क्रीडा(क्षेत्रातील)दिन!

    03-Sep-2023
Total Views |
Article On Indian Sports Persons Achievements

भारताचा राष्ट्रीय क्रीडा दिन, विविध देशांतले क्रीडा दिन, आपल्या पारंपरिक प्रतिस्पर्ध्याशी झालेले सामने, अशा क्रीडा क्षेत्रातील ऑगस्ट २०२३ अखेर व सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातल्या घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणारा, हा माहितीपूर्ण लेख...

२०२३ ऑगस्टचा महिना भारताच्या दृष्टीने खूप लक्षणीय होता. त्यातही दुसरा पंधरवडा तर भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी विशेष संस्मरणीय अनुभव देऊन गेला. नीरज चोप्रा आणि सहकारी यांच्या सारख्यांचे मैदानी खेळ, प्रज्ञानंद सारख्यांचे (बैठे) बुद्धीबळातले डाव, एच. एस. प्रणोय आणि सहकार्‍यांचे बॅडमिंटन, अशा एक ना अनेक क्रीडा प्रकारांत भारत आपली चमकदार कामगिरी दाखवत आहे. या चालू दशकातच आपण बघता-बघता अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलियन, चीन यांसारख्या क्रीडा क्षेत्रातील प्रभावी शक्ती केंद्रांच्या यादीत बसलेलो दिसायला लागू. आपले खेळाडूं झपाट्याने प्रथम तिघांंमध्ये येत आहेत.

वर्षभर जागोजागी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध क्रीडा प्रकारांत स्पर्धांचे आयोजन केले जात असते. त्यात विविध देशांत विविध क्रीडा दिवस साजरे केले जात असतात. तसाच आपणही मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी म्हणजेच दि. २९ ऑगस्टला मोठ्या उत्साहात तो साजरा केला. तसे म्हटले तर ध्यानचंद आणि हॉकी हे अतुट नातं असले, तरी आपण फक्त हॉकी या क्रीडा प्रकाराकडे न बघता एकूणच सगळ्याच क्रीडा प्रकारांचा विचार करत ते प्रोत्साहित करीत त्यातील अर्ध्वयुंसमवेतच आजपर्यंतच्या सगळ्याच क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींची दखल घेत त्यांचा आदरयुक्त सन्मान राखत असतो. त्यांना पुरस्कृत करीत असतो.

महाराष्ट्र सरकार ‘छत्रपती क्रीडा पुरस्कार’ देत असते. त्यात यावर्षीच्या यादीत ऐनवेळेस काही नावांचा समावेश करणे भाग पडले होते. काहींवर सरकारकडून अन्याय झाल्याने, त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरील न्यायालयाच्या आदेशावरून त्यातील काहींची नावे नंतर समाविष्ट करण्यात आली होती. क्रीडा दिनाच्या पूर्वसंध्येला त्याचे वितरण करण्याचा सोहळा पुण्यात पार पडला होता. त्याप्रसंगी मुख्यमंत्र्यांनी त्या पुरस्कारांच्या रकमेत दुपटीने वाढ करण्यात येत असल्याचे घोषित केले. त्यापाठोपाठ देशाचे आणि वैयक्तिक प्रकारातीलही असलेले पहिले ‘ऑलिम्पिक’ पदक विजेते खाशाबा जाधव यांचा १५ जानेवारी हा जन्मदिवस ’राज्य क्रीडा दिन‘ म्हणून साजरा केला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. भारतातील विविध राज्यांमध्येही ‘राष्ट्रीय क्रीडा दिनां’सारखेच ‘राज्य क्रीडा दिन’ साजरे होत असतात. दि. २९ ऑगस्ट हा ‘राष्ट्रीय क्रीडा दिन‘ म्हणून साजरा केला जात असतानाच राज्य पातळीवरील, या एका दिनाची भर पडत आहे. क्रीडा विश्वात सरकारकडून देण्यात येत असलेले प्रोत्साहन सगळ्या क्रीडाप्रेमींना समाधानकारक वाटत आहे.

भारत जसा विविधतेने नटलेला आहे. तसाच तो विविध क्रीडा प्रकारांच्या परंपरेचा अभिमानही बाळगत असतो. आपण जसा क्रीडा दिन भारतात साजरा करतो. तसा तो अन्य देशात कसा साजरा होतो, याचा थोडक्यात आढावा आपण आता घेऊ. देशोदेशीचे निवडक ‘क्रीडा दिन’ ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ हा विविध देशांमध्ये क्रीडा संघांचा आणि त्या देशांच्या क्रीडा परंपरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जात असतो. अनेक देशांत त्यासाठी सार्वजनिक सुट्टीचा दिवस म्हणूनही घोषित करण्यात येते. या दिवशी विविध वयोगटातील लोक खेळांमध्ये भाग घेतात.

पाकिस्तानमध्ये अधिकृतपणे ’राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून कुठला दिवस साजरा होत असल्याचा उल्लेख आढळत नसला, तरी त्यांच्या निर्माण दिवसाला म्हणजे दि. १४ ऑगस्टला ते एक दिवस साजरा करतात, असा उल्लेख आढळतो. त्याच दिवशी ‘International council of traditional sports and games’ (ICTSG) ही जागतिक संघटना सर्व देशांना १४ ऑगस्टला देशी/पारंपरिक क्रीडा प्रकारांचा सोहळा साजरा करण्याचे अवाहन करते. त्यात देशी/पारंपरिक क्रीडा प्रकारांचा म्हणजे कबड्डी, पोलो, बैलांच्या शर्यती, चिखलातली कुस्ती, कराटे, धनुर्विद्या, पैलवानी कुस्ती, मार्शल आर्टमधील पिंच्याक सिलॅट यांसारख्या क्रीडा प्रकारांचा समावेश असलेल्या स्पर्धांचा ते उत्सव साजरा करतात.

इराणमध्ये दि. १७ ऑक्टोबर हा ‘शारीरिक शिक्षण’ आणि ‘क्रीडा दिन’ म्हणून साजरा होतो, जपानमध्ये प्रथम १९६६ पासून दि. १० ऑक्टोबर हा ‘आरोग्य’ आणि ‘क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो. मलेशियात लोकसंख्येमध्ये निरोगी जीवनशैलीचा प्रचार करण्याच्या मुख्य उद्देशाने दरवर्षी ऑक्टोबरमधील दुसर्‍या शनिवारी ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा करण्यात येतो. मलेशियात पहिला ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ २०१५ मध्ये आयोजित करण्यात आला होता. कतारमध्ये प्रथम २०१२ पासून फेब्रुवारीच्या दुसर्‍या मंगळवारी ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ साजरा करतात. बहारीनमध्ये क्रीडा दिवस पहिल्यांदा दि. ७ फेब्रुवारी २०१७ रोजी आयोजित करण्यात आला होता आणि तेव्हापासून हा कार्यक्रम दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसर्‍या आठवड्यात १० ते १३ या तारखांच्या दरम्यान केला जातो. मंत्रालयांच्या आदेशाने, सरकारी क्षेत्रे, तसेच खासगी क्षेत्रे, कंपन्या, बँका आणि शाळा, हे वॉकाथॉन आणि उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास अर्धा दिवस सुट्टी देऊन क्रीडा दिनाला हातभार लावतात. या दिवसाचे मुख्य लक्ष्य म्हणजे युवा शक्तींना साहाय्य करणे आणि विविध वयोगटातील लोकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात खेळ लागू करण्यासाठी उत्साही करणे असा आहे. रशियात क्रीडा दिन ऑगस्टच्या दुसर्‍या शनिवारी साजरा करतात.

हॉकीचा खेळ हा ध्यानचंद तसेच सैन्यदलामुळे फाळणीच्या आधीच्या काळापासून सर्वत्र लोकप्रिय झाला, तर क्रिकेट हे विदेशातून येत भारतातील नवाब, राजेरजवाड्यांच्या पाठिंब्यावर तसेच त्यात त्यांच्या सहभागाने लोकप्रिय होत गेला. फाळणीत हॉकी, क्रिकेट तसेच अ‍ॅथलेटिक्स खेळणार्‍या प्रदेशांच्या संघांची व खेळाडूंची फाटाफूट झाली. फाळणीमुळे व पाकिस्तान मधले हॉकी, क्रिकेट, अ‍ॅथलेटिक्सचे संघ मैदानात एकमेकांसमोर उभे ठाकले. त्या फाळणीपासून एकाचे दोन झालेले संघ तुल्यबळ झाले आणि त्यातून जन्म झाला तो पारंपरिक प्रतिस्पर्ध्याचा.

जन्म : पारंपरिक प्रतिस्पर्ध्याचा

पारंपरिक प्रतिस्पर्धी असे मनात आले की, लगेचच भारतीयांच्या तोंडी नाव येते-ते पाकिस्तानचेच. क्रीडाविश्वात तर ठळकपणे ते जाणवते. क्रीडा प्रकारांत भारत-पाकिस्तान यांच्यात होणारे सामने हे वृत्तपत्रांत, क्रीडा नियतकालिकांत वाचायला, नभोवाणीवर ऐकायला, प्रत्यक्ष स्टेडियमवर, दूरचित्रवाणींवर बघायला किंवा त्यावर चर्चा करायला, अशा सर्व ठिकाणी उत्साहवर्धक आणि रोमांचक असेच आढळतात. कारण, या दोनही संघांची सफलता आणि विफलता एक सारखीच आहे. या दोघांमधले सामने क्रिकेट, हॉकी बरोबर अ‍ॅथलेटिक्समध्येही रोमहर्षक होत असतात.

आपल्याला आजदेखील स्मरत असेल ती १९६० मध्ये भारताचा मिल्खा सिंह आणि पाकिस्तानचा अब्दुल खालिक यांच्यातली शर्यत. त्याचप्रमाणे आजकालची नीरज चोप्रा-अरशद नदीम यांच्यातला भालाफेक. ऑगस्ट २०२३च्या जागतिक क्रमवारीनुसार, अधिकृतरित्या हॉकी खेळणार्‍या एकूण ९६ देशांमध्ये भारत तिसर्‍या स्थानावर आला असला, तरी पाकिस्तान अजून बराच खाली १६व्या स्थानावर आहे.

भारत आणि पाकिस्तान संघांनी दीर्घकाळ हॉकीच्या क्षेत्रावर अधिराज्य गाजवले. परंतु, नंतर नंतर ढासळलेल्या प्रदर्शनाने ते हिंदीत म्हणतात तसे ’अर्श से फर्श तक सफर’ करत राहिले. दोघांनीही ‘ऑलिम्पिक’ पदकांपासून विश्वचषक जिंकण्यापर्यंत सगळ्या स्पर्धांमधील विजयाची गोडी चाखली होती, तरी त्या बरोबरच बराच काळ आशियातील या दिग्गजांवर पराभवाची कडू चवदेखील चाखायची पाळी अनेकदा आलेली आहे. असे जरी असले, तरी जेव्हा-जेव्हा हे दोघे एकमेकांसमोर उभे ठाकतात. तेव्हा हॉकी जगताच्या आणि आपल्या आपल्या प्रशंसकांच्या नजरा नकळत त्यांच्याकडे वळतात, अशा या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांच्या १९५६ पासूनच्या लढतींचा आढावा घेत त्यांच्यातील हेड-टू-हेड रेकॉर्डवर एक नजर टाकू.

भारत-पाक ‘ऑलिम्पिक’ सुवर्ण संघर्ष...

१९४७ला फाळणी झाल्यानंतर दि. १४-१५ ऑगस्टच्या मध्यरात्री भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांचा जन्म झाला. भारताने दि. १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन म्हणून घोषित केला, तर तिकडे पाकिस्तानने आपला स्वातंत्र्य दिन भारतापूर्वी साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला व त्याला जिनांनी मान्यता दिली आणि दि. १४ ऑगस्टला पाकिस्तान स्वातंत्र्य दिन म्हणून साजरे करू लागले.

अशी या देशांची स्वतंत्र राष्ट्र म्हणून ओळख प्राप्त झाल्यावर १९५६च्या मेलबर्न ‘ऑलिम्पिक’च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर मात करीत सुवर्णपदक मिळवले, तर पाकला रजतपदावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेत प्रथमच हे दोघं एकमेकांसमोर उभे ठाकले होते. याआधी भारताने सतत पाचवेळा सुवर्णपदक प्राप्त केले होते. तथापि, पाकिस्तान मात्र लागोपाठ दोनवेळा पहिल्या चारांत आला खरा; पण एकादेखील सामन्यात विजयी होऊ शकला नाही. मेलबर्नच्या त्या स्पर्धेत भारताच्या रणधीर सिंह जेंटलने पाकिस्तान विरुद्ध एक गोल करून भारताला सहावे सुवर्णपदक मिळवून दिले होते.

त्यानंतर १९६०च्या ‘रोम ऑलिम्पिक’मध्ये उपांत्य फेरीत स्पेनला हरवून पाकिस्तान अंतिम सामन्यात गेला, तर भारत ग्रेट ब्रिटनला हरवून पाकिस्तान विरुद्ध अंतिम सामन्यात उतरला. हॉकीच्या ‘ऑलिम्पिक’ स्पर्धेत पाकिस्तानने अंतिम सामन्यात पहिल्यांदा भारताच्या सुवर्णपदकाच्या घोडदौडीला लगाम घातला. पाकच्या नसीर अहमद बुंदा याच्या एकमेव गोलने पाकिस्तान सुवर्ण विजेता ठरला.

१९६०च्या रोम ‘ऑलिम्पिक’ नंतर भारत-पाकिस्तान ‘ऑलिम्पिक’मधे सात वेळा आमने-सामने आले. त्यात पाकिस्तान चार वेळा जिंकला, भारत दोनदा जिंकला, तर एक सामना बरोबरीत सुटला. भारताने ‘ऑलिम्पिक’मध्ये आठ सुवर्णपदक पटकावले, तर पाकिस्तानने तीनदा. हे पारंपरिक प्रतिस्पर्धी फक्त ‘ऑलिम्पिक’ स्पर्धांमध्येच एकमेकांसमोर उभे ठाकले नाहीत, तर ‘टेस्ट सीरिज’, ‘विश्व कप’, ‘एशियाई खेल’, ’एशिया कप’, ‘एशियन चॅम्पियन्स ट्रॉफी’, ’राष्ट्रमंडल खेल’, ‘हॉकी वर्ल्ड लीग’, ‘आफ्रो-एशियन गेम्स’ अन्य अशा एकूण १७९ पैकी भारताने ६५ पाकिस्तानने ८२ सामने जिंकले आहेतस, तर ३२ अनिर्णित राहिले.

शनिवार, दि. २ सप्टेंबर २०२३ची दुपार व संध्याकाळ या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यातील सामने बघण्यात क्रीडा रसिकांनी अनुभवली. शनिवार, दि. २ सप्टेंबरच्या संध्याकाळी भारत-पाक ‘आशियाई चषक क्रिकेट’ स्पर्धेत लंकेतील कॅण्डीमध्ये लढले. श्रीलंका सहयजमान आहे. काही सामने पाकिस्तानात तर काही लंकेत. लंका गतविजेती आहे. ते फॉरमॅट टी-२० होत, तर हे वन-डे फॉरमॅट आहे. एका अर्थाने ही क्रिकेट विश्वचषकाची रंगीत तालीम आहे.

हॉकीत ऑगस्टमध्ये भारताने पाकिस्तानवर मात केली होती. ते सामने नेहमीसारखेच म्हणजे ११-११ खेळाडूंचे होते. नवखा, अनुभव नसलेला, तारुण्याने भरलेला पाकिस्तानने त्यांचा संघ चेन्नईत उतरवला होता, हे आपण ध्यानात ठेवले पाहिजे. शनिवार, दि. २ सप्टेंबर २०२३ला संपन्न होत असलेल्या आशियाई ‘हॉकी महामंडळ’ (Asian Hockey Federation) आयोजित पाच विरुद्ध पाच खेळाडू असणार्‍या अनोख्या ‘हॉकी-५’ या स्पर्धेत भारताने चांगला खेळ केला आहे. भारत सगळ्यांहून जास्त गोल करणारा संघ या स्पर्धेत ठरला. साखळी सामन्यात भारत-पाकिस्तान विरुद्ध हारला होता, तरीदेखील या स्पर्धेत भारत-पाकिस्तान यांच्यातच अंतिम सामना झाला व ती लढतही सगळ्यांनी अनुभवली. भारताने पाकिस्तानवर पेनल्टी शुटआऊट मध्ये विजय संपादन केला.

श्रीपाद पेंडसे
(लेखक जनजाती कल्याण आश्रम, पश्चिम महाराष्ट्र, माजी खेलकूद आयाम प्रमुख आहेत.)
९४२२०३१७०४

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.