नौपाड्यात महानगर गॅसच्या खंडित गॅस पुरवठ्याने नागरिक त्रस्त

03 Sep 2023 20:03:54
Mahanagar Gas Piped Gas Supply fragmented

ठाणे :
ठाणे पश्चिमेकडील नौपाडा येथील भास्कर कॉलनी ते ब्राह्मण सोसायटी परिसरात महानगर गॅसची सेवा ढेपाळली असुन नागरीक त्रस्त झाले आहेत. शनिवारी दुपारपासुन महानगर पाईप गॅसची सेवा खंडीत झाल्याच्या तक्रारी करूनही महानगर गॅसकडून तंत्रज्ञ पाठवण्यात टोलवाटोलवी करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला.यासंदर्भात महानगर गॅसशी संपर्क साधला असता मोबाईल नंबर बंद आढळला.

ठाण्यातील नौपाडा परिसरातील भास्कर कॉलनी ते ब्राम्हण सोसायटी परिसरात शनिवारी काही कारणाने कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक गॅस पुरवठा खंडित करण्यात आला. सायंकाळी साडेसहा नंतर काही ठिकाणी सेवा सुरळीत झाली.मात्र, अनेक ठिकाणी सेवा पूर्ववत करण्यात महानगर गॅसला अपयश आल्याचे नागरिकांनी सांगितले. गॅस पुरवठा अचानक खंडीत झाल्याने परिसरातील नागरिक वारंवार चौकशी करत होते. मात्र लवकरच होईल, टेक्निशियन येईल अशी टोलवाटोलवीची उत्तरे दिली जात असल्याने महानगर गॅसच्या कारभारावर नागरिकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

दरम्यान, महानगर गॅसच्या नियमानुसार टेक्निशियनचे नाव, नंबर ग्राहकांना दिले जात नाहीत. गॅस कनेक्शन घेण्यासाठी ग्राहकांचा सर्व तपशील घेणारी कंपनी टेक्निशियनचे मात्र नाव देखील देत नसल्याने नागरिकांनी नाराजी दर्शवली आहे.

सार्वजनिक पुरवठा सेवेत एखादी तांत्रिक अडचण येणार, अचानक काही उद्भवणार हे स्वाभाविक आहे. पण त्यानंतर सेवा पूर्ववत करण्याबाबत कळवणे हे महत्वाचे आहे. अशी सेवा जेंव्हा खंडित होते त्यावेळी जिथे बिघाड नाही अशा प्रत्येक ठिकाणी टेक्निशियनने जाऊन रिसेट (re-set) करावे लागते. त्याशिवाय गॅस पुरवठा सुरू होत नाही. जो निळा बॉक्स लावलेला आहे तो उघडून टेक्निशियन ते करतो. यासाठी देखील महानगर गॅसकडे ग्राहकांनाच पाठपुरावा करावा लागतो.
- एक त्रस्त ग्राहक


Powered By Sangraha 9.0