मुंबई (विशेष प्रतिनिधी): ‘सिल्व्हर पापलेट’ हा मासा महाराष्ट्राचा ‘राज्यमासा’ म्हणुन घोषित करण्यात आला आहे. सिल्व्हर पापलेटला यापुढे महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणुन ओळखल जावं अशी घोषणा राज्याचे वन, सांस्कृतीक व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राष्ट्रीय परिषदेत केला.
मुंबईतील मस्त्यपालन, पशुपालन तथा डेयरी क्षेत्रातील किसान क्रेडिट कार्ड या विषयासंदर्भातील राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. ऑगस्टच्या मध्यावर मच्छीमारांनी सिल्व्हर पापलेट हा मासा राज्य मासा म्हणुन घोषित केला जावा अशी मागणी केली होती. जेणेकरुन त्याचे महत्त्व लक्षात घेऊन संवर्धनाच्या कामात हातभार लागेल. या प्रतिक्षित घोषणेमुळे कोळी बांधव आणि मत्स्य व्यावसायीकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
सिल्व्हर पापलेट महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा का आहे?
मत्स्य प्रेमींसाठी चवीला अत्यंत आवडीचा असणारा हा मासा आहे. तसेच या माशामध्ये प्रथिने ही मोठ्या प्रमाणात असतात. प्रामुख्याने पश्चिम किनाऱ्यालगत महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर आढळणाऱ्या या माशांच्या चालणाऱ्या व्यवसायातुन अनेक मच्छीमारांचा उदरनिर्वाह चालतो. हा मासा उत्पन्नाचा मोठा स्त्रोत असल्यामुळे अनेक कोळीबांधवांचे आर्थिक गणित त्यावर अवलंबुन आहे.
त्याचबरोबर, सिल्व्हर पापलेटची मोठ्या प्रमाणावर निर्यात केली जाते. यातुन देशाला मोठा आर्थिक फायदाही होतो. असं असलं तरी, मागणी प्रचंड असल्यामुळे या माशाची मोठ्या प्रमाणावर मच्छीमारीही केली जाते. लहान असलेली पिल्ले किंवा गाभोळी असलेल्या मादी पापलेटं पकडल्यामुळे त्यांची नवीन पिढी निर्माण होत नाही. त्यामुळेच त्यांच्या संख्येत आता मोठी घट झाली आहे. यातुन त्याचे संवर्धन व्हावे यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. त्यामुळेच सिल्वर पापलेट हा मासा महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे.