलेची खरी ओळख झाली. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षं प्राध्यापक म्हणूनदेखील त्यांनी काम केले. मग त्यानंतर कडू हे शासकीय सेवेत पोलीस उपनिरीक्षक म्हणून १९८९ साली रुजू झाले. पण, त्यावेळी पोलीस प्रशिक्षणादरम्यान एका शिक्षकाच्या प्रोत्साहनमुळे कडू यांनी गझल गायनालाही सुरुवात केली.
त्यावेळी प्रदिप कडू हे ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या स्पर्धा परीक्षांचीही तयारी करीत होते आणि त्यांच्या मेहनतीचे फळ म्हणून १९९३ विक्रीकर विभागात, विक्रीकर अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर २०२१ साली प्रदिप कडू हे सहआयुक्त म्हणून निवृत्त झाले. पण, त्यानंतरही त्यांचा प्रवास थांबला नाही. राज्य शासनाची उत्कृष्ट सेवा बजावल्यामुळे सेवानिवृत्तीनंतर महाराष्ट्र शासनाद्वारे सदस्य, महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण, या पदावर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
दरम्यानच्या काळात विक्रीकर विभागात कार्यरत असताना प्रदिप कडू यांनी वांद्रेस्थित शारदा संगीत विद्यालयातून पंडित यशवंत देव यांच्याकडे शब्दप्रधान गायकीचे धडे घेतले. दरम्यान उस्ताद मोहम्मद ताहेर खाँ साब यांच्याकडून प्रदिप यांनी हिंदी, उर्दू गझलांच्या गायनाचे प्रशिक्षणही घेतले आणि त्यानंतर कडू वैयक्तिकरित्या गझलांच्या मैफिली करायला लागले. दरम्यान ’गुझिश्ता’, ’या रब’ यांसारख्या त्यांच्या गझला ‘टी-सीरिज’ने प्रसिद्ध केल्या आहेत. तसेच, संतोष परब यांच्यासह सीमावर्ती भागात सैनिकांच्या मनोरंजनासाठी कडू गायनाचे कार्यक्रम करतात. त्याचबरोबर देशविदेशात गझल गायनाच्या मैफिलींमध्ये प्रदिप सहभाग घेतात.
मुळात कडू यांचं गाणं हे आर्थिक मिळकतीसाठी नसून, आवड म्हणून जोपासलेली कला आहे. त्यामुळे आजही कडू आपल्याला जे मानधन मिळतं, ते आपल्या सहकार्यांमध्ये वाटून टाकतात. ‘कोविड‘ काळात गायन कलेतील कडू यांच्या साथीदारांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. त्यावेळी त्यांनी ऑनलाईन कार्यक्रमातून मिळणारे मानधन थेट आपल्या सहकारी कलाकारांच्या खात्यात जमा करायला आयोजकांना सांगितले आणि संवेदनशील कलाकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली. या वाटचालीदरम्यान त्यांना प्रथितयश संगीतकार मिलिंद जोशी तसेच मनीषा जोशी पवार मार्गदर्शक म्हणून लाभले.
तसेच, मिलिंद जोशींनी ’देहाचे देऊळ’ या मराठी गीताच्या अल्बमसाठी कडू यांना गायनाची संधी दिली. त्याचबरोबर मुंबईमध्ये दरवर्षी होणार्या ‘लोकरंग महोत्सव’, ‘मुंबई महोत्सव’, ‘जाणीव मुंबई’ यांसारख्या कार्यक्रमात कडू गायक म्हणून हिरीरीने सहभागी होतात. प्रदिप कडू आजही वयाच्या ६०व्या वर्षी नियमित शारीरिक व्यायाम तसेच गायनाच्या सरावाला वेळ देतात. गायन कला आणि प्रशासकीय अनुभवाव्यतिरिक्त प्रदिप कडू हे मॅरेथॉन धावपटू म्हणून लोकांना परिचयाचे आहेत. देशातील व परदेशातील ६० पेक्षा जास्त मॅरेथॉन कडू यांनी पूर्ण केल्या आहेत. तसेच, दक्षिण आफ्रिकेतील ९० किमीची ’कॉम्रेड्स अल्ट्रामॅरेथॉन’ ही कडू यांनी तीनवेळा सहभाग घेऊन पूर्ण केली. दरम्यान, २०१९ मध्ये थॅलेसेमिक आजाराने बाधित असणार्या मुलांसाठी काम करणार्या ‘थिंक फाऊंडेशन’च्या मदतीकरिता प्रदिप यांनी दीड लाख रुपये ‘मॅरेथॉन’ स्पर्धेद्वारे उभारली आणि सामाजिक बांधिलकी जपली.
प्रदिप कडू सांगतात की, “धावपटू असल्यामुळे माझ्या कार्यालयीन कामाला गती प्राप्त झाली, तर गायनामुळे मानसिक आरोग्य सुदृढ झाले.“ त्यामुळेच कडू ज्या विभागात काम करतात, तिथे प्रत्येक जण त्यांना उत्तम गायक, धावपटू आणि सामाजिक बांधिलकी जपणारा प्रशासकीय अधिकारी म्हणून ओळखतात. त्यामुळेच निवृत्तीनंतर गावाकडील शेतीत नवनवीन प्रयोग करण्याची आणि प्रशासकीय सेवेतील संगीताची आवड असणार्या अधिकार्यांना मार्गदर्शन देण्याचा त्यांचा मानस आहे. तरी पुढील वाटचालीसाठी प्रदिप कडू यांना ’दै. मुंबई तरुण भारत’कडून शुभेच्छा!