उद्या सोमवार, दि. २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती. तसेच स्वामी विवेकानंदांच्या शिकागो येथील सर्वधर्म परिषदेतील ऐतिहासिक भाषणालाही नुकतीच १२५ वर्षं पूर्ण झाली. त्यानिमित्ताने महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारसाधर्म्याचे चिंतन करणारा हा लेख...
आपण नुकताच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला. हे साजरीकरण चालू असतानाच, स्वामी विवेकानंदांच्या विचारांची कास धरून आजही राष्ट्रीय, सामाजिक, आध्यात्मिक अशा वैविध्यपूर्ण पातळ्यांवर अव्याहतपणे कार्यरत असलेल्या ‘विवेकानंद केंद्रा’ने सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्ताने भारताच्या इतिहासाची पाने चाळली असता, असे लक्षात येते की, या आपल्या भारत देशात १९व्या शतकात अनेक थोर विचारवंत, तत्त्वज्ञ, शास्त्रज्ञ तर होऊन गेलेच. खेरीज, त्या काळात असलेल्या इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त करण्यासाठी अनेक थोर क्रांतिकारक या भारतभूवर अवतरले. त्यांनी त्यावेळच्या पिचलेल्या, गांजलेल्या परिणामतः निष्प्रभ, निष्क्रिय, किंकर्तव्यमूढ बनलेल्या अशा समाजातील जनमानसात स्फुल्लिंग चेतविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले. म्हणजेच आपल्या हिंदू धर्मीयांचा धर्मग्रंथ असलेल्या श्रीमद्भगवद्गीतेतील चौथ्या अध्यायातील
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ ४.७
परित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥
अर्थात, हे भारता! जेव्हा-जेव्हा धर्माचा र्हास होतो आणि अधर्माची वाढ होते, तेव्हा-तेव्हा मी आपले रूप रचतो म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करणार्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी युगायुगात प्रगट होतो. या श्लोकांतून व्यक्त होणार्या अर्थाची प्रचिती आपल्या भारत देशाने घेतलेली आहे. मग ते लोकमान्य टिळक, आगरकर, स्वामी विवेकानंद, सावरकर, महात्मा गांधी अशी अनेक नावे उदाहरणादाखल आपणास घेतां येतील.
या सर्व क्रांतिकारकांचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असे की, प्रत्येकाचे स्वातंत्र्यप्राप्तीचे मार्ग, तत्संबंधीची प्रत्येकाची मते, अभिव्यक्ती जरी वेगवेगळी होती असली, तरीदेखील प्रत्येक क्रांतिकारकाला आपल्या देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीच्या विचाराने, ध्येयाने झपाटून टाकलेले होते. आता वर वर्णन केलेल्या क्रांतिकारकांपैकी आपण सर्वप्रथम स्वामी विवेकानंदांचे विचार पाहणार आहोत. त्यानंतर दि. २ ऑक्टोबरला असलेल्या गांधी जयंतीचे औचित्य साधून महात्मा गांधीजींची विचारसरणी संक्षिप्त स्वरुपात मांडून स्वामी विवेकानंद आणि महात्मा गांधी यांच्यात काय वैचारिक साधर्म्य याकडे वळणार आहोत.
सर्वप्रथम आपण स्वामीजींचे विचार काय होते, हे अभ्यासणार आहोत. स्वामीजी म्हणतात की, “आपण ज्या हिंदुस्थानात राहतो, त्या तुमच्या-माझ्या हिंदुस्थानातील हिंदू धर्मावर अनेक धर्मांतील, जातीतील लोकांनी आक्रमणे केली खरी, तरीदेखील, हा धर्म केवळ टिकून आहे. एवढेच नव्हे, तर सर्व नद्यांचे पाणी ज्याप्रमाणे सागराला जाऊन मिळते, त्याचप्रमाणे सार्या धर्मांचे उगमस्थान वेगवेगळे असले तरी ते हिंदू धर्माला येऊन मिळाले आहेत. एवढेच नव्हे, तर हिंदू धर्माने सर्वांना सामावून घेतले आहे. यातूनच हिंदू धर्माची सहिष्णूता दिसून येते.” परंतु, आजच्या काळात स्वतःच्या पंथाचा केवळ अभिमान बाळगून इतरांना तुच्छ लेखणे असो का, स्वतःचे मतच तेवढे खरे, असे मानणे असो, अशा अनेक प्रकारांमुळे आपसात होणारी भांडणे इतकी विकोपाला जातात की, त्यामुळे संस्कृतीचा र्हास होणे, तर सोडाच पण राष्ट्राराष्ट्रांमध्ये देखील भयंकर अस्वस्थता निर्माण झाली आहे. याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, माणसाची बनलेली कूपमंडूक वृत्ती.
विहिरीत राहणार्या बेडकाला ज्याप्रमाण विहिरीपुरतेच जग सीमित वाटते, त्याचप्रमाणे प्रत्येक धर्मातील माणसाला मी आणि माझा धर्मच तेवढा खरा, असे वाटू लागले आहे, ही खूप खेदजनक गोष्ट आहे. परंतु, येथे एक गोष्ट ध्यानात घेणे गरजेचे आहे की, गुरुत्वाकर्षण हे पूर्वीपासून होतेच, फक्त ते नियमांच्या भाषेत शब्दबद्ध केले गेले नव्हते; तसेच दोन माणसे जरी दिसायला वेगळी असली, तरीदेखील त्यांच्या ठायी वास करणारा आत्मा हा एकच आहे, हे आपण पाहिले. या आत्म्याचे आणखीन एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असे की, तो फक्त माणसाच्या मृत्यूनंतर रंगभूमीवरच्या कलाकाराने ज्याप्रमाणे वस्त्र बदलून रंगभूमीवर प्रवेश करावा, त्याप्रमाणे तो एका देहातून दुसर्या देहात प्रविष्ट होतो अन् त्यालाच आपण नाव देतो पुनर्जन्म!
श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसर्या अध्यायातील २२व्या श्लोकात (वासांसि जीर्णानी... नवानि देही) यासंबंधीचे वर्णन आले आहे. त्यामुळे आत्मा अविनाशी आहे. हे चिरंतन सत्य आहे. पण, मग प्रश्न असा उपस्थित होतो की, काम-क्रोध लोभ-मद-मोह मत्सर या षड्रिपूयुक्त अशा, या ‘मी’ मध्येच हा आत्मा बद्ध कसा होऊन जातो? अन् मी माझे या शब्दात अडकून जाताना मी व माझा देव या शब्दांना जागाच न उरता मी, माझे, मला एवढ्यापुरतेच त्याचे विश्व सीमित का व्हावे? परंतु, खरं सांगायचं तर आपण ज्या इंद्रियांच्या अधीन होऊन काम-क्रोधादी विकारांच्या विळख्यात बद्ध होऊन होतो, त्या इंद्रियांच्याही पलीकडे जाऊन या देहात चैतन्य जागृत ठेवणार्या शक्तीस शरण गेल्यास आपल्या जन्माचे खर्या अर्थाने सार्थक झाले, असे म्हणता येईल आणि मी, माझा धर्म, माझा पंथ तेवढेच खरे! अशी कूपमंडूक वृत्ती न राहता ‘ईशावास्यम् इदं सर्वम्’ अशी वृत्ती मनात वास करू लागेल. आपले वेद, उपनिषद आपणास सातत्याने हाच संदेश देत आली आहेत. तेव्हा गरीब-श्रीमंत, उच्च-नीच, जात धर्म यात कोणताही भेद न करता सर्वांठायी वसणारा आत्मा तर एकच आहे, हे भान मनात सातत्याने जागते ठेवले, तर तुमच्या-माझ्या ठायी काम क्रोधादी षड्रिपूंच्या माध्यमातून वास करणारा अहं गळून पडण्यास मदत होईल.
‘जितकी मते तितके मार्ग’ यानुसार, कोणी मूर्तिपूजेला महत्त्व देईल, तर कोणी बाह्य पूजेला! परंतु, ईश्वरप्राप्ती हेच जर आपण आपले ध्येय मानले, त्या साध्याच्या दिशेने पाऊल टाकावयास सुरुवात केली, तर विविधतेतून एकता या प्रकृतीच्या नियमानुसार आपण ते साध्य निश्चित गाठू शकतो. मात्र, त्यासाठी यापूर्वी वर्णन केल्याप्रमाणे आचरण करणे गरजेचे आहे. तसे आचरण करू लागल्यावर ‘मी’ तर गळून पडेलच. परंतु, आपल्या आचरणातून सहजतेने विश्वबंधुत्वाची कल्पना साकारू लागेल. एवढेच काय पण, आपण आपल्या मनातला ‘विश्वबंधुत्व’ हा शब्द, त्याचा अर्थ वगैरेसुद्धा गळून पडेल आणि-
हे विश्वचि माझे घर।
ऐसी मती ज्याची स्थिर।
किंबहुना चराचर आपण जाहला॥
अशी अनुभूती आपणास येऊ लागेल. असे सारे स्वामी विवेकानंदांचे विचार आपण अभ्यासले की, त्या कार्याचे स्वरूप किती व्यापक होते, हे आपल्या ध्यानात येईल.
आता आपण महात्मा गांधीजींची विचारसरणी जाणून घेणार आहोत. त्याचबरोबरीने स्वामीजींची व म. गांधीजींची वैचारिक बैठक मिळती-जुळती होती का? त्यात काही साधर्म्य होते का? असल्यास काय वैचारिक साधर्म्य होते, आहे? याबाबत आपण विचारविमर्श करणार आहोत. गांधीजींच्या विचारसरणीबाबत थोडक्यात सांगायचे झाले, तर श्रीमद्भगवद्गीतेतील १६व्या अध्यायातील दुसरा श्लोक येथे उद्धृत करणे अत्यंत गरजेचे आहे, असे मला वाटते.
अहिंसा सत्यमक्रोधस्त्याग: शान्तिरपैशुनम्
दया भूतेष्वलोलुप्त्वं मार्दवं ह्रीरचापलम्॥ १६.२
अर्थात, काया-वाचा मनाने कोणालाही कोणत्याही प्रकारे न दुखवणे, यथार्थ व प्रिय भाषण, आपल्यावर अपकार करणार्यावरही न रागावणे, कर्माच्या ठिकाणी कर्तेपणाच्या अभिमानाचा त्याग, अंतःकरणात चंचलता नसणे, कोणाचीही निंदा न करणे, निर्हेतुक दया, इंद्रियांचा विषयांशी संयोग झाला, तरी त्याविषयी आसक्ती न वाटणे, कोमलता अशा प्रकारे या श्लोकातून वर्णन केलेल्या सर्व गुणांचा समुच्चय गांधीजींमध्ये झालेला आपणास दिसून येतो. आता आपण स्वामी विवेकानंद यांच्या विचारपथावरील महात्मा गांधी आणि महात्मा गांधी हा माझा असलेला लेखनाचा विषय लक्षात घेता, या दोन्ही क्रांतिकारकांतील वैचारिक साधर्म्य शोधण्याचा प्रयत्न, मी माझ्यापरिने करीत आहे.
स्वामीजी (स्वामी विवेकानंद) व गांधीजी दोघांचे वैचारिक साधर्म्य शोधताना चरित्रात्मक माहिती जाणून घेऊ लागलो असता एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य जाणवते, ते म्हणजे स्वामीजींचा जन्म १८६३ सालचा, तर म. गांधीजींचा जन्म १८६९ सालचा. म्हणजेच स्वामीजी व म. गांधी दोघांच्यात अवघे सहा वर्षांचे असलेले अंतर लक्षात घेता दोघे समवयस्कच म्हणावे लागतील. स्वामीजी व गांधीजी या दोघांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक समान धागा, महत्त्वपूर्ण पैलू म्हणजे निर्भयता. स्वामीजी नेहमी जनतेला भयरहित जीवन जगण्याचा संदेश देत असत, तर गांधीजी सर्व जनतेला निर्भय बनण्याचा संदेश देत असतानाच निर्भय, भयरहित जीवनाचा अनुभव घेण्यासाठी सर्वप्रथम आत्मविश्वास व ईशविश्वासाची जोड असणे, अशा ठाम मताचे होते.
यापूर्वी आपण स्वामीजींचे विचार समजून घेतले, त्यात स्वामीजींनी सांगितलेच आहे की, सर्वसामान्य माणूस ‘मी, माझे, मला’ या शब्द जंजाळात सापडून, इंद्रियांच्या अधीन होऊन काम, क्रोधादी विकारांच्या विळख्यात बद्ध होतो. पण, या देहात चैतन्य जागृत ठेवणार्या शक्तीस शरण गेल्यास आपल्या जन्माचे सार्थक होईल, तर गांधीजींनी अंगीकारलेल्या अहिंसेच्या तत्त्वातूऩ त्यांना हाच संदेश आपणास द्यावयाचा होता. सर्वसामान्य माणूस काम, क्रोधादी विकारांच्या विळख्यात बद्ध झाला की, त्याच्या हातून कायिक, वाचिक, मानसिक हिंसेचे पातक घडण्याची दाट शक्यता असते. तेव्हा अहिंसा आपल्याला अंगी बाणवायची असेल, तर स्वामीजींनी सांगितल्यानुसार ‘मी, माझे, मला’ या शब्द जंजाळातून बाहेर पडून ईश्वरास शरण गेल्याशिवाय अहिंसेच्या मार्गाचे अनुसरण करता येणे अशक्यप्राय आहे. तेव्हा स्वामीजींनी सांगितलेलाच हा विचार गांधीजींनी वेगळ्या प्रकारे ‘अहिंसा’ हा शब्दप्रयोग वापरून सांगितलेला दिसतो.
स्वामीजींचे विचार अभ्यासताना एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येते, ती म्हणजे माणसाची जात-धर्म, भाषा-पंथ असा भेदभाव करून केवळ आपल्यापुरते बघणारी कूपमंडूक वृत्ती स्वामीजींना अजिबात मान्य नव्हती, तर गांधीजींनादेखील काळा-गोरा, स्पृश्य-अस्पृश्य असा कोणताही भेदभाव मान्य नव्हता. स्वामीजींचा (Arise, Awake And Stop Not Still The Goal Is Reached) हा संदेश सर्वश्रुत आहेच. या संदेशातून लोकांना कार्यप्रवण बनवत असतानाच, त्यातून त्यांनी ईशावास्य उपनिषदांत ‘तेन त्यक्तेन भुञ्जीथाः’मधून वर्णिलेले त्यागाचे महत्त्वही विशद केलेले आहे.
गांधीजींनी ‘आराम हराम हैं!’ सांगून लोकांना श्रमाचे महत्त्व सांगतानाच श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसर्या अध्यायातील ४७व्या श्लोकात वर्णिल्याप्रमाणे ‘कर्मण्येवाधिकारस्ते... कदाचन।२.४७॥’ या श्लोकानुसार फलाची अपेक्षा न करता इतरांच्या कल्याणाकरिता केलेले कर्म म्हणजे यज्ञ, असे सांगून श्रम व त्यागाचे महत्त्व सांगितले.
स्वामीजींनी मनात साकारलेली विश्वबंधुत्वाची कल्पना वेगळ्या प्रकारे गांधीजींच्या सर्वोदय चळवळीतून साकारलेली दिसते. ‘सर्वेत्र: सुखिन:सन्तु।’ यानुसार सर्व जगाचं भलं व्हावं, अशी गांधीजींची मनोमन इच्छा होती. स्वामीजींचे कार्य, त्यांचे विचार अभ्यासताना एक गोष्ट आवर्जून लक्षात आल्याखेरीज राहत नाही, ती म्हणजे ते संपूर्ण देशभर पायी हिंडले आणि आपल्या देशाची सामाजिक परिस्थिती, जनतेची मानसिकता या व अशा गोष्टींचे बारकाईने निरीक्षण केले.गांधीजींनीदेखील आपल्या देशाची परिस्थिती काय आहे, हे जाणून घेण्यासाठी त्यांनी संपूर्ण पदयात्रा केली.
आतापर्यंत मी आपणांस माझ्यापरिने स्वामी विवेकानंद आणि गांधीजी यांच्यातील वैचारिक साधर्म्य उलगडण्याचा थोडक्यात प्रयत्न केला. इति लेखनसीमा.
८९९९७०३७५७
प्रांजली कुलकर्णी