कराडमध्ये बिबट्या आणि दोन बछड्यांचे पुनर्मिलन

04 Sep 2023 21:17:12



leopard reunion

मुंबई (विशेष प्रतिनिधी): कराडमध्ये जखिणवाडी येथे बिबट्या आणि तिच्या दोन बछड्यांचे यशस्वी पुनर्मिलन वनविभाग आणि पुणे रेस्क्यू यांनी घडवुन आणले. रविवार दि. ३ सप्टेंबर रोजी ही मोहिम राबविली गेली असुन रात्री एक वाजता बिबट्या येऊन आपल्या पिल्लांना यशस्वीपणे घेऊन गेली.

जखिणवाडी येथील मेंढवडा- धनगरवाडा परिसरातील विहिरीत बिबट्याचे दोन बछडे शनिवार दि. २ सप्टेंबर रोजी पडल्याचे लक्षात आले होते. विहिरीचे मालक सुखदेव येडगे आणि स्थानिक ग्रामस्थांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने वनविभागाला कळवले. विहिरीत पडलेल्या या बछड्यांची जीव वाचविण्यासाठी धडपड सुरू असतानाच वनविभागाने विहिरीत पिंजरा टाकुन या बछड्यांना सुखरुप बाहेर काढले. यामध्ये एक मादी तर एक नर बछडा आहे. ही बचाव मोहीम यशस्वी झाल्यानंतर बछड्यांची वैद्यकीय तपासणी झाली.

बछडे सुखरूप असल्याची खात्री होताच मादी बिबटसोबत पुनर्मिलन करण्यासाठी प्रयत्न सुरू करत मोहीम राबविली. पिल्लांना एका विशिष्ट पिंजऱ्यात ठेवण्यात आले होते आणि त्याचे दार पूलीच्या सहाय्याने लांब बांधून ठेवण्यात आले होते. पिंजऱ्यापासून पुली ओढणारे १५० फूट लांब अंतरावर आणि २० फूट उंचावर होते. पिंजऱ्याशेजारी हालचाल टिपण्यासाठी लावण्यात आलेल्या विशिष्ट कॅमेऱ्यांमध्ये हालचाल दिसताच पुलीच्या सहाय्याने पिंजऱ्याचे दार उघडुन पिल्लांना मादी जवळ मुक्त करण्यात आले. रविवार दि. ३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री एक वाजता बिबट मादी येऊन आपल्या पिल्लांना घेऊन गेली.

या रेस्क्यू मोहिमेत कराड वनविभागाचे वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे, मलकापूर वनपाल आनंदा जगताप, वनरक्षक कैलास सानप, सचिन खंडागळे, अरविंद जाधव, वाहन चालक योगेश बेडेकर, वनसेवक भरत पवार, अमोल माने, धनाजी गावडे, हनुमंत मिठारे, भाऊसो नलवडे, शशिकांत जाधव, प्राणीमित्र अजय महाडीक, उदित कांबळे, रोहीत कुलकर्णी, गणेश काळे तसेच रेस्क्यू पुणेचे हर्षद, एजाज आणि पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ज्योती यांनी सहभाग घेतला होता.

“सामान्यतः, अशा परिस्थितीत पुनर्मिलन करण्याचा प्रयत्न करताना, बछडे सहसा एका टोपलीत ठेवले जातात ज्यामध्ये ते स्वतःहून बाहेर पडू शकत नाहीत, परंतु आई त्यांना सहजपणे घेऊन जाऊ शकते. परंतु, या प्रसंगी पिल्लं वयाने मोठी असल्याने ते शक्य नव्हतं. त्यामुळे हे पुनर्मिलन थोडे वेगळे होते. पण ते यशस्वी झाले याचा आनंद आहे”

- हर्षद नागरे, पुणे रेस्क्यू टीम 



Powered By Sangraha 9.0